Posts

Showing posts from April, 2006

हे वाचले ...

पद्मगंधा दिवाळी अंकात मारुती चितमपल्लींची सुरेख दीर्घ मुलाखत वाचली. त्यांनी सांगितलेल्या अरण्यकथा वाचुन कुतुहल वाढलॆ आहे. लवकरच त्यांचे आत्मचरीत्र वाचायला हवे. पद्मगंधा ही वाचनीय होता. रवीमुकुल यांना धन्यवाद द्यायला हवेत.

इरावतींचे गंगाजळ परत वाचले. इरावती, दुर्गाबाई, गौरी, जी.ए, हे सर्व माझे नित्य पाठाचे लेखक आहेत. त्यांचे लेखनाच्या मधुन मधुन आवृत्या करायच्या. कारण काही काळानॆ त्यांच्या लेखनातलॆ काही पदर हरवतात माझ्याकडुन. आणि काही वेळा मी अजुन थॊडी शहाणी(!) झालॆ असल्याने नवीन पदर सापडतात. या वेळी प्रकर्षानॆ जाणवलॆ ते त्यांचॆ म्हातारपणावरचॆ विचार. त्यांच्या तार्कीक विचारांनी अंगावर एकदम काटा आला.

मिलींद बॊकील यांची शाळा आणि झेन गार्डन. शाळा इतकी वास्तवाला धरुन होती की ते पुस्तक वाटेच ना मला. माझ्याच वर्गातल्या एखाद्या बावळट मुलाने ( शाळेत सगळीच मुलॆ अगदी चवळटबा असतात हे आद्य सत्य आहे!) ते लिहीलॆ असे वाटले मला! झेन गार्डन रेखीव आहे.

डॉ. राम भोसले यांच्यावरचे, "दिव्यस्पर्शी". ह्या पुस्तकाचा एक उतारा मी एका दिवाळी अंकात वाचला होता, मग सगळे पुस्तक वाचले. अद्भुत आहे. एका व्यक्तीच्य…

योगायोग

पु. ल. नी आपल्या बहारदार शैलीत लिहिलेले कनिष्टभगिनीविवाहयोग आदि योग आठवत असतील ना तुम्हाला? याला कदाचित संगणक प्रभाषेत डिजाईन पॅटर्न्स म्हणता येतील. तसेच काही योग मला आढळू लागले आहेत. तर आता नमनघटतैलयोग संपवुन मूळ योगांकडे वळते.
कसोटीपर्जन्ययोग - अर्थात सामना सुरु झाला की हमखास पाऊस पडणे. हे इतके हमखास आहे की सरकार खास दुष्काळी भागात सामनॆ भरवण्याचा विचार करत आहे. संस्कृतीरक्षकांनी आक्षेप न घेतल्यास, तो विचार तडीस जाईल ही कोणी सांगावे? ह्या योगाचे इतर अवतार येणेप्रमाणे: सिनेमाला जायचे म्हणुन ऑफिसमधुन लवकर निघायचे ठरवले की क्लायंटने कॉन्फरन्स कॉल करणे. समारंभाला जायला आपण छान जामानिमा करुन बाहेर पडल्यावर समॊरच्या वाहनाने आपल्या पोषाखावर खडीवर्क करणे, किंवा चप्पल तुटणे. आलं ना लक्षात? या योगाचा आपल्या महत्वाच्या कामांवर (उदा. दांडी मारण्यासाठी थाप मारणे) परिणाम होऊ नयॆ म्हणुन आपण काळजी घेतॊ, अभेद्य व्युहरचना करतो. पण हा योग एका नाजुक आघाताने आपल्याला चारी मुंड्या चीत करून टाकतॊ.
सण‌अभ्यासपरीक्षान्याय - परीक्षा या नेहमी अशा ठेवायच्या की त्या सणाला लागून आल्या पाहिजेत. त्यातही भीषण विषय तर …

हरवलॆ ... गवसले..

ब-याच दिवसांनी एखादे विसरलेले गणे ऐकायला मिळाले की पुन:प्रत्ययाचा एक वेगळाच आनंद मिळतॊ नाही? एखादं गाणं सारखॆ सारखॆ ऐकुन अतिपरीचयात‍ अवज्ञा होते कधी कधी. पण थोड्या दिवसाने ते गाणे ऐकले तर परत लाडके बनते. माझी लेक लहान होती तेंव्हा मी तिची काही खेळणी अशीच वरच्या कपाटात ठेवुन द्यायचे. मग काही आठवड्याने तो "हॅलोप्रसाद" भेटला की काय खुष व्हायची ती!
प्रणयाची गोडी ही विरहाने वाढते. साध्या साध्या प्रसंगात, प्रिय व्यक्तिची अनुपस्थिती टोचायला लागतॆ.
मला वाटते की आपल्याकडे असणा-या गॊष्टी गृहीत धरतॊ आपण,त्यांची योग्य किंमत करत नाही. विरहाने परत जाणीव होते, काखेतल्या कळश्याची.
फक्त तो विरह कायमचा न घडॊ एव्हढीच प्रार्थना.