Posts

Showing posts from August, 2006

आणि तरीही...

ठसठसणा-या जखमा,
छुप्या मारेक-यांसारख्या साधतात डाव,
अचानक बेसावध पाहुन घालतात घाव,

देशभक्तांची ज्वलंत जिद्द
यातनागरातल्या किंकाळ्या
अंदमानचा निर्घ्रुण कोलु
एडनचं मणामणाचं ओझं
कापुन टाकलेला पायाचा तळवा
ऑशविट्झचं खदखदतं वंशखंदन

बलदंडांचं,
बळाच्या जोरावर "न्याय्य" ठरलेलं क्रौर्य.
बळी,
चिरडले जाणारे, तडफडणारे, असहाय्य.

या जखमा भरत तर कधीच नाहीत
नुसत्याच सवयीच्या होतात
अचानक नवा घाव बसतो
परत सगळ्या मुसमुसु लागतात

उकळते कालवणाचे काहील
पडुन बुडणारा नकोसा उत्पल
स्फोटानंतर फलाटावर,
साखळलेले उध्वस्त अवयव
टपलेल्या पेशंट गिधाडांसमोर
धपापणारं इथियोपियन पोर.

त्या क्षणी मन पार पिळवटुन आक्रंदतं
पार निपचीत अंधा-या कोप-यात आक्रसतं
चीड येते,
केवळ "मानव"च करु शकणा-या अत्याचाराची!
त्याहुन शिसारी येते,
माझ्या षंढ चिकट निष्क्रियतेची
आणि तरीही ...
आणि तरीही,
दुस-या क्षणी मी मनाचा चॅनल बदलते...
करण जोहरच्या बेगडी दुनियेची चिलीम ओढते.