Posts

हाक

'व्यवस्थापकीय' पदवी मिळवुन व्यावसायिक जगात वावरणा-यांची एक जमात असते. म्हणजे 'एम बी ए' माणसं हो! ते एक विशिष्ठ परिभाषा वापरतात आणि ती सतत बदलतात. काही दिवसापुर्वी 'Facilitatorअसेल तर आता तो 'Enabler' झालेला असतो. तर अश्या मंडळींची तुमच्याशी बोलण्याची ढब असते. प्रत्येक वाक्यच्या सुरवातीला ते तुम्हाला संबोधतात. 'मंजिरी Let us first aim for the low lying fruit मंजिरी,and then we can see what is the common synergy मंजिरी' जणु काही संभाषणात इतक्यांदा हाक मारली नाही तर तो किंवा मी माझं नाव विसरुन जाउ अशी त्याला भिती वाटत असावी! ही हाक, संबोधन मोठी मजेशीर गोष्ट आहे. कोणी, कोणत्या नावाने किंवा नाव न घेता हाक मारली अश्या गोष्टी काय काय सुचवुन जातात नाही? मग ते `अहो! ऐकलं का?' असो, नटसम्राटांचं `सरकार' असो की नातीनं आजोबांना बोलावलेलं `ए विनायक आबा' असो. प्रत्येकाची वेगळी खुमारी. तशी बाळाची पहिली ट्यॅंह्यॅं - ही सुद्धा हाकच नाही का, 'अरे कोणी आहे का इकडे?' पासुन 'मला भुक लागलीय आणि तुम्ही लक्ष पण देत नाही!' सगळी बाळं आपल्या आईला आपल...

आमच्या सुंदरीचं लगीन!

स्थळ - तुमच्या आमच्या घरातलं स्वैपाकघर काळ - रविवार सकाळ साडेदहा अकरा. खमंग नाश्ता मटकाउन श्री दुस-या चहाचे घुटके घेत आहेत. हातात रविवारची पुरवणी. सौ. ओट्याशी उभ्या राहुन पोळ्या करतायेत. पार्श्वसंगीत - "व-हाडी कोण कोण येणार आमच्या सुंदरीचं लगीन ... सौ : अहो! ऐकलं का? श्री: अं . . . हं . . . सौ: झाला बाई एकदाचा साखरपुडा! मी म्हटलं इजा बिजा तिजा होतंय की काय? अभीला मात्र चांगलच गटवलं तिनी! श्री: हो! ... सौ: पण लहान आहे तो तिच्याहुन! श्री: अँ? ... मंदी कुठं मोठीय ग? सौ: अहो! कोण मंदी? मी अभीषेक ऐश्वर्याच्या लग्नाचं म्हणतेय! तसा मला काही दिवसांपुर्वीच वास लागला होता. ही बच्चन मंडळी तिला घेउन काशी विश्वेश्वराला गेली ना? तेंव्हाच मी म्हटलं की काहीतरी शिजतंय! नायकीण म्हणाली `गुरू'साठी गेले असतील! पण मी तेंव्हाच ताडलं की हे `मंगळा'साठी आहे म्हणुन! उगाच नाय ऐश्वर्यानं साड्या खरेदी केली. माझा पण लग्नाचा शालू बनारसी आहे बरं. श्री: अरे वा वा! सौ: अरे वा वा काय? साड्यांची खरेदी आम्ही केली म्हणुन! तुमच्या मंडळींवर सोडली असती ना, तर इरकल नाहीतर बेळगावी घेतली असती वन्संनी. श्री: (चहाबरोबर...

वर्गीकरण

जगात दोन प्रकारची माणसे असतात, एक, ज्यांना सतत थंडी वाजते आणि दुस-या ज्या बर्फ़ात स्लीवलेस ब्लाउज घालुन विहरतात! जगात दोन प्रकारची माणसे असतात, एक ज्यांना पु.ल. आवडतात, आणि दुसरे ज्यांना वाचता येत नाही! जगात दोन प्रकारची माणसे असतात, एक ज्यांना नाचता येतं आणि दुसरे जे विसर्जन- वरातीच्या पुढे हात वर करुन अंगविक्षेप करतात! जगात तीन प्रकारची पण माणसे असतात, एक ज्यांना मोजता येतं आणि दुसरे ज्यांना मोजता येत नाही! जगात दोन प्रकारची माणसे असतात, एक जी 'बोअर' करतात, आणि दुसरी जी 'बोअर' होतात! तुम्ही?

