सुवर्णध्वजा

पुण्यात वसंताचे आगमन झाले आहे! तसे सुचीत करणारी सुवर्णध्वजा मी आजच पाहिली. आमच्या officeसमोरचा सोनमोहोर लख़लख़ीत फ़ुलला आहे. वसंत आला ह्याची ख़बर मला तोच देतो दरवर्षी. सोनमोहोर, पेल्टोफ़ोरम, लॅबरनम ही सगळी वसंत, ग्रीष्मात फ़ुलणारी पिवळ्या फ़ुलांची झाडे. पण प्रत्येकाला स्वताचे एक व्यक्तिमत्व आहे. वसंताची पहिली चाहुल सोनमोहोराला लागते. अजुन बकीचे दोन्ही गडी आपले राखाडी शुष्क हिवाळी रुप गुरफटुन बसलेले असतात. पलाश काय तो जागा झालाय. पण ते भाग्यवान वनवासी. इथे शहरात सोनमोहोर. सोनमोहोरची फुले लखलखीत पिवळ्या रंगाची. पेल्टोफ़ोरमची तपकिरी रेषांची. लॅबरनमची झुंबरासारखी लटकलेली. लॅबरनम नाजुक नार. तिला आपलाच बहर सोसवत नाही. दमुन जाते अगदी.

आमच्या गोरेगावच्या शाळेला मुख्य रस्त्याशी जोडणारा तांबड्या मातीचा अवेन्यू होता. त्याच्या दोन्ही बाजुना पेल्टोफ़ोरमच्या रांगा होत्या. उन्हाळ्यात त्या फ़ुलांचा सडा पडायचा मातीवर. तपकिरी मातीवर पिवळ्या रंगांची रांगोळी आणि प्रत्येक झाडाचे आपले अर्धवर्तुळ. जिवंत निसर्गचित्र वाटत असे ते.

तर ... सोनमोहोर फ़ुललाय, रुतुंचे चक्र पुढच्या आ-याला आले आहे. आता येणार मौसम - मोग-याचा, गुलमोहोराचा- कलिंगडांचा - आंब्यांचा - जांभळांचा - कोकिळेचा....

Comments

Popular posts from this blog

तुमचा स्कोर किती आहे?

जन हित मे जारी

वाळवण