Posts

Showing posts from 2006

गाना बनै ले हुनर से मियाँ!

वा! वा! हिमेशवा वा! म्हणजे बिलकुल लाजवाब! काय गाणं पेश केलंस तू!
आजपर्यंत मी समजत होतो की गाण्यांमध्ये शब्दांच्या अर्थांचे पापुद्रे तयार करणे फक्त मलाच जमते. चड्डी घातलेले फुल, चांद कटोरा घेउन चाललेली रात भिकारन सारख्या श्रोत्यांना धक्का देणा-या प्रतिमा, टाइम्स ऑफ इंडिया चं गाणं, किंवा चॉकसे चॉंदपर लिखना या सारखे नवीन प्रयोग करणं हि माझी मक्तेदारी होती. हां कहते हैं बांद्रा के उस पार किसी शक्स ने एक दो तीन कोशीश की थी। पर हर लफ्ज कोई लडकीको देखा तो लिखनेवाली नज्म तो नही होती। खैर वह कहानी फिर कभी...।
पण गड्या तू जे केलेस त्याला मिसाल नाही. एक शब्द - तनहाईयाँ - त्याला आपल्या सानुनासिक स्वरांचा असा झटका दिलास, तन-हैय्या! आणि तो शब्द म्हणजे अर्थांचे आणि अर्थांतरांचे जणु एक झुंबर झाला. गाणा-याचं तन म्हणजे बाह्य रूप म्हणजे जणु एखादा अडलेला बैल नव्हे सांड. त्याला हैय्या हैय्या करणारं जग. बैलानं कोणत्याही प्रकारच्या बाह्य प्रतिक्रीयेला न जुमानणं. त्यामुळे इतर कळप पुढे निघुन गेला. हैय्या हैय्या करणारा गुराखी ही निघुन गेला. या तनहाईत बैल एकटाच उरला ...
खरं सांगतो, एकसो सोला चाँद की राते जागलो तर…

सांग सांग भोलानाथ!

आपल्याला आवडलेली साडी नेहमी आपण ठरवलेल्या रेंजच्या बाहेर का असते?
सौंदर्यप्रसाधने विकणा-या पोरी नेहमी आगाऊ आणि गि-हाइकांकडे पुर्ण दुर्लक्ष करणा-या का असतात?
शेजारच्या बाईच्या हातातली साडी आपल्याला कायम का आवडते?
आपल्याला अवडलेल्या चदरीचा, अभ्र्याचा, टॉवेलचा एकच पीस का शिल्लक असतो?

भरजरी

पुण्याच्या सेनापती बापट रस्त्यानं नजिकच्या काळात कात टाकली आहे. चतुश्रुंगी जवळ निर्माण होत असलेल्या संगणकीय संकुलात टोलेजंग इमारती उभ्या रहात आहेत. त्या इमारती नव्या नव्या भरजरी दुकानांनी झगमगु लागल्या आहेत. आघाडीची व्यापारी संकुले, रेस्तरॉं आणि पुण्यातले सगळ्यात मोठे क्रॉसवर्ड - पुस्तके विकत घेण्याचा अनुभव भरजरी करणारी दुकानांची साखळी. अमेरिकन धर्तीवर, पुस्तके चाळायला, वाटल्यास जेठा मारुन वाचायला वाव देणारी. त्या मुळे त्या दुकानाला भेट देणे 'मष्ट' झाले.
दुकान प्रशस्त होते पण एकंदर 'मझा' नव्हता येत. एकतर जागा भरायची म्हणुन लांबलांब मांडलेले शेल्फ्स. ते शेल्फ्स भरायचे म्हणुन ठेवलेल्या एकाच पुस्तकाच्या पाच पाच प्रती. पुस्तकंही सगळी फॅशनेबल आणि अधिक खपाची. आणि कवितांच्या पुस्तकांचा दीड खण. आणि त्या खणातली निम्मी पुस्तकं जीएंच्या भाषेत संक्रातीच्या भेटकार्डावर लायकीच्या कवितांची. हे मी इंग्रजी पुस्तकांबद्दल सांगते आहे हं मराठी पुस्तकांची आशाच नव्हती. तर अशी नाक मुरडत मी त्या पुस्तकांच्या सुगंधी गर्दीत भटकत होते. ही सुगंधी - तथाकथित बुद्धीजीवी - जमात तशी मजेशीर. पण त्याबाबत…

