Tuesday, September 12, 2006

तीन संदर्भ

सप्टेंबरचे दिवस. कुळाचाराचे, उपासा-मोदकांचे. आणि शिवाय बुचाच्या फुलांचे. माझ्या अंगणात दोन बुचाची झाडे आहेत. पावसाचा भर ओसरल्यावर थंडीची किनार असलेली हवा पडते. आसमंतात सुगीचा सुगावा लागायला सुरवात होते. खरंतर शब्दात नाही सांगत येणार तो हवेचा तरतरीतपणा - crispness. अश्यावेळी माझी नजर बुचाच्या झाडांकडे असते. अरे, यांना अजुन कशी जाग आली नाही? इतर वर्षभर 'उंच झाडे' अश्या सामान्य कुळातले बुचबाबा या दिवसात संगीत होतात. एके दिवशी अचानक एखाद्या फांदीवर पांढ-या लांब कळ्यांचं झुम्बर दिसु लागतं आणि पाहता पाहता एवढी थोरली झाडं अलवार भासु लागतात.
बहुतेक वेळा कोप-यावरचा बुचोबा पहिला नंबर लावतो आणि लॉ कॉलेज रोड वरचा बुच समुदाय पिछाडी सांभाळतो. रात्री त्या रस्त्याने परतताना परिमळ तुम्हाला कवेत घेतो. सहज नजर वर जाते. वरचे वृक्ष मजेत डोलतात, आम्ही पण आहोत म्हटलं! घरातही तो सुगंध हलका पसरतो. मला 'जाणिवश्रीमंत' करतो.
गेल्या वर्षभरात या झाडाशी साहित्यिक आप्तसंबंध जुळला. विद्द्युलेखा अकलुजकरांचं भाषावेध हे शब्द व्याकरण भाषा याबद्दल लिहिलेल्या स्फुटांचं एक छान पुस्तक आहे. त्यात त्यांनी इंदिरांच्या गर्भरेशिममधिल एका कवितेतल्या बुचाच्या फुलाच्या उल्लेखाचा संदर्भ दिला (आहे की नाही संदर्भाचा संदर्भ! pointer to pointer) नंतर विद्द्युतना सुनिता देशपांडेंनी बुचाचे आणखी एक नाव सांगितले 'गगनजाई'. इंदिराबाईंनीही पुढ्च्या अवृत्तीत आपल्या कवितेत बदल केला. परत एकदा शांता शेळके यांच्या पुस्तकात या फुलांचा उल्लेख आला. त्यांनी नाव सांगितले गगनमोगरा. असा हा तीन संदर्भांनी अधोरेखित झालेला गंधवृक्ष या वर्षी आधिक सुगंधित भासतो आहे.

हे लिखाण करुन संध्याकाळच्या स्वैपाकाला लागले. भरुन आलेले आभाळ कोसळु लागले होते. तेवढ्यात लेक घरी आली. चिंब भिजलेली. तिला ओरडायला मी श्वास घेतला तेव्हढ्यात तिने पाठीमागचा हात पुढे केला. हातात तिने वेचलेल्या बुचाच्या फुलांचा गुच्छ! 'तुला आवडतात ना? म्हणुन आणायला गेले होते!' ...

and ladies and gentlemen, my cup runneth over.

Tuesday, September 05, 2006

बुकशेल्फ

झी मराठी वाहिनीवर रविवारी दुपारी एक ते दीड बुकशेल्फ नावाचा वाचनावर आधारित कार्यक्रम प्रसारित होतो. शनिवारी सकाळी पुनर्प्रक्षेपित होतो. त्यात नविन पुस्तकांची ओळख असते, काही वाचनवेड्यांच्या ओळखी असतात, टॉप फाईव पुस्तकं असतात. अतुल कुलकर्णी मन लावुन हा कार्यक्रम सादर करतो. शक्य असेल तर जरुर हा कार्यक्रम जरुर पहा.
काही वेळा कार्यक्रमाचा फॉर्म बदलला तर अजुन मजा येईल. लेखकांच्या मुलाखती, साहित्यजगतातील घडामोडी वगैरे. मला असे वाटते की कधी कधी कवितेचा भाव न लक्षात घेता, अतुल त्या जास्त "गहि-या" (Intense) वाचतो. पण हे केवळ गालबोट.
कार्यक्रम चांगला असल्याने कधी बंद पडेल याचा नेम नाही.
तर त्या निमित्ताने माझा तुम्हाला प्रश्न: तुम्ही का वाचता? वेळ घालवण्यासाठी, आहे अश्या जगापासुन सुटका मिळवण्यासाठी, विरंगुळा म्हणुन, का व्यसन आहे म्हणुन?