बुकशेल्फ

झी मराठी वाहिनीवर रविवारी दुपारी एक ते दीड बुकशेल्फ नावाचा वाचनावर आधारित कार्यक्रम प्रसारित होतो. शनिवारी सकाळी पुनर्प्रक्षेपित होतो. त्यात नविन पुस्तकांची ओळख असते, काही वाचनवेड्यांच्या ओळखी असतात, टॉप फाईव पुस्तकं असतात. अतुल कुलकर्णी मन लावुन हा कार्यक्रम सादर करतो. शक्य असेल तर जरुर हा कार्यक्रम जरुर पहा.
काही वेळा कार्यक्रमाचा फॉर्म बदलला तर अजुन मजा येईल. लेखकांच्या मुलाखती, साहित्यजगतातील घडामोडी वगैरे. मला असे वाटते की कधी कधी कवितेचा भाव न लक्षात घेता, अतुल त्या जास्त "गहि-या" (Intense) वाचतो. पण हे केवळ गालबोट.
कार्यक्रम चांगला असल्याने कधी बंद पडेल याचा नेम नाही.
तर त्या निमित्ताने माझा तुम्हाला प्रश्न: तुम्ही का वाचता? वेळ घालवण्यासाठी, आहे अश्या जगापासुन सुटका मिळवण्यासाठी, विरंगुळा म्हणुन, का व्यसन आहे म्हणुन?

Comments

Raina said…
मंजिरी,
हे अगदी १००% पटले " कार्यक्रम चांगला आहे- तेव्हा कधीही बंद पडेल."
आणि त्यांनी सादरीकरणात जरा बदल केले पाहिजेत. पण अतुल कुलकर्णी लाजवाब.
hemant_surat said…
फ़ार चांगला प्रश्न विचारलात. आम्ही का वाचतो? वाचणे हा एक अविभाज्य भाग आहे जगण्याचा! राहिली गोष्टं झी टीवीच्या प्रोग्रामची. तर हा प्रोग्राम चांगलाच आहे. बघितला नाही तर जरूर काही तरी गमावल्यासारखं वाटतं.
लेखकांच्या मुलखती माझ्या मते दाखवताहेत. रत्नाकर मतकरींची मुलखत पाहील्याचे मला आठवते. अतुल कविता जरा जास्तंच "गहिर्या" स्वरात वाचतो हे मात्रं खरे!
वाचून झाल्यावर आपण ठरवतो नाही का की पुस्तक वाचल्यामुळे आ्पला वेळ चांगला गेला, की जगापासून सुटका मिळाली,हां, जर कामाच्या ईन्स्ट्रक्शन्स ऎकू आल्या नाहीत वाचताना तर ते व्यसन होते. पुस्तक हा देव आणि वाचणे ही आराधना. त्याची किती रूपे हे अपणच ठरवायचे.
हेमंत सूरत
Gayatri said…
बास! आता कॅम्पसवर केबलवाल्या मराठी लोकांच्या घरी रविवारी धाड टाकलीच पाहिजे.. :)
"चांगला कार्यक्रम बंद पडणं"..मलापण पटलंच!

का वाचते..पु.लं.ना भेटलेला गिर्यारोहक 'शिखर का चढतो? कारण ते तिथं आहे म्हणून! ' तसंच वाचनाचं..त्यांच्याच भाषेत 'रक्तदोष'.
तुझ्या पर्यायांवरूनच उत्तर द्यायचं झालं तर वेळ 'मिळवला' असं वाटायला लागावं म्हणून, आहे अशा जगात अजून खोल घुसण्यासाठी, विरंगुळा म्हणूनही आणि व्यसन म्हणूनही वाचते!
Manjiri said…
raina,
अतुल लाजवाब आहेतच. पण काहीवेळा कविता तरल असते, फुलपाखरासारखी आणि ते वाचतात, एखाद्या चातकाच्या आर्ततेने मग थोडे खटकते.

हेमंत,
पुस्तक हा देव आणि वाचणे ही आराधना. एकदम कबुल!

गायत्री,
वेळ 'मिळवला' असं वाटायला लागावं म्हणून! छान पर्याय आहे.

हे सर्व पर्याय तर तंतोतंत (लंपन!) बरोबर, पण त्याच बरोबर, मला वाटते वाचन हे नव्या जगांमध्ये डोकावुन पहायची संधी असते.
नाहीतर गौरी ची नमु म्हणते तसं (माझ्या शब्दात,)
माणसं कुठे आपलं अंतरंग इतक्या खुलेपणाने तुमच्या पुढे मांडतात? पण शेक्स्पिअर, माझ्यासाठी आपले सगळे साहित्य घेउन उभा आहे. मला कायम कुतुहल असते की अमुक एक करायच्या आधी काय आले असेल त्या व्यक्तिच्या मनात!

अगस्ती,
मला तुमची coment मिळाली, मी ती प्रसिद्ध पण केली पण blogger च्या अगम्य जगात ती हरवली दिसते. my bad luck :(
पण खरच, आभार, अशी शाबासकी मिळाली की लिहायला उत्साह वाटतो!
abhijit said…
मी वाचतो कशासाठी? तशी लहानपणापासून वाचनाची ओढ आहे. तस ते खानदानी व्यसनंच म्हणा. वाचलं की खुप नव्या गोष्टी कळतात. नव्या परिस्थित्या आणि त्यामध्ये संबंधित असणाऱ्या व्यक्तिंच्या प्रतिक्रिया एक नवा अनुभव देउन जातात. जगात सगळंच काही स्वत:ला प्रत्यक्ष अनुभवता येत नाही. कधिकधी निव्वळ मनोरंजन हाही हेतु असते. शक्यतो जेव्हा कथासंग्रह वाचत असतो. काही कादंबऱ्या प्रेरणास्त्रोत ठरल्या.

वयानुसार वाचनाची आवड बदलत गेलिये. आधी द.मा. आवडायचे आता अवचट/वपु जास्ती अपिल होतात.
Milind Phanse said…
आपलं लेखन आवडलं. अत्यंत सहज आणि ओघवती शैली आहे. बुकशेल्फ हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून नित्यनेमाने पाहतोय. एक मात्र खरं की कधी-कधी कुलकर्णी जरा जास्तच 'अभिनय' करतात.
तुम्ही का वाचता? वेळ घालवण्यासाठी, आहे अश्या जगापासुन सुटका मिळवण्यासाठी, विरंगुळा म्हणुन, का व्यसन आहे म्हणुन?
ही सारी कारणं तर आहेतच पण त्यापलिकडे कोणती तरी अनामिक ओढ आहे, गरज आहे जी वाचनाशिवाय स्वस्थ बसू देत नाही. जशा शरीराच्या काही नैसर्गिक गरजा असतात तशीच ही एक मनाची गरज आहे - शब्दांच्या पलिकडली, नाकारता न येण्यासारखी.
bindhast said…
wachan ka karato ha prashna ch atta paryant padala nahiye...jase bolayala lagale..chalayala lagale tasech wachayala lagale...ase konitari mhataley ki pustakansarakha mitra nahi...ti apalyala havi tevha bolatat ani have tevha shant rahtat...

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

बागेश्री १

हाक