Wednesday, April 27, 2016

Relevance

चौदा सोळा वर्षाची असेन, उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमीप्रमाणे आजोळी मुक्काम होता. मावस-मामे भावंडे जमुन हुंदडण्याचे विविध प्रकार आजमावत होतो. त्यातलीच एक टूम, पद्मावती कडुन तळजाई टेकडी चढायची. वरच्या पठारावरुन चालत जाउन, मागच्या बाजुने पर्वती चढायची मग पाय-यानी उतरुन, बस पकडुन परत.

माझ्या आठवणीतलं पद्मावतीचं देऊळ, गावातल्या नांदत्या गाजत्या वाड्यासारखं होतं.फरसबंद अंगण, विहीर, अंगणात मोठे वृक्ष, मध्ये देउळभवताली छोट्या देवळांची ओळ. भाविकांची माफक वर्दळ.  आपल्या तान्ह्याला पहिलं देवदर्शन करायला घेउन आलेली एखादी पहिलटकरीण आणि तिच्या सोबतीला आई, वहिनी नाहीतर बहिणकांजिण्या झालेल्या मुलांच्या आयांनी ठेवलेला दहीभाताचा नैवेद्य. आणि या सगळ्यांवर मायेने आणि अधिकाराने पाखर घालणारी देवी

तर आम्ही सगळे टेकडी चढुन पठारावर पोचलो. डोळे मिटुन घ्यावे असे वाटणारा भणाण वारा. कानात वारा भरलेल्या वासरांसारखे सुटलेले आम्ही सगळेपठार सगळं मोकळंचउन्हाळ्यात वाळल्या गवताचं आणि लाल पायवाटांच माळरान

वाटेने पर्वतीकडे जाता जाता, आम्हाला एक एकुटवाणा पडझड झालेला जुना बंगला लागला, म्हणजे बंगल्याचं खंडहर. झालं सगळी वानरसेना, फास्टर फेणे आविर्भावात, संशोधन करायला लागली. एक मजली. बहुतेक खोल्यांचं छत कोसळलेलं, पण जिना शाबुत, आणि पोर्चवर गच्ची होती, छान निळं कवडीकाम केलेली.
माझं मन थबकलं, विचार करु लागलं, का ही वास्तु इथे बांधली असेल, एकांतात, आणि का अशी ओसाड पडली असेल, विस्मृतीत गेली असेलएखाद्या भल्या घरच्या बाईला अवकळा आल्यासारखी.  "का विसरले हिला सगळे?" मी म्हणाले.
तिथे एक चोवीस पंचवीस वर्षाचा मुलगा स्केच करत बसला होता. त्यालाच विचारल्यासारखं आपल्या पोक्त आणि ज्ञानी आवाजात म्हणाला "Everything has relevance only in its time"

माझ्या आयुष्यातला त्या वास्तुचा relevance तिथेच संपायचा. पण का कोणास ठाउक, ती वास्तु माझ्या अंतर्विश्वात वस्ती करुन आहे. अचानक एखाद्या निवांत क्षणी आठवते. मग मी तिची गोष्ट घडवते. तिच्या जहागिरदार मालकाची, जिच्यासाठी हा बंगला बांधला त्या त्याच्या प्रेयसीची, तिने घालवलेल्या एकटया रात्रींची, जहागिरदार वस्तीला आल्यावर लावलेल्या हंड्या झुंबरांची, पोर्णिमेच्या चांदण्यात न्हाउन निघालेल्या कवडीकामी गच्चीचीपण त्या कहाणीचं शेवटचं प्रकरण नाही घडवत मी कधी, माझ्या मनात अजुन relevant  आहे ना ती अजुन