गाना बनै ले हुनर से मियाँ!

वा! वा! हिमेशवा वा! म्हणजे बिलकुल लाजवाब! काय गाणं पेश केलंस तू! आजपर्यंत मी समजत होतो की गाण्यांमध्ये शब्दांच्या अर्थांचे पापुद्रे तयार करणे फक्त मलाच जमते. चड्डी घातलेले फुल, चांद कटोरा घेउन चाललेली रात भिकारन सारख्या श्रोत्यांना धक्का देणा-या प्रतिमा, टाइम्स ऑफ इंडिया चं गाणं, किंवा चॉकसे चॉंदपर लिखना या सारखे नवीन प्रयोग करणं हि माझी मक्तेदारी होती. हां कहते हैं बांद्रा के उस पार किसी शक्स ने एक दो तीन कोशीश की थी। पर हर लफ्ज कोई लडकीको देखा तो लिखनेवाली नज्म तो नही होती। खैर वह कहानी फिर कभी...। पण गड्या तू जे केलेस त्याला मिसाल नाही. एक शब्द - तनहाईयाँ - त्याला आपल्या सानुनासिक स्वरांचा असा झटका दिलास, तन-हैय्या! आणि तो शब्द म्हणजे अर्थांचे आणि अर्थांतरांचे जणु एक झुंबर झाला. गाणा-याचं तन म्हणजे बाह्य रूप म्हणजे जणु एखादा अडलेला बैल नव्हे सांड. त्याला हैय्या हैय्या करणारं जग. बैलानं कोणत्याही प्रकारच्या बाह्य प्रतिक्रीयेला न जुमानणं. त्यामुळे इतर कळप पुढे निघुन गेला. हैय्या हैय्या करणारा गुराखी ही निघुन गेला. या तनहाईत बैल एकटाच उरला ... खरं सांगतो, एकसो सोला चाँद की राते जागलो त...

सांग सांग भोलानाथ!

आपल्याला आवडलेली साडी नेहमी आपण ठरवलेल्या रेंजच्या बाहेर का असते? सौंदर्यप्रसाधने विकणा-या पोरी नेहमी आगाऊ आणि गि-हाइकांकडे पुर्ण दुर्लक्ष करणा-या का असतात? शेजारच्या बाईच्या हातातली साडी आपल्याला कायम का आवडते? आपल्याला अवडलेल्या चदरीचा, अभ्र्याचा, टॉवेलचा एकच पीस का शिल्लक असतो?

भरजरी

पुण्याच्या सेनापती बापट रस्त्यानं नजिकच्या काळात कात टाकली आहे. चतुश्रुंगी जवळ निर्माण होत असलेल्या संगणकीय संकुलात टोलेजंग इमारती उभ्या रहात आहेत. त्या इमारती नव्या नव्या भरजरी दुकानांनी झगमगु लागल्या आहेत. आघाडीची व्यापारी संकुले, रेस्तरॉं आणि पुण्यातले सगळ्यात मोठे क्रॉसवर्ड - पुस्तके विकत घेण्याचा अनुभव भरजरी करणारी दुकानांची साखळी. अमेरिकन धर्तीवर, पुस्तके चाळायला, वाटल्यास जेठा मारुन वाचायला वाव देणारी. त्या मुळे त्या दुकानाला भेट देणे 'मष्ट' झाले. दुकान प्रशस्त होते पण एकंदर 'मझा' नव्हता येत. एकतर जागा भरायची म्हणुन लांबलांब मांडलेले शेल्फ्स. ते शेल्फ्स भरायचे म्हणुन ठेवलेल्या एकाच पुस्तकाच्या पाच पाच प्रती. पुस्तकंही सगळी फॅशनेबल आणि अधिक खपाची. आणि कवितांच्या पुस्तकांचा दीड खण. आणि त्या खणातली निम्मी पुस्तकं जीएंच्या भाषेत संक्रातीच्या भेटकार्डावर लायकीच्या कवितांची. हे मी इंग्रजी पुस्तकांबद्दल सांगते आहे हं मराठी पुस्तकांची आशाच नव्हती. तर अशी नाक मुरडत मी त्या पुस्तकांच्या सुगंधी गर्दीत भटकत होते. ही सुगंधी - तथाकथित बुद्धीजीवी - जमात तशी मजेशीर. पण त्याबाबत ...