तीन संदर्भ

सप्टेंबरचे दिवस. कुळाचाराचे, उपासा-मोदकांचे. आणि शिवाय बुचाच्या फुलांचे. माझ्या अंगणात दोन बुचाची झाडे आहेत. पावसाचा भर ओसरल्यावर थंडीची किनार असलेली हवा पडते. आसमंतात सुगीचा सुगावा लागायला सुरवात होते. खरंतर शब्दात नाही सांगत येणार तो हवेचा तरतरीतपणा - crispness. अश्यावेळी माझी नजर बुचाच्या झाडांकडे असते. अरे, यांना अजुन कशी जाग आली नाही? इतर वर्षभर 'उंच झाडे' अश्या सामान्य कुळातले बुचबाबा या दिवसात संगीत होतात. एके दिवशी अचानक एखाद्या फांदीवर पांढ-या लांब कळ्यांचं झुम्बर दिसु लागतं आणि पाहता पाहता एवढी थोरली झाडं अलवार भासु लागतात.
बहुतेक वेळा कोप-यावरचा बुचोबा पहिला नंबर लावतो आणि लॉ कॉलेज रोड वरचा बुच समुदाय पिछाडी सांभाळतो. रात्री त्या रस्त्याने परतताना परिमळ तुम्हाला कवेत घेतो. सहज नजर वर जाते. वरचे वृक्ष मजेत डोलतात, आम्ही पण आहोत म्हटलं! घरातही तो सुगंध हलका पसरतो. मला 'जाणिवश्रीमंत' करतो.
गेल्या वर्षभरात या झाडाशी साहित्यिक आप्तसंबंध जुळला. विद्द्युलेखा अकलुजकरांचं भाषावेध हे शब्द व्याकरण भाषा याबद्दल लिहिलेल्या स्फुटांचं एक छान पुस्तक आहे. त्यात त्यांनी इंदिरा…

बुकशेल्फ

झी मराठी वाहिनीवर रविवारी दुपारी एक ते दीड बुकशेल्फ नावाचा वाचनावर आधारित कार्यक्रम प्रसारित होतो. शनिवारी सकाळी पुनर्प्रक्षेपित होतो. त्यात नविन पुस्तकांची ओळख असते, काही वाचनवेड्यांच्या ओळखी असतात, टॉप फाईव पुस्तकं असतात. अतुल कुलकर्णी मन लावुन हा कार्यक्रम सादर करतो. शक्य असेल तर जरुर हा कार्यक्रम जरुर पहा.
काही वेळा कार्यक्रमाचा फॉर्म बदलला तर अजुन मजा येईल. लेखकांच्या मुलाखती, साहित्यजगतातील घडामोडी वगैरे. मला असे वाटते की कधी कधी कवितेचा भाव न लक्षात घेता, अतुल त्या जास्त "गहि-या" (Intense) वाचतो. पण हे केवळ गालबोट.
कार्यक्रम चांगला असल्याने कधी बंद पडेल याचा नेम नाही.
तर त्या निमित्ताने माझा तुम्हाला प्रश्न: तुम्ही का वाचता? वेळ घालवण्यासाठी, आहे अश्या जगापासुन सुटका मिळवण्यासाठी, विरंगुळा म्हणुन, का व्यसन आहे म्हणुन?

आणि तरीही...

ठसठसणा-या जखमा,
छुप्या मारेक-यांसारख्या साधतात डाव,
अचानक बेसावध पाहुन घालतात घाव,

देशभक्तांची ज्वलंत जिद्द
यातनागरातल्या किंकाळ्या
अंदमानचा निर्घ्रुण कोलु
एडनचं मणामणाचं ओझं
कापुन टाकलेला पायाचा तळवा
ऑशविट्झचं खदखदतं वंशखंदन

बलदंडांचं,
बळाच्या जोरावर "न्याय्य" ठरलेलं क्रौर्य.
बळी,
चिरडले जाणारे, तडफडणारे, असहाय्य.

या जखमा भरत तर कधीच नाहीत
नुसत्याच सवयीच्या होतात
अचानक नवा घाव बसतो
परत सगळ्या मुसमुसु लागतात

उकळते कालवणाचे काहील
पडुन बुडणारा नकोसा उत्पल
स्फोटानंतर फलाटावर,
साखळलेले उध्वस्त अवयव
टपलेल्या पेशंट गिधाडांसमोर
धपापणारं इथियोपियन पोर.

त्या क्षणी मन पार पिळवटुन आक्रंदतं
पार निपचीत अंधा-या कोप-यात आक्रसतं
चीड येते,
केवळ "मानव"च करु शकणा-या अत्याचाराची!
त्याहुन शिसारी येते,
माझ्या षंढ चिकट निष्क्रियतेची
आणि तरीही ...
आणि तरीही,
दुस-या क्षणी मी मनाचा चॅनल बदलते...
करण जोहरच्या बेगडी दुनियेची चिलीम ओढते.

गप्पा

अंधार पडत होता तशी मी लेकीला हाक मारली,
'चला या घरी'
'आई पाच मिंटं'
असं नेहेमीचं उत्तर देउन पुन्हा ती गप्पांकडे वळली सुद्धा!
`रोज भेटतात एकमेकींना तरी यांच्या गप्पा कश्या संपत नाहीत? काय बोलतात एवढ्या?'
असा विचार मनात येता येता, स्वत:चंच हसु आलं. गप्पा कधी संपतात का? `जिवश्च कंठश्च' मैत्रिणींनी रोज गप्पा नाही मारायच्या तर कोणी? गप्पा गोष्टच अशी आहे, चला मारुया म्हणुन नाही जमायच्या त्या. `चल निघते ग' म्हणुन बाहेर पडल्यावर, एकजण फाटकाच्या आतल्या बाजुला आणि दुसरं बाहेर अश्या फाटकाला लटकुन पुढे अर्धा पाउण तास मारल्या जातात त्या ख-या गप्पा.
शाळा सुटली की मुलींचे घोळके बाहेर पडतात. ४ - ५ मुली एकमेकींच्यात जरा ही जागा राहणार नाही अशा एकमेकीला चिकटतात आणि जणु सयामीज ट्विन्स असल्यासारख्या एकधडाने रस्त्याने चालतात. २०% बोलणं, ६०% खिदळणं आणि २०% 'गप्प बस!' त्या एक्जीव घोळक्यातुन उत्पन्न होतं, त्या गप्पा. आता खरं तर स्कुल बस ने मुलं ये जा करत असल्यानं ही प्रथा मोडीत निघते की काय अशी काळजी लागली होती पण सांगायला आनंद होतो की मुली या मुलीच आहेत फक्त `बावळट' च…

हक्क!