Saturday, February 13, 2016

लालीची गोष्ट

गोरेगावला पाच नंबरच्या ब्लॉकमध्ये मल्याळी कुटुंब राहायचं. दोन वर्षाची लाली आणि तिचे आई बाबादोघे नोकरी करायचे. आई घराबाहेर असायची तेवढ्या वेळ लालीला सांभाळायला एक बाई घरी यायची व्यवस्था केली होती त्यांनी
एका रविवारी लालीच्या आईने तिला सफरचंद भरवायला घेतलेलालीला समोर बसवुन, फोडी केल्या, सालं काढलीआणि फोड लालीसमोर धरली, तर लालीने नेहमीचं असल्याप्रमाणे, साल उचललं आणि खायला सुहरवात केली. आईने परत फोड पुढे केली. लाली म्हणाली, 'ते नाही, हे खायचं असतं' . आईला ब्रम्हांड आठवलं, तपासाअंती कळलं की सांभाळणारी बाई तिला सालं खायला द्यायची आणि स्वत: फोडी खायचीएखाद्या च-यासारखी ती आठवण राहिली आहे माझ्या मनात
 सध्या आपल्या समाजाचं लाली सारखं झालंय. आपण ही  नुसत्या सालीच खातोय.   खेळ खेळत नाही बघतो. बातम्या नाही मतं ऐकतो. देशाभिमानाचं भरतं आलं तर पोस्ट्स बनवतो नाहीतर फॉरवर्ड / लाईक करुन आपण किती देशाभिमानी अशी स्वत:ची पाठ थोपटतो
हा चरा तर रोजच उठतोय

नविन अध्याय

गेली काही वर्ष प्रार्थमिकता बदलल्याने माझा ब्लॉग सुप्तावस्थेत गेला होता. आता परत लिहवेसे वाटु लागले आहे तेंव्हा सुरु करते...
थोडा बाज बदलतेय. डायरी कम नोंदवही सारखी टिपणं करेन म्हणते आहे.  म्हणुन अनुदिनी.
आपला लोभ असावा...

Thursday, May 03, 2012

यमकविता

गाडी चालवताना येणा-या वाह्तुक-हताशतेला कमी करण्याचा एक हमखास उपाय म्हणजे जाहिरात फलक वाचणे!

ताज्या नेमणुका, कुस्तीचे विजय़ी वीर, जयंत्या आणि वाढदिवस ....

नुकतीच वाचण्यात आलेली एक अफलातुन कविता.. की जी वाचल्यावर तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी ३ वर्षांचे ब्लॉगमौन सोडावेसे वाटले. तेंव्हा मुलाहिजा फर्माइये

भीमाने लिहीलेली घटना पाक आहे
म्हणुन विषमतेला धाक आहे.
इतरांचे ठाउक नाही पण
आमचे भाऊ पुण्याचे नाक आहे

अधिक काय लिहावे?
कळावे रुमाल असावा ही विनंती.

Tuesday, October 20, 2009

आट्यापाट्या

वाचायच्या छंदाचा, छापील "म्यॅटर" हा एक भाग झाला. पण हा छंद पुरवण्यासाठी इतरही अक्षर वाङमय उपलब्ध असते. माझ्या वाचनवेडाचा एक मोठा भाग पाट्या वाचणे हा आहे. अगदी अक्षरओळख झाल्यापासुन,वाहनात बसले की मिळेल त्या खिडकीला नाक लावुन वेगाने मागे पडणा-या पाट्या वाचणे हा एक लाडका उद्योग आहे. आणि आजवर तो अव्याहत चालु आहे.
बरं पाट्या वाचायच्या कश्या? तर काही लोक ’सकाळ’ पेपर वाचतात की नाही, पहिल्या पानाच्या वरच्या डाव्या कोप-यातल्या आजच्या दुर्वांकुर (ही पुण्यातली जगप्रसिद्ध मराठी थाळी प्लेस (खानावळ म्हणायचे नाही!) ) च्या थाळी मेनुतील सिताफळ रबडी पासुन ते पार शेवटच्या पानावरच्या ... मुद्रणालयात छापुन प्रसिद्ध झाले पर्यंत. तशी प्रत्येक पाटी वरच्या श्री वगैरे देवनागरी किंवा कधी गुरुमुखीत लिहिलेल्या शुभंकरापासुन ते उजव्या कोप-यातल्या प्रोप्रा. भिका ढेकणे पर्यंत. ह्या आधारे दुकानदारांची आवडती दैवते आणि रंगा-यांचे शुद्धलेखन यावर प्रंबंध लिहायचे आमच्या मनात घाटत आहे. मुख्य चुका असतात त्या अनुस्वाराच्या आणि रफाराच्या. अंम्बाई आशीवार्द ह्या तर फारच कॉमन. आणि त्या मी चालता चालता उच्चारुन बघते आणि जो माझा चेहरा बावळट होतो म्हणता. तुम्ही बघा बरं उच्चार करुन. शिवाय न - ण ची अदलाबदल, इंग्रजी स्पेलींग्स ह्याबद्दल तर बोलणे नलगे.
पाट्यांच्या नावाची पण फॅशन असते आणि ती बदलत असते. जुन्या दुकानांची नावं ’धी न्यु’ नी सुरु होतात. ’धी न्यु अनिल बेकरी’ आणि केस कापायच्या दुकानाचं नाव खुपदा सन्मान असतं! बेक-यांची नावं इंग्रजी असतात - ग्रीन, वोल्गा इ.
नव्वद च्या दशकात पुण्यात, सामानाने ओसंडुन वाहणा-या टीचभर वाण्याच्या दुकानांना ’सुपर मार्केट’ नाव द्यायची फॅशन होती. साड्यांच्या दुकानांच्या नावाची एक वेगळीच त-हा. तीन अक्षरी ईकारान्त हा नियम. मग त्यात बसणारे जे काही निघेल ते नाव!
पण काही दुकानं मात्र अशी काही पाटी मिरवतात की बोलणच खुंटतं. दादरजवळ एका रस्त्यावर मला एका लॉंड्रीचं नाव वाचायला मिळालं ’सुरेश वस्त्र स्वच्छालय व रंगालय’! हे म्हणजे पुरणपोळीला हरभ-याच्या डाळीचा गोड पराठा म्हणण्यासारखं झालं!

