Sunday, March 15, 2009

ही वाट दूर जाते ...

मुशाफिरी ही जितकी मुक्कामांची असते ना तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त तिथे पोहचायला घेतलेल्या रस्त्यांची गोष्ट असते. काही रस्ते तर इतके मोहक असतात की ते स्वत:च मुक्काम असतात.
पुणे कोल्हापुर रस्त्यावर एकदा कात्रज शिरवळची गडबड मागे टाकली, की एक 'राजस रस्ता' सुरु होतो. खंबाटकीचा घाट ओलांडला की रस्ता एखादया राखाडी सॅटीनच्या रिबीनसारखा समोर उलगडत जातो. वाई महाबळेश्वरच्या पर्वतरांगा थोडाकाळ डावीकडे सोबत करतात. मग रस्त्याच्या दोन्ही बाजुस नजर पोचते तोवर शेतं. नोव्हेंबर डिसेंबरचे दिवस असावेत. शेतातला ऊस तु-याला आलेला. मध्येच एकीकडे तु-यांचा समुद्र डुलतोय. एकीकडे तोडणी झालेला एखादा काळाभोर पट्टा. सर्व आसमंतावर धुक्याची झिरझिरीत ओढणी. मावळतीची तिरपी उन्हं आणि काना-मनाला हुरहुर लावणारी एखादी सायंधुन. बस ये सफर तो खुद जिंदगी बन जाती है.
तसा तो रुद्र्गंभीर वरंध. भोरनंतरची पठारसपाटी पार करुन तुम्ही वरंधपाशी पोचता. खिंडीपाशी थांबुन खाली डोकावुन पाहणे "मश्ट". मनात हमखास क्लिंट इस्टवुड, काउबॉय हॅट आणि एखाद्या वेस्टर्नची धुन. पत्थरदिल सह्याद्री आपल्या सामर्थ्यात मग्न, आपली दृष्टी विस्फारलेली. तीन हेअरपीन वळणांच्या शिडीवरुन घरंगळत गाडी बघता बघता घाटपायथ्याशी पोहोचते तरी आपल्या डोळ्यापुढचा काळा पहाड हलत नाही. तसें सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वांदरांसारखे खेळणारे सगळे घाट - मुंबईला जातानाचा बोर घाट (जुना बरंका! आता एक्स्प्रेस झाल्याने बुजुन लांब गेलेला नव्हे, तर हक्काने खिडकीतुन फांद्या घासणारा), तामिणी, कोयनानगर, पोलादपूर ते पार आंबोली - आपल्या परीने सुंदर आहेत पण माझ्यासाठी वरंध त्यांचा सरताज आहे.
समुद्राच्या काठाकाठाने जाणारे रस्ते म्हणजे दुहेरी मेजवानी असते - अगदी - स्ट्रॉबेरी आणि क्रीम - किती आठवावे, कॅलिफ़ोर्नियातला मॉन्टरे-कॅरमेलचा १७ माईल, दिवे आगर -श्रीवर्धन, नागव-काशीद करत नबाबाच्या वाड्यापाशी जंजिरा मुरुडला ठाकणारा, आंजर्ले - केळशीचा खाडी ओलांडत जाणारा - कोकण कडे आणि अबलख अरबी समुद्र यांची जुगलबंदी मोठी पाहण्यासारखी असते.
मुन्नार थेकडीचा डोळ्याचं हिरवं पारणं फेडणारा सुनियोजित जंगलांचा रस्ता, स्विट्जर्लंड्चा फर्स्टहुन खाली उतरणारा बर्फाळ, डोंगराळ, हिरवळ आणि म्युजिकली चरणा-या गाईंचा अल्पाईन रस्ता असे कितीतरी ...
हे सगळे रस्ते मनी वसले ते त्यांच्या रमणीयतेने. पण काही रस्ते आणि वाटा आठवतात कारण त्या 'आपण' चाललेले असतो. मित्रांना गोळा करत शाळेला जायचा आपला रस्ता, मैदानापार जाताना नेहमी निवडलेली एकच चिमुकली पायवाट, कारने जाताना पारावरच्या गांधीटोपीवाल्याने दावलेला खालल्या अंगाचा शॉर्टकट, आणि ती न निवडलेली वाट ...
शाळेतुन परत येताना, शेवटच्या वळणावर, स्वाती आपल्या घराकडे वळायची, पुढचा किलोमिटर मला एकटीला पार करायचा असायचा, उन्हात तळपणारा फक्त माझ्या एकटीचा असा निखळ रस्ता. अजुनही एखाद्या दुखर रात्री स्वप्नात येतो.
रस्त्याची ही एक मोठी मुश्कील असते, तुम्हाला वाट माहित असली तर तो पार मुक्कामाला घेउन जातो, नाहीतर कुठेच जात नाही ...

Always keep Ithaca fixed in your mind.
To arrive there is your ultimate goal.
But do not hurry the voyage at all.
It is better to let it last for long years;
and even to anchor at the isle when you are old,
rich with all that you have gained on the way,
not expecting that Ithaca will offer you riches.
Ithaca has given you the beautiful voyage.
- From "Ithaka" by C. P. Cavafy.