तीन संदर्भ

सप्टेंबरचे दिवस. कुळाचाराचे, उपासा-मोदकांचे. आणि शिवाय बुचाच्या फुलांचे. माझ्या अंगणात दोन बुचाची झाडे आहेत. पावसाचा भर ओसरल्यावर थंडीची किनार असलेली हवा पडते. आसमंतात सुगीचा सुगावा लागायला सुरवात होते. खरंतर शब्दात नाही सांगत येणार तो हवेचा तरतरीतपणा - crispness. अश्यावेळी माझी नजर बुचाच्या झाडांकडे असते. अरे, यांना अजुन कशी जाग आली नाही? इतर वर्षभर 'उंच झाडे' अश्या सामान्य कुळातले बुचबाबा या दिवसात संगीत होतात. एके दिवशी अचानक एखाद्या फांदीवर पांढ-या लांब कळ्यांचं झुम्बर दिसु लागतं आणि पाहता पाहता एवढी थोरली झाडं अलवार भासु लागतात. बहुतेक वेळा कोप-यावरचा बुचोबा पहिला नंबर लावतो आणि लॉ कॉलेज रोड वरचा बुच समुदाय पिछाडी सांभाळतो. रात्री त्या रस्त्याने परतताना परिमळ तुम्हाला कवेत घेतो. सहज नजर वर जाते. वरचे वृक्ष मजेत डोलतात, आम्ही पण आहोत म्हटलं! घरातही तो सुगंध हलका पसरतो. मला 'जाणिवश्रीमंत' करतो. गेल्या वर्षभरात या झाडाशी साहित्यिक आप्तसंबंध जुळला. विद्द्युलेखा अकलुजकरांचं भाषावेध हे शब्द व्याकरण भाषा याबद्दल लिहिलेल्या स्फुटांचं एक छान पुस्तक आहे. त्यात त्यांनी इंदिरा...

बुकशेल्फ

झी मराठी वाहिनीवर रविवारी दुपारी एक ते दीड बुकशेल्फ नावाचा वाचनावर आधारित कार्यक्रम प्रसारित होतो. शनिवारी सकाळी पुनर्प्रक्षेपित होतो. त्यात नविन पुस्तकांची ओळख असते, काही वाचनवेड्यांच्या ओळखी असतात, टॉप फाईव पुस्तकं असतात. अतुल कुलकर्णी मन लावुन हा कार्यक्रम सादर करतो. शक्य असेल तर जरुर हा कार्यक्रम जरुर पहा. काही वेळा कार्यक्रमाचा फॉर्म बदलला तर अजुन मजा येईल. लेखकांच्या मुलाखती, साहित्यजगतातील घडामोडी वगैरे. मला असे वाटते की कधी कधी कवितेचा भाव न लक्षात घेता, अतुल त्या जास्त "गहि-या" (Intense) वाचतो. पण हे केवळ गालबोट. कार्यक्रम चांगला असल्याने कधी बंद पडेल याचा नेम नाही. तर त्या निमित्ताने माझा तुम्हाला प्रश्न: तुम्ही का वाचता? वेळ घालवण्यासाठी, आहे अश्या जगापासुन सुटका मिळवण्यासाठी, विरंगुळा म्हणुन, का व्यसन आहे म्हणुन?

आणि तरीही...

ठसठसणा-या जखमा, छुप्या मारेक-यांसारख्या साधतात डाव, अचानक बेसावध पाहुन घालतात घाव, देशभक्तांची ज्वलंत जिद्द यातनागरातल्या किंकाळ्या अंदमानचा निर्घ्रुण कोलु एडनचं मणामणाचं ओझं कापुन टाकलेला पायाचा तळवा ऑशविट्झचं खदखदतं वंशखंदन बलदंडांचं, बळाच्या जोरावर "न्याय्य" ठरलेलं क्रौर्य. बळी, चिरडले जाणारे, तडफडणारे, असहाय्य. या जखमा भरत तर कधीच नाहीत नुसत्याच सवयीच्या होतात अचानक नवा घाव बसतो परत सगळ्या मुसमुसु लागतात उकळते कालवणाचे काहील पडुन बुडणारा नकोसा उत्पल स्फोटानंतर फलाटावर, साखळलेले उध्वस्त अवयव टपलेल्या पेशंट गिधाडांसमोर धपापणारं इथियोपियन पोर. त्या क्षणी मन पार पिळवटुन आक्रंदतं पार निपचीत अंधा-या कोप-यात आक्रसतं चीड येते, केवळ "मानव"च करु शकणा-या अत्याचाराची! त्याहुन शिसारी येते, माझ्या षंढ चिकट निष्क्रियतेची आणि तरीही ... आणि तरीही, दुस-या क्षणी मी मनाचा चॅनल बदलते... करण जोहरच्या बेगडी दुनियेची चिलीम ओढते.