ह्यानंतर मग दुसरा नंबर लागतो तो होर्डींग्सचा. ह्या जाहिरात फलकांच्या वर्गवा-या आहेत. वाढदिवस शुभेच्छा एक विशेष प्रकरण. तर काही जाहिराती मात्र आवर्जुन वाचण्यासारख्या असतात. लकडी पुलापाशी असणारी अमुलची खुसखुशीत जाहिरात एकदम मन प्रसन्न करते. किंवा रेसिडन्सी क्लबच्या चौकात लावायचे ती राजकारणावरची भाष्ये. ह्यात सगळ्यात केविलवाणा प्रकार म्हणजे सरकारी जाहिराती. लडाखच्या आमच्या प्रवासात छांग-ला खारदुंग-ला असे खंदे पास आम्हाला नापास करायचे जोरदार प्रयत्न करत असायचे - खोल द-यांचा रस्ता आणि वाटेवर या यमकजुळवण्या - "जानकारीही एड्ससे बचायेगी" नाहीतर "पढीये और बढिये"! अरे प्रसंग काय? तु लिहतोस काय! पण परिस्थीतीशी संबंध नसणे हे तर यंत्रणेचे लक्षण आहे ना!

हे सगळे मनोरंजन पुरेसे नसले तर विविध इमारतींची नावे हा पुढचा प्रकार. सरकारी इमारतींवर असलेली तीन भाषांमधली नावं - नाही चुकले - नामाभिधानं वाचली की आपल्याला मराठी येते, हिंदी समजते यावरचा विश्वास उडुन जातो. एका रेल्वे स्टेशनवर पाटी होती, ’उपरी उपस्कर’! म्हणजे काय, हे कुठल्या भाषेत आहे ह्या चा मला आजिबात बोध झाला नाही! आणि त्याचं इंग्रजी वाचायच्या आत गाडी हललेली! रेल्वे खात्याच्या संस्कृती जतनाला पण दाद द्यायला हवी हं कशाला काय नाव देतील सांगता येत नाही! एक उदाहरण, मला वाटतं कल्याण किंवा कर्जत स्टेशन जवळ आहे. दोन रेल्वे लाइनींमध्ये असणा-या रुमालाएवढ्या जागेत "वृक्षारोपण" केलेले आणि त्याचे नाव काय असेल? "लुंबिनी वन"! पु. लं. चं चैत्य शौचकुप आठवुन मी ही "बुद्धं शरणं" म्हणते!