मुंबईत झालेल्या घटनांनी सुन्न व्हायला झालं. अतिशय थंड डोक्याने कोणी इतक्या जणांना मारायची योजना बनवु शकतो ती प्रत्यक्षात आणु शकतो हे झेपणंच जड गेलं. मुंबईकर त्याच्या स्वभावधर्मानुसार वागले. कोणी आपल्या कामाचं नाही हे त्यांना चांगलं माहीत आहे. त्यांनीच एकमेकांचे अश्रु पुसले आणि चालु लागले. कोणत्याही युद्धात बळी पडतात ते निरपराध असहायच!
मला तर कधी कधी समजत नाही की ह्यांचं कौतुक करावं की त्यांनी काही किमान अपेक्षा बाळगु नये या बद्द्ल रागवावं
ह्यातुन सवरते आहे तोच लक्षात आले की आपला ब्लॉग चालत नाहीये. आधी वाटले की व्यत्यय आहे पण मग खरी गोष्ट समजली. हा म्हणजे चोर सोडुन सन्यासाला सुळी देण्याचा प्रकार! `आविष्कार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी' आहे ही! जाम वैतागले मी. मला पोस्ट करता येत आहे कारण ते संकेतस्थळ वर्ज्य नाही झालेले पण वाचता येत नाही. तणतणुन "वर्ड्प्रेस" ला हलायचा विचार केला. पण एक मिनिट.... का म्हणुन? का म्हणुन मी हलायचे इथुन? नोहे! नो वे!
तेंव्हा रामगढ के वासियों चाहे गब्बर कुछ भी करले ... जब तक है मुमकिन, मै ब्लॉगुंगी!!!
तुमचा लोभ असावा ही विनंती!

अनुस्वाराच्या निमित्ताने

मिलिंद च्या 'अनुस्वार' या नोंदीच्या अनुषंगाने केलेल्या विचारानं मला काही मुद्दे सुचले. ते मी त्यांच्या नोंदीवर टिप्पणी म्हणुन टाकलेच. पण अधिक कायमस्वरुप नोंद असावी म्हणुन पुनरावृत्ती.

पण त्या आधी -- मी काही माहितगार अथवा भाषेची विद्यार्थीनी नाही हे ध्यानात घ्या.

१. माझ्या मते अं हा ओष्ट्व्य नाही. तो अनुनासिक आहे. ओठाचा वापर न करता त्याचा उच्चार करता येतो.
२. हा अनुस्वार बेटा चुकीच्या कळपात शिरल्यासारखा वाटतोय खरा! म्हणजे इतर बाराखडी ही त्याच व्यंजनाचे आविष्कार आसतात तर हा बेटा पुढच्या व्यंजनाला जाउन चिकटतो आहे.
३. अनुस्वाराप्रमाणे 'र' या व्यंजनासाठीही किती वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे आहेत. आणि ती बाराखडी प्रमाणे परत बदलतात. जसे क्र आणि कृ - उ उलटा फिरवलेला. शिवय तोर्यात असे न लिहिता तो-यात असे लिहीलि जाते. आणि जिथे कंपित मधला अर्धा म पुढ्च्या क वर दर्शवला गेला तर सर्वात मधला अर्धा र मागच्या व वर.
४. माझे असे एक मत आहे की गेल्या शतकच्या सुरवातीला मराठी व्याकरणावर जे संस्कार झाले त्यावर इंग्रजीची छाप आहे. म्हणुन मराठीत दंड न वापरता . पूर्णविराम (Fullstop चे भाषांतर?) वाप…

अय्या बाई तुम्ही?

काल भाजीवालीसमोर घासाघीस करताना, शेजारी उभ्या असलेल्या बाईंकडे बघितले तर त्य मोठे कुंकु लावलेल्या हस-या बाई ओळखीच्या वाटल्या. एकदम ओळख पटली की या विज्ञानमंचच्या कुलकर्णी बाई. मी लगेच 'स्कर्ट-ब्लाउज, दोन वेण्या' मोड मध्ये गेले. आणि म्हणाले, "अय्या बाई तुम्ही!"
बाईंना अश्या बावळटपणाची बरीच सवय असावी. त्यांनी ओळख विचारली, गप्पा मारल्या. त्यांच्या बरोबर आलेली त्यांची नात चुळबुळ करायला लागली तसे बोलणे आवरते घेत आम्ही आपापल्या मार्गाला लागलो.
पण या आजी - बाई मला पटेचनात. नातीची समजुत काढणा-या आजी आणि माझ्या बाई यात मला दुवाच सापडेना. खरं तर गोरेगावच्या मराठी शाळेत शिकल्याननंतर माझ्याही आयुष्याने वळणं घेतली होती की.
मन चटकन शाळेत धावलं, तो पेल्टोफोरमचा पिवळा सडा पडलेला तपकिरी रस्ता. भलं थोरलं आवार, बैठी शाळा, आणि त्यावर अम्मल गाजवणा-या आमच्या सगळ्या शिक्षिका. त्यांनी खरच आम्हाला घडवलं, नियमाबाहेर जाउन पुस्तकं दिली, विषयांची गोडी लावली.
माझ्या केळकर बाईंमुळे शास्त्र विषयाची गोडी लागली. त्या कायम वर्गात तास सुरु असताना पुस्तक उघडलं की रागवायच्या आणि उत्तर आलं नाही की घरी पुस्…