गप्पा

अंधार पडत होता तशी मी लेकीला हाक मारली, 'चला या घरी' 'आई पाच मिंटं' असं नेहेमीचं उत्तर देउन पुन्हा ती गप्पांकडे वळली सुद्धा! `रोज भेटतात एकमेकींना तरी यांच्या गप्पा कश्या संपत नाहीत? काय बोलतात एवढ्या?' असा विचार मनात येता येता, स्वत:चंच हसु आलं. गप्पा कधी संपतात का? `जिवश्च कंठश्च' मैत्रिणींनी रोज गप्पा नाही मारायच्या तर कोणी? गप्पा गोष्टच अशी आहे, चला मारुया म्हणुन नाही जमायच्या त्या. `चल निघते ग' म्हणुन बाहेर पडल्यावर, एकजण फाटकाच्या आतल्या बाजुला आणि दुसरं बाहेर अश्या फाटकाला लटकुन पुढे अर्धा पाउण तास मारल्या जातात त्या ख-या गप्पा. शाळा सुटली की मुलींचे घोळके बाहेर पडतात. ४ - ५ मुली एकमेकींच्यात जरा ही जागा राहणार नाही अशा एकमेकीला चिकटतात आणि जणु सयामीज ट्विन्स असल्यासारख्या एकधडाने रस्त्याने चालतात. २०% बोलणं, ६०% खिदळणं आणि २०% 'गप्प बस!' त्या एक्जीव घोळक्यातुन उत्पन्न होतं, त्या गप्पा. आता खरं तर स्कुल बस ने मुलं ये जा करत असल्यानं ही प्रथा मोडीत निघते की काय अशी काळजी लागली होती पण सांगायला आनंद होतो की मुली या मुलीच आहेत फक्त `बावळट' च...

हक्क!

मुंबईत झालेल्या घटनांनी सुन्न व्हायला झालं. अतिशय थंड डोक्याने कोणी इतक्या जणांना मारायची योजना बनवु शकतो ती प्रत्यक्षात आणु शकतो हे झेपणंच जड गेलं. मुंबईकर त्याच्या स्वभावधर्मानुसार वागले. कोणी आपल्या कामाचं नाही हे त्यांना चांगलं माहीत आहे. त्यांनीच एकमेकांचे अश्रु पुसले आणि चालु लागले. कोणत्याही युद्धात बळी पडतात ते निरपराध असहायच! मला तर कधी कधी समजत नाही की ह्यांचं कौतुक करावं की त्यांनी काही किमान अपेक्षा बाळगु नये या बद्द्ल रागवावं ह्यातुन सवरते आहे तोच लक्षात आले की आपला ब्लॉग चालत नाहीये. आधी वाटले की व्यत्यय आहे पण मग खरी गोष्ट समजली. हा म्हणजे चोर सोडुन सन्यासाला सुळी देण्याचा प्रकार! `आविष्कार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी' आहे ही! जाम वैतागले मी. मला पोस्ट करता येत आहे कारण ते संकेतस्थळ वर्ज्य नाही झालेले पण वाचता येत नाही. तणतणुन "वर्ड्प्रेस" ला हलायचा विचार केला. पण एक मिनिट.... का म्हणुन? का म्हणुन मी हलायचे इथुन? नोहे! नो वे! तेंव्हा रामगढ के वासियों चाहे गब्बर कुछ भी करले ... जब तक है मुमकिन, मै ब्लॉगुंगी!!! तुमचा लोभ असावा ही विनंती!