सोसायट्यांना आणि बंगल्यांना दिलेली नावं हे आणि एक प्रक्रण. साध्याभोळ्या घरांची नावं कशी "..कृपा" "..इच्छा" "..आशीर्वाद" ने संपणारी असतात. अशा घरी गेलात तर काकु तुम्हाला नि:संकोच फोडणीची पोळी खातोस ना म्हणुन विचारतात आणि तुम्ही ही खुश होवुन काकु दही आणि लोणचं पण द्या असं मांडी ठोकत म्हणता! तर काही बंगल्यांची नावं उच्च वगैरे अभिरुची दर्शवणारी असतात - गुलमोहोर - रजनीगंधा नाहीतर आपण कसे बहुप्रवासीत आहोत हे दाखवणारी अखनुर - चिनार - प्रवदा! ह्या सगळ्यात माझ्या डोक्यात राहिलंय ते काकाकुवा मॅन्शन! एकदम "मेन्शन नॉट’ आहे बुवा!
फ़्लॅट घेताना इतके निकष लावतो आपण की सोसायटीचं नाव हे तसं खालच्याच नंबरावर असतं पण परवा मी एका सोसायटीचं नाव "बाबुराव रेसिडेन्सी’ बघितलं आणि चोवीस एक कुटुंबं तरी तिथे रेसिडेन्ट होती! अपनेसे नही जमता भय्या! तुम्ही म्हणाल की नावात काय आहे! पण तसं नाही बरका! आईबापांनी सुड घ्यायला दिल्यासारखी ’कुंतल" सारखी अति तलम किंवा ’विश्वंभर" सारखी संस्कृतीरक्षक नावं ज्यांनी शाळेत डिफेंड केली आहेत ना, त्यांना विचारा नावात काय असंतं ते. आणखी एका कुलाब्यातल्या अपमार्केट "अपार्टमेंट कॉम्प्लेक्स" चं नाव आहे ’विधी’! कुठले ते विचारायचा फार मोह होतो अश्यावेळी! तशी सध्या इमारत नावं काहीही असतात, कात्रजजवळ बनणा-या एका स्कीमचं नाव "झीग्रत" आहे. "बाबिलोनियन संस्कृतीचे पुण्यावर आक्रमण" असे हेमंत व्याख्यानमालेत एक पुष्प गुंफायला हरकत नाही.

पुणेरी पाट्या आणि ट्रकसाहित्य तर नेटवर प्रसिद्ध आहेच. पण त्यातली चित्रकला थोडीशी उपेक्षित राहिली असे मला वाटते. "कूतरयापासून सावध" च्या शेजारी काढलेला प्राणी आदिवासी चित्रांच्या तोडीचा असतो! आणि नाकात बोट खुपसणा-या "वेलकम" बायका तर ट्रकसाहित्याची भारतीय संस्कृतीला देण आहे! शिवाय "घर कब आओगे" शेजारी पृष्ठभागातुन झाड उगवलेली पंजाबी कुडी हे प्रसिद्धीपथावरचे आगामी चित्र आहे! रसिकांनी नजर ठेवावी.

तर अश्या या पाट्या -- प्रसाधन गृहाच्या हात वाळवायच्या यंत्रावरच्या ’हे हात वाळवायसाठी आहे, रुमाल वाळवायला वापरु नये" या पाटीपासुन ते अशोकस्तंभावरच्या सत्यमेव जयते पर्यंत जळी-स्थळी पसरेलेल्या. कधी मनोरंजन करणा-या तर कधी अंतर्मुख. पण जिथे जाईन तिथे सोबत करणा-या मैत्रिणी!

Saturday, August 08, 2009

सोहळा

नुक्ताच Kate and Leopold पाहिला. त्यातला Leo हा १८७६ मधुन एकविसाव्या शतकात आलेला Duke of Albany असतो. वर्तमानातली धावपळ बघुन तो म्हणतो,

" Where I come from, Dinner is the result of reflection and study! Ah yes, you mock me. But perhaps one day when you've awoken from a pleasant slumber to the scent of a warm brioche smothered in marmalade and fresh creamery butter, you'll understand that life is not solely composed of tasks, but tastes."