बेस्टं

परवाच लंपनचं 'शारदा संगीत' वचुन सोडलं की हो! एकदम बेस्टं बघा. एकदम दोन्ही हाताचे आंगठे आणि बोटं चिकटवुन बेस्टं
हे पुस्तक म्हणजे, विद्या यावी म्हणुन पुस्तकाच्या पानात कुंकु लावलेलं मोराचं पीस ठेवलेलं असतना? तसं वाटलं. मोराच्या पीसासारखं दिमाखदार आणि विद्या येणार या विश्वासासारखं 'निरागस' की काय ते असतं तसं दोन्ही एकदम. असा मॅड सारखा विचार डोक्यात आला.

शब्दकेली

मराठीचे एवढे समॄद्ध शब्दभंडार असुनही माझ्या मते काही भावना आणि व्यक्तिविशेष शब्दापासुन वंचित आहेत. किंबहुना त्यांना इतर भाषेतही वाली नाही. (पण कुणी सांगावे एस्किमो भाषेत बर्फ़ाला २१ शब्द आहेत म्हणे!). परंतु मराठीतली ही त्रुटी भरुन काढण्यासाठी, त्यांना नावे ठॆवण्याचा खेळ म्हणजॆ शब्दकेली. तुम्हाला वाटलेच तर 'शब्दकाला' म्हणा हवं तर...
मुलाहिजा फर्माईये ...
दांबई - एखादे रटाळ व्याख्यान किंवा संभाषण ऐकताना आलेली जांभई दाबायचा केलेला प्रयत्न आणि तदनुषंगाने होणारी जबड्याची हालचाल.

यमकविता - आपल्याला कविता होते या गॊड गैरसमजापायी नकवींनी केलेली यमकजुळवणी.

नाडपट - पायजम्याच्या नाडीचे एक टॊक नेफ्यात लोप पावल्यावर बोटाने ती नाडी बाहेर काढायची केलेली यडपट खटपट. ( जाता जाता..'कागदी होडीच्या शीडवर बसलेल्या पक्ष्याच्या चड्डीची नाडी' नामक लेखनकार्य मराठीत काही वर्षांपुर्वी झाले आहे त्याची अधिक माहिती आहे का कुणाला?)

हौसाष्टक - मुहुर्ताची वेळ व्हायची आहे, भटजींनी आपला गळा साफ करुन घेतला आहे. अशा वेळी मुलीच्या मावस आजीनी रचलेली आणि मुलीची आत्या, मावशीची नणंद आणि मानलेली चुलत आजी यांन…

कोणी गोविंद घ्या कॊणी गोपाळ घ्या

कळवण्यास आनंद होतो की या संकेतस्थळाला आपल्या अभिव्यक्तीला साजेसे नाव मिळते आहे.
याच्या पुर्वीच्या अवतारात, "The tree that shelters two souls" चा उद्देश आत दडलेल्या उर्मीना वाट देणे हा होता. वाटचाल चालु असताना, मराठीत नोंदी करण्याची शक्यता आणि मराठी वेबलॉग्सच्या श्रुंखलेचा रसिक आणि 'समछंदी' मेळावा भेटला. त्या योगे, गेली वीस एक वर्षे मिटून ठेवलेली वही परत उघडली. लिहावे असे वाटु लागले.
या नवीन बहराचे नवीन नाव ...
मोगरा फुलला

लक्षणे

वेबलॉग्सच्या जगात दोन प्रकारची माणसं असतात. पहिल्या प्रकारची माणसं आपले निरीक्षण, तत्वे, एकुणात आपला 'जीवनानुभव' आपल्या वेबलॉगवर नोंदवत असतात. आणि दुस-या प्रकारचे, केवळ वेबलॉग लिहीण्यासाठी जगतात!
तुम्ही कोणच्या प्रकारात मोडता? खाली दिलेली लक्षणं जर तुम्हाला लागु पडत असतील तर प्रकार ऒळखणं सोपं आहे.

