Tuesday, October 17, 2006

सांग सांग भोलानाथ!

आपल्याला आवडलेली साडी नेहमी आपण ठरवलेल्या रेंजच्या बाहेर का असते?
सौंदर्यप्रसाधने विकणा-या पोरी नेहमी आगाऊ आणि गि-हाइकांकडे पुर्ण दुर्लक्ष करणा-या का असतात?
शेजारच्या बाईच्या हातातली साडी आपल्याला कायम का आवडते?
आपल्याला अवडलेल्या चदरीचा, अभ्र्याचा, टॉवेलचा एकच पीस का शिल्लक असतो?

Thursday, October 12, 2006

भरजरी

पुण्याच्या सेनापती बापट रस्त्यानं नजिकच्या काळात कात टाकली आहे. चतुश्रुंगी जवळ निर्माण होत असलेल्या संगणकीय संकुलात टोलेजंग इमारती उभ्या रहात आहेत. त्या इमारती नव्या नव्या भरजरी दुकानांनी झगमगु लागल्या आहेत. आघाडीची व्यापारी संकुले, रेस्तरॉं आणि पुण्यातले सगळ्यात मोठे क्रॉसवर्ड - पुस्तके विकत घेण्याचा अनुभव भरजरी करणारी दुकानांची साखळी. अमेरिकन धर्तीवर, पुस्तके चाळायला, वाटल्यास जेठा मारुन वाचायला वाव देणारी. त्या मुळे त्या दुकानाला भेट देणे 'मष्ट' झाले.
दुकान प्रशस्त होते पण एकंदर 'मझा' नव्हता येत. एकतर जागा भरायची म्हणुन लांबलांब मांडलेले शेल्फ्स. ते शेल्फ्स भरायचे म्हणुन ठेवलेल्या एकाच पुस्तकाच्या पाच पाच प्रती. पुस्तकंही सगळी फॅशनेबल आणि अधिक खपाची. आणि कवितांच्या पुस्तकांचा दीड खण. आणि त्या खणातली निम्मी पुस्तकं जीएंच्या भाषेत संक्रातीच्या भेटकार्डावर लायकीच्या कवितांची. हे मी इंग्रजी पुस्तकांबद्दल सांगते आहे हं मराठी पुस्तकांची आशाच नव्हती. तर अशी नाक मुरडत मी त्या पुस्तकांच्या सुगंधी गर्दीत भटकत होते. ही सुगंधी - तथाकथित बुद्धीजीवी - जमात तशी मजेशीर. पण त्याबाबत आपणही त्या जमातीत मोडतो किंवा मोडता मोडता 'वाचतो' अशी मला दाट आणि घाबरवणारी शंका आहे. तर अपेक्षेप्रमाणे मराठी फडताळात खांडेकरांचं एक, पुलंची दोन, वपुंची साडेचार, ख-यांची सहा आणि पाककृतींची पंधरा पुस्तकं दिलेल्या जागेत अंग चोरत उभी होती. या पुस्तकांवर फिरत असताना त्यातल्या एकावर नजर अडखळली. पुस्तक उचलुन बघितलं....
आणि मी अचानक बसलेल्या आश्चर्याच्या धक्क्याने स्तब्ध झाले. ते पुस्तक दुसरे तिसरे कुठले नसुन, नाथमाधवांच्या स्वराज्यमालेपैकी एक होते! ह्या भांगेत तुळस कुठुन बरे उगवली? .. सुज्ञ वाचकांनी ओळखलं असेलच की अशा प्रसंगी काळाची पानं फडफडत मागे जाणं अपरिहार्य आहे.
गोरेगावच्या दत्ताच्या देवळातली लायब्ररी ही अठरापगड वस्तीच्या वेशीवरची एक मराठमोळी ओऍसिस होती. वाचकांनी मोठ्या उदारतेने दान केलेल्या पुस्तकांवर चालणारी. तिथे मला नाथमाधवांची स्वराजमाला वाचायला मिळाली. शिवचरित्रातले (सबुर! कोणते शिवचरित्र असे विचारलेत तर हरितात्यांची शिक्षा अमलात आणली जाइल!) रोमहर्षक प्रसंग घेउन त्याभोवती रचलेले कल्पनिक कथनक., स्वराज्यासाठी प्राण वेचायला तयार असणा-या तडफदार परंतु अबला नायिका, त्याच्यावर येणारी संकटं, नायिकेच्या बटव्यातल्या प्रकाश देणा-या, प्रसंगी समोरच्याला हतबल करणार-या मुळ्या, अहाहा - माझ्या स्मृतीत ती पुस्तके सुवर्णक्षरांनी नोंदवली आहेत! त्या पुस्तकांच्या भरजरी सरंजामशाही भाषेची मजा काही और होती. पंचवीस वर्षांपुर्वीही सहजासहजी न मिळणारी पुस्तकं इथं नव्या आवृत्तीत पाहुन मला आश्चर्य वाटलं तर त्यात नवल ते काय? आणि लोकहो त्या पुस्तकाखातर, मी आत्तापर्यंत क्रॉसवर्डला मुरडलेली सर्व नाकं रिवाईंड केली आणि मनातल्या मनात म्हटले की आमच्या हातात असते तर या दुकानाच्या मालकाला गळ्यातला कंठा बहाल केला असता!