ते बघताना मनात विचार आला, खरंच का आपण केवळ उपयुक्ततेकडेच लक्ष देतो? पेशाचा धंदा करतो, सणांचा, उत्सवाचे कर्मकांड करतो. रोजच्या जगण्याची मुषकधाव (Rat Race). मग या सगळ्यातुन जीवनाचा सोह्ळा केंव्हा होतो? मनातुन हुंकार आला ...

सकाळी चालायला जाताना झाडांची झालर असलेला रस्ता निवडतो. आता पुष्प ऋतु सुरु झाला आहे. अनामिक फुलगेंदाचा, वैरागी प्राजक्ताचा, उत्फुल्ल जाईजुईचा वास छाती भरुन घेतो तेंव्हा ...

पाउस धो धो कोसळु लागतो. आपण चार सवंगडी जमा करतो. दूर आपल्या निर्मनुष्य द-याडोंगराकडे कुच करतो. धबाबा आदळणा-या तोयाने हरखतो. डोंगराला येंघुन, शेवाळ्या गोगलगायीतुन धबधब्याच्या कुशीत बाळासारखे विसावुन आसपासच्या आदिम सृष्टीकडे पाहतो तेंव्हा...

नैवेद्याचा स्वैपाक चालु असतो, आजीचे कुशल सुग्रण हात, मोदकाचं कमळ घडवत असतात. समोर "शाण्यासारख्या" बसलेल्या पिटुकल्या नातीचे डोळे सारखे सारणाकडे वळत असतात. आजी हसुन सारणाचा घास नातीमुखी घालते तेंव्हा...

नवश्रीमंत आईनी हौसेने आणलेली सोन्याची राखी बघुन बिटटूचा चेहरा पडतो. मग संध्याकाळी त्याने दिलेल्या ओवाळणीच्या पैशातुन ‘हनुमान’ राखी घेउन रिया घरी जायच्या आधी बिल्डींगखालीच त्याच्या हातावर बांधते तेंव्हा...

मलाका स्पाईसच्या रुणझुणत्या मेणबत्तीच्या प्रकाशात, माझ्यासमोर बसलेला तो एका गालात हसत माझ्याकडे बघतो तेंव्हा...

Monday, June 29, 2009

माझेच मत

उचलली जीभ की लावली टाळ्याला या थाटात सतत भडक मते मांडणा-या सर्वांस ठणकावुन ...
माझेच मत

१. बुटक्या माणसांनी रूंद टाय घालु नयेत, ते सोंडेसारखे त्यांच्या तोंदावर रुळतात
२. सफारी हा अतिशय अजागळ वस्त्रप्रकार असुन त्याची तुलना फक्त रिना रॉयच्या भडक पॅडलपुशर्सशी करता येते.
३.विढेरपोट्या (वेशेषेण ढेरपोटे इति) माणसांसाठी इन शर्ट शिवणा-या शिंप्याना इंजिनिअरींगची डिग्री द्यावी.
४. पॅंट नेसल्यावर ( हो माहित आहे मला, की घालणे हे क्रियापद जास्त प्रचलित आहे पण माझे मत, माझे क्रियापद!) पायात सॅंडल आणि पैंजण घालायला कायद्याने बंदी करावी

Sunday, April 05, 2009

मोहर


मनुके, Dearest,

आजीच्या बागेत काल अनगढ मोहर दरवळत होता
कुठला? विचारलं, तर ती हसली खुदकन

आकाशात ठळक होत जाणारी चांदणी पाहताना
ती सांगत असते तुझ्या चंद्रकला
कसा सायसाखर होतो तिचा आवाज
मी, तुम्हा दोघींमध्ये हेलकावणारी तृप्त 'संध्या'

तुझी आई, माझी बहीण,
तुझ्यासाठी दारी लावते आंब्याचं झाड
मावशी म्हणुन मी मात्र,
करणार तुझे लबाड लाड

बघता बघता मोठी होशील बयो!
माझ्या खांद्यावर कोपर ठेउन उभी राहशील!
मान उंच करुन बघताना तुझ्याकडे,
मनातल्या मनात म्हणीन मी,
आत्ता कुठे जरा जरा
मला उमजु लागलाय
मोहर ... दरवळ ... अनगढ