१. 'वेबलॉग करणेचॆ फायदे' तुम्ही भेटेल त्या प्रत्येकाला 'मिशनरी' उत्साहाने ऐकवता.
२. 'स्टॉक एक्सचेंज' इंडेक्स पेक्षा तुमचे जास्त बारीक लक्ष तुमच्या 'वाचक संख्या सारणी' च्या चढ उतारावर असते.
३. तुमच्या मते 'फर्मास' उतरलेल्या एन्ट्रीवर कुणीच टिप्पणी न केल्यास 'जगात कुणाकुण्णाला माझी कदर नाही' असे नैराश्य तुम्हाला घेरते.
४. 'या जगात आपण नसु' या पेक्षा 'आपल्याला वेबलॉगमध्ये लिहायला काही राहणार नाही' याची भीती तुम्हाला जास्त वाटते.
५. समोरुन एखादी मोहक स्त्री जात असेल तर 'नटवी मेली' अशी स्त्रीसुलभ ( किंवा तुम्ही पुरुष असाल तर जे काही पुरुषांच्या मनात अशावेळी येते ते!) नैसर्गिक व प्रतिक्षिप्त प्रतिकीया व्हायच्याआधी 'स…

मेघबाळ चिमुकले...

आज ऑफिसला येताना पुर्ण निरभ्र आकाशात एक छोटासा ढग मला अचानक दिसला. किती छोटा! अखाद्या फुग्याएवढा आणि बाकीचं आकाश मात्र चित्रातल्या सारखं निळं शार. हाच बेटा कुठुन आला कुणास ठाउक? एखाद्या prophet ची practice चालु असावी (illusions - Richard Bach) का एखाद्या Ais Sedai ने जाताना आपला gateway धाडकन आपटला (The Wheel of Time - Robert Jordan) भराभर मिथक पुस्तकांचे संदर्भ उमललॆ. तयारच असतात entry मारायला.
मग वाटलॆ हा काही संकेत आहे का? भविष्याबद्द्ल? मनातल्या वादळी प्रमॆयांबद्द्ल? पण मग माझे मलाच हसु आले, किती आत्मकॆंद्री असतो नाही माणुस? जगातल्या सगळ्या घटना आपल्यासंबधी असतात असं वाटतं त्याला!
तर तेंव्हा पासुन ते ढगाचं पिल्लु माझ्या मनात शिरलयं. कामात असताना सुद्धा सारखं ढुश्या देतयं. "माझी आठवण आहे ना?" तेंव्हा म्हटलं या बाळाला इथं बसवावं म्हणजॆ त्याचं टुमणं कमी होईल.

मेघबाळ एकलॆ
निरभ्र नभी भेटलॆ
मनाच्या आकाशी
शब्दमेघ दाटलॆ …

सलाम!

लोकलमधुन किंवा बसमधुन प्रवास करताना आजुबाजुची घरे दिसायची. क्षणभरासाठी, ते घर, त्याचा खिडकीसमॊरचा चौकोन आणि तुम्ही यांचं नातं जुळायचं. मुलीची वेणी घालणारी आई, भाजी निवडणा-या बायका, कुठे नुसताच गरगर फिरणारा पंखा. विशेषतः दिवेलागणीच्या कातरवेळी हे नातं - निरागस माणुस असण्याचं नातं- अधिक गहिरं वाटायचं.

वेबलॉग्स वाचताना, परत तसंच निरागस नातं कुठेतरी जाणवतं. ही नाती मात्र मला आपल्या परीने जपता येतात, वाढवता येतात. हॆ माझॆ नातलग - कॊणी कॅन्सरशी आपल्या विलक्षण आशावादाच्या आणि श्रद्धेच्या बळावर झुंज देणारा तरुण, आपल्या तान्हुल्याच्या कौतुकात रमलेली आई, टाईमपास करणारे टगॆ, दूर देशी आपलं करिअर,स्वत्व आणि विनोदबुद्धी जपणारी अनामिका - कितीतरी - सगळे आवडतॆ. संकॊची स्वभावामुळे मी त्यांना कधी हे ही नाही सांगु शकले की तुम्ही मला प्रिय आहात, म्हणुन काय झालॆ? बरं वाटतं त्यांची खुशाली कळ्ली की. तरुण आणि ऍनी ची काळजी आणि कॊबीचं कौतुक मला आहेच.
म्हणुन गुलजारचॆ काही शब्द उसनॆ घेउन,
हवाओंपे लिखा है हवाओंके नाम
उन अंजान परदेसीयॊंको सलाम!

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी - माझी खेळी

प्रियभाषिणी, मला खो दिल्याबद्द्ल आभार. वाचन ही जिवनावश्यक गरज असल्याने पुस्तकांबद्द्ल लिहीणॆ म्हणजॆ पर्वणीच.
नंदननॆ चपखल शीर्षकासकट सुरु केलेला हा खेळ खेळायला आणि मुख्य इतराच्या खेळ्या वाचायला खूप मजा यॆतॆ आहे. धन्यवाद नंदन!
आता माझी खॆळी ..

१. शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक
झेन गार्डन - मिलींद बोकील

२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहीती
झेन गार्डन हा मिलींद बोकील चा कथा संग्रह मला आवडला पण शाळा एवढा नाही.

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके
स्वामी - रणजीत दॆसाई
जावॆ त्यांच्या देशा - पु.ल. देशपांडे
जी. एं. ची पत्रे - श्री. पु. भागवत आणि सुनिता देशपांडेंना लिहिलेली
एक एक पान गळावया - गौरी देशपांडे
मितवा - ग्रेस

४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके-
* - मारुती चितमपल्ली
* - जयवंत दळवी
समग्र कविता - मर्ढेकर
किमया - माधव आचवल
जी. ए. यांची माधव आचवल यांना लिहिलॆली पत्रे (माझ्या माहितीप्रमाणे ती प्रसिद्ध झालेली नाहीत पण मला वाचायला आवडतील ती!)

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -
गौरीचॆ एक एक पान गळावया ही माझी खुप आवडती कथा आहे. गौरीचा लेखनाचा घाट खुप वेगळा आहे. तुम्हाला…

हे वाचले ...

पद्मगंधा दिवाळी अंकात मारुती चितमपल्लींची सुरेख दीर्घ मुलाखत वाचली. त्यांनी सांगितलेल्या अरण्यकथा वाचुन कुतुहल वाढलॆ आहे. लवकरच त्यांचे आत्मचरीत्र वाचायला हवे. पद्मगंधा ही वाचनीय होता. रवीमुकुल यांना धन्यवाद द्यायला हवेत.

इरावतींचे गंगाजळ परत वाचले. इरावती, दुर्गाबाई, गौरी, जी.ए, हे सर्व माझे नित्य पाठाचे लेखक आहेत. त्यांचे लेखनाच्या मधुन मधुन आवृत्या करायच्या. कारण काही काळानॆ त्यांच्या लेखनातलॆ काही पदर हरवतात माझ्याकडुन. आणि काही वेळा मी अजुन थॊडी शहाणी(!) झालॆ असल्याने नवीन पदर सापडतात. या वेळी प्रकर्षानॆ जाणवलॆ ते त्यांचॆ म्हातारपणावरचॆ विचार. त्यांच्या तार्कीक विचारांनी अंगावर एकदम काटा आला.

मिलींद बॊकील यांची शाळा आणि झेन गार्डन. शाळा इतकी वास्तवाला धरुन होती की ते पुस्तक वाटेच ना मला. माझ्याच वर्गातल्या एखाद्या बावळट मुलाने ( शाळेत सगळीच मुलॆ अगदी चवळटबा असतात हे आद्य सत्य आहे!) ते लिहीलॆ असे वाटले मला! झेन गार्डन रेखीव आहे.

डॉ. राम भोसले यांच्यावरचे, "दिव्यस्पर्शी". ह्या पुस्तकाचा एक उतारा मी एका दिवाळी अंकात वाचला होता, मग सगळे पुस्तक वाचले. अद्भुत आहे. एका व्यक्तीच्य…

योगायोग

पु. ल. नी आपल्या बहारदार शैलीत लिहिलेले कनिष्टभगिनीविवाहयोग आदि योग आठवत असतील ना तुम्हाला? याला कदाचित संगणक प्रभाषेत डिजाईन पॅटर्न्स म्हणता येतील. तसेच काही योग मला आढळू लागले आहेत. तर आता नमनघटतैलयोग संपवुन मूळ योगांकडे वळते.
कसोटीपर्जन्ययोग - अर्थात सामना सुरु झाला की हमखास पाऊस पडणे. हे इतके हमखास आहे की सरकार खास दुष्काळी भागात सामनॆ भरवण्याचा विचार करत आहे. संस्कृतीरक्षकांनी आक्षेप न घेतल्यास, तो विचार तडीस जाईल ही कोणी सांगावे? ह्या योगाचे इतर अवतार येणेप्रमाणे: सिनेमाला जायचे म्हणुन ऑफिसमधुन लवकर निघायचे ठरवले की क्लायंटने कॉन्फरन्स कॉल करणे. समारंभाला जायला आपण छान जामानिमा करुन बाहेर पडल्यावर समॊरच्या वाहनाने आपल्या पोषाखावर खडीवर्क करणे, किंवा चप्पल तुटणे. आलं ना लक्षात? या योगाचा आपल्या महत्वाच्या कामांवर (उदा. दांडी मारण्यासाठी थाप मारणे) परिणाम होऊ नयॆ म्हणुन आपण काळजी घेतॊ, अभेद्य व्युहरचना करतो. पण हा योग एका नाजुक आघाताने आपल्याला चारी मुंड्या चीत करून टाकतॊ.
सण‌अभ्यासपरीक्षान्याय - परीक्षा या नेहमी अशा ठेवायच्या की त्या सणाला लागून आल्या पाहिजेत. त्यातही भीषण विषय तर …

हरवलॆ ... गवसले..

ब-याच दिवसांनी एखादे विसरलेले गणे ऐकायला मिळाले की पुन:प्रत्ययाचा एक वेगळाच आनंद मिळतॊ नाही? एखादं गाणं सारखॆ सारखॆ ऐकुन अतिपरीचयात‍ अवज्ञा होते कधी कधी. पण थोड्या दिवसाने ते गाणे ऐकले तर परत लाडके बनते. माझी लेक लहान होती तेंव्हा मी तिची काही खेळणी अशीच वरच्या कपाटात ठेवुन द्यायचे. मग काही आठवड्याने तो "हॅलोप्रसाद" भेटला की काय खुष व्हायची ती!
प्रणयाची गोडी ही विरहाने वाढते. साध्या साध्या प्रसंगात, प्रिय व्यक्तिची अनुपस्थिती टोचायला लागतॆ.
मला वाटते की आपल्याकडे असणा-या गॊष्टी गृहीत धरतॊ आपण,त्यांची योग्य किंमत करत नाही. विरहाने परत जाणीव होते, काखेतल्या कळश्याची.
फक्त तो विरह कायमचा न घडॊ एव्हढीच प्रार्थना.

फास्टर फेणेचे बाबा

म्हणजे आपले भा. रा. भागवत हो! काय सॉलीड लिहिलय ना भागवत काकांनी? फुरसुंगीचा चँपियन सायकल स्वार बन्या आणि त्याच्या धडपडी. मोठी धमाल यायची वाचायला. ते फक्त फा फे चे बाबा नव्हते पण ह्या कार्ट्याची प्रसिद्धी जास्त असल्याने ते त्याचे बाबा म्हणवले जाणार.
दर बालवाडी दिवाळी अंकात, त्यांनी लिहिलेली एक दीर्घ कथा असायची. इतर बाबतीत 'किशोर' पुढे लिंबुटिंबु वाटणारा बालवाडी या एका गोष्टीने बाजी मारुन जायचा. भागवतांचे बिपीन बुकलवार ( book lover?) आणि त्याची दोस्त मंडळी आहाहा - ती दिवाळीची सुट्टी ... एका हाताने फराळचे बकाणे मारत वाचलेल्य त्या गोष्टी ... कोणी १० निकारागुआ चे स्टॅम्प दिले तरी नसते एक्स्चेंज केले मी ते क्षण.
भा रां नी दिलेला आणि एक मोठा आनंदाचा ठेवा म्हणजे त्यांनी अनुवादित केलेल्या ज्युलस् वर्न च्या विज्ञान कथा. चंद्रावर स्वारी आणि इतर तर आहेतच पण सगळ्यात बेस्ट, मुक्काम शेंडेनक्षत्र आणि सुर्यावर स्वारी. 'Off on a comet' चा अनुवाद दॊन भागात. साधारणतः भाषांतरात येणारा बोजडपणा, या पुस्तकात अजिबात नाही. जणु मराठीत जन्माला आलेले कथानक. वातावरणसकट शेंडेनक्षत्रावर बसुन सू…

दिल चीज क्या है?

सुमेधाच्या उमरावजान ह्या नोन्दीमुळे मनात आलेले काही विचार,
ह्या चित्रपटाने तीन स्त्रियांना पुन:प्रसिद्धी मिळवुन दिली.
उमरावजान स्वत:(ती एक कल्पनिक स्त्री का असेना...), रेखा आणि आशा भोसले. या तिघींच्या कौशल्याची एक नवीन मिती dimensionचाहत्यांसमोर आली. उमरावजानची एक संवेदनाशील कवयित्री म्हणून एक नवीन ओळख झाली. ऱेखाच्या अभिनयसामर्थ्याची पेहचान झाली. आशाजींचा मधाळ आवाज आपल्या चाकोरीबाहेर पडुन खय्याम यांच्या संगीतातुन खानदानी अत्तरासारखा दरवळला. या तिघी नाजनीन अहेत, divaआहेत. आणि या तिघीही विरहिणी अहेत, अश्या जोडीदाराच्या शोधात जो जन्माची साथ देइल. ज़ो मध्येच डाव सोडुन उठुन नाही जाणार... तिघींना जणु एकच प्रश्न पडलाय,
हर मुलाकात का अंजाम जुदाई क्युं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमें....

नम्र नोंदी

नम्र नोंदी
ह्या टिपणस्थळी नमूद केलेली सर्व मते माझी वैयक्तिक मते असुन त्यांचा मी ज्या संस्थेत काम करते तिच्या मतांशी अथवा माझ्या परिवाराच्या मतांशी काही संबंध नाही इथे केलेले सर्व हिरव्यावरचे पांढरे, माझेच लेखन आहे. इतर लेखकांचे लेखन उद्ध्रुत केल्यास तसा अवश्य उल्लेख करीन ही टिपणवही 'मंजिरी' शुद्धलेखन पद्धती अनुसरते. :) आपणास ज्या शुद्धलेखनच्या चुका भासतात त्या खरेतर 'मंजिरी' पद्धतितील त्या शब्दांचे पाठभेद अहेत. (पो. ध. ह.) वडिलांनी प्रचलित शुद्धलेखन शिकवण्याचे थोर प्रयत्न केले पण माझ्या अल्पमतीला केवल 'म. शु प.' मानवते तसदिबद्दल क्षमस्व. (पो. ध. ह.) म्हणजे पोट धरुन हसते - जे LOLचे मराठी समांतर रूप होय. कोण्या शस्त्रीबुवांची पदवी नव्हे ह्या नोंदींचे कोणत्याही ख-या अथवा काल्पनिक पुणेरी पाटीशी साधर्म्य आधळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा

उद्रेक

च्या मारी!

कधी कधी स्वत:ला करून टाकावं माफ़,
मनातलं सगळं किल्मीष करुन टाकावं साफ़.

तोडून टाकावी सगळी चांगुलपणाची कुंपणे
सोडून द्यावे आपली चंगली इमेज जपणे...
(आपल्यालाच फ़क्त तसं वाटत असतं नाहीतरी)

हासडाव्या चार कचकचीत शिव्या!
(येत नसतील तर निदान ओठांची भेदक हालचाल)
आणि चिरडावी तमाम तत्वं पिचपिचीत!

कधी कधी स्वत:ला करून टाकावं माफ़.
सतत बनणं सोडून द्यावं आपलेच बाप!

Well said!

Dr. Sreeram Lagu, a noted marathi theater personality, in his autobiographical book 'Lamaan' -लमाण - made an interesting observation about Indian loos. He says, - and I paraphrase as I do not have the book in front of me. 'No matter the affluence or lack thereof of the Indian living establishments, be it palaces, homes, lodges, hotels, the loos are always the dirtiest places of all. I think that the Indian logic behind that is the place is used to divest oneself of the bialogical waste, will be 'dirty' anyway so what is the need for it to be clean?

जिथे जाऊन घाणच करायची आहे, ती जागा स्वच्छ असायची काय गरज आहे?

Aptly said sir! Both the observations, about the loos and the indian psyche, are on the mark!

प्रश्न

उत्तर जर न साहवे
विचारु नको प्रश्न
जननिंदेचे भय जिला
तिने भजु नये कृष्ण

Happy Birthday - V2

गेल्या वर्षभरात पुण्यात एक नवीन फ़्यॅड सुरू झाले आहे. गल्लीपासुन दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या पुढा-यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फ़लक लावायचे. साहेबांचा एक फोटो, आणि खाली शुभेच्छुकांचे ७ - ८ फ़ोटो. सगळे चौक - मोक्याच्या जागा ह्या फ़लकांनी व्यापल्या आहेत. माझ्या मते फ़लांसाठी 'बरे' दिसणारे फ़ोटो काढण्याचे स्पेशल 'पॅकेज' ओफ़र करत असणार स्टुडिओवाले! आणि एक गमतीशीर गोष्ट म्हणजे सहसा या फ़लकांवर तारीख नसते लिहीलेली. त्यामुळे तो फ़लक महीनोमहीने 'ताजा' राहतो.
ह्या फ़लकांची सवय होते आहे तो वर त्यान्चे वर्जन २ बाजारात आले आहे. ह्या वर्जनमध्ये, शुभेच्छुकांच्या फ़ोटोला काट देण्यात आलि आहे, रिकाम्या झालेल्या जागी, एकतर साहेबांचा मोठा पोस देउन काढलेला फ़ोटो आणि एक 'गहिरी' कविता...
'वाट चालताना, पाठीवर हात फ़िरवणरे कोणीतरी हवे असते,
प्रत्येक नावेला पुढे नेणारे शीड हवे असते,
तुम्ही तो हात ते शीड आमच्यासाठी झालात
दीर्घयू व्हा आणि नौका पुढे न्या
" सूं सूं.... "

हे v2फ़लक कोण sponcerकरत असेल असे तुम्हाला वाटते?

सुवर्णध्वजा

पुण्यात वसंताचे आगमन झाले आहे! तसे सुचीत करणारी सुवर्णध्वजा मी आजच पाहिली. आमच्या officeसमोरचा सोनमोहोर लख़लख़ीत फ़ुलला आहे. वसंत आला ह्याची ख़बर मला तोच देतो दरवर्षी. सोनमोहोर, पेल्टोफ़ोरम, लॅबरनम ही सगळी वसंत, ग्रीष्मात फ़ुलणारी पिवळ्या फ़ुलांची झाडे. पण प्रत्येकाला स्वताचे एक व्यक्तिमत्व आहे. वसंताची पहिली चाहुल सोनमोहोराला लागते. अजुन बकीचे दोन्ही गडी आपले राखाडी शुष्क हिवाळी रुप गुरफटुन बसलेले असतात. पलाश काय तो जागा झालाय. पण ते भाग्यवान वनवासी. इथे शहरात सोनमोहोर. सोनमोहोरची फुले लखलखीत पिवळ्या रंगाची. पेल्टोफ़ोरमची तपकिरी रेषांची. लॅबरनमची झुंबरासारखी लटकलेली. लॅबरनम नाजुक नार. तिला आपलाच बहर सोसवत नाही. दमुन जाते अगदी.

आमच्या गोरेगावच्या शाळेला मुख्य रस्त्याशी जोडणारा तांबड्या मातीचा अवेन्यू होता. त्याच्या दोन्ही बाजुना पेल्टोफ़ोरमच्या रांगा होत्या. उन्हाळ्यात त्या फ़ुलांचा सडा पडायचा मातीवर. तपकिरी मातीवर पिवळ्या रंगांची रांगोळी आणि प्रत्येक झाडाचे आपले अर्धवर्तुळ. जिवंत निसर्गचित्र वाटत असे ते.

तर ... सोनमोहोर फ़ुललाय, रुतुंचे चक्र पुढच्या आ-याला आले आहे. आता येणार मौसम - मोग-याचा, गुलम…

कवडसे...

Image
Flickers
Originally uploaded by Manura. जणू उन्हाचा फ़ुलोरा...भाजरेपणाचा स्पर्श नसणारा... खिडकीच्या फ़टीतून चोरपावलाने प्रवेश करून भोवताल उजळून टाकणारा... थन्डीने गारठलेल्या मनाला ऊब देणारा... कधी पाण्यावरुन उडी घेउन नाचणारा... ग़ुलजारच्या कवितेत चमकणारा... चुलबुला ये पानी अपनी राह बहना भूलकर लेटे लेटे आईना चमका रहा हैँ फ़ूलपर