अनुस्वाराच्या निमित्ताने

मिलिंद च्या ' अनुस्वार ' या नोंदीच्या अनुषंगाने केलेल्या विचारानं मला काही मुद्दे सुचले. ते मी त्यांच्या नोंदीवर टिप्पणी म्हणुन टाकलेच. पण अधिक कायमस्वरुप नोंद असावी म्हणुन पुनरावृत्ती. पण त्या आधी -- मी काही माहितगार अथवा भाषेची विद्यार्थीनी नाही हे ध्यानात घ्या. १. माझ्या मते अं हा ओष्ट्व्य नाही. तो अनुनासिक आहे. ओठाचा वापर न करता त्याचा उच्चार करता येतो. २. हा अनुस्वार बेटा चुकीच्या कळपात शिरल्यासारखा वाटतोय खरा! म्हणजे इतर बाराखडी ही त्याच व्यंजनाचे आविष्कार आसतात तर हा बेटा पुढच्या व्यंजनाला जाउन चिकटतो आहे. ३. अनुस्वाराप्रमाणे 'र' या व्यंजनासाठीही किती वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे आहेत. आणि ती बाराखडी प्रमाणे परत बदलतात. जसे क्र आणि कृ - उ उलटा फिरवलेला. शिवय तोर्यात असे न लिहिता तो-यात असे लिहीलि जाते. आणि जिथे कंपित मधला अर्धा म पुढ्च्या क वर दर्शवला गेला तर सर्वात मधला अर्धा र मागच्या व वर. ४. माझे असे एक मत आहे की गेल्या शतकच्या सुरवातीला मराठी व्याकरणावर जे संस्कार झाले त्यावर इंग्रजीची छाप आहे. म्हणुन मराठीत दंड न वापरता . पूर्णविराम (Fullstop चे भाषांतर?) ...

अय्या बाई तुम्ही?

काल भाजीवालीसमोर घासाघीस करताना, शेजारी उभ्या असलेल्या बाईंकडे बघितले तर त्य मोठे कुंकु लावलेल्या हस-या बाई ओळखीच्या वाटल्या. एकदम ओळख पटली की या विज्ञानमंचच्या कुलकर्णी बाई. मी लगेच 'स्कर्ट-ब्लाउज, दोन वेण्या' मोड मध्ये गेले. आणि म्हणाले, "अय्या बाई तुम्ही!" बाईंना अश्या बावळटपणाची बरीच सवय असावी. त्यांनी ओळख विचारली, गप्पा मारल्या. त्यांच्या बरोबर आलेली त्यांची नात चुळबुळ करायला लागली तसे बोलणे आवरते घेत आम्ही आपापल्या मार्गाला लागलो. पण या आजी - बाई मला पटेचनात. नातीची समजुत काढणा-या आजी आणि माझ्या बाई यात मला दुवाच सापडेना. खरं तर गोरेगावच्या मराठी शाळेत शिकल्याननंतर माझ्याही आयुष्याने वळणं घेतली होती की. मन चटकन शाळेत धावलं, तो पेल्टोफोरमचा पिवळा सडा पडलेला तपकिरी रस्ता. भलं थोरलं आवार, बैठी शाळा, आणि त्यावर अम्मल गाजवणा-या आमच्या सगळ्या शिक्षिका. त्यांनी खरच आम्हाला घडवलं, नियमाबाहेर जाउन पुस्तकं दिली, विषयांची गोडी लावली. माझ्या केळकर बाईंमुळे शास्त्र विषयाची गोडी लागली. त्या कायम वर्गात तास सुरु असताना पुस्तक उघडलं की रागवायच्या आणि उत्तर आलं नाही की घरी पुस्त...

बेस्टं

परवाच लंपनचं 'शारदा संगीत' वचुन सोडलं की हो! एकदम बेस्टं बघा. एकदम दोन्ही हाताचे आंगठे आणि बोटं चिकटवुन बेस्टं हे पुस्तक म्हणजे, विद्या यावी म्हणुन पुस्तकाच्या पानात कुंकु लावलेलं मोराचं पीस ठेवलेलं असतना? तसं वाटलं. मोराच्या पीसासारखं दिमाखदार आणि विद्या येणार या विश्वासासारखं 'निरागस' की काय ते असतं तसं दोन्ही एकदम. असा मॅड सारखा विचार डोक्यात आला.

शब्दकेली

मराठीचे एवढे समॄद्ध शब्दभंडार असुनही माझ्या मते काही भावना आणि व्यक्तिविशेष शब्दापासुन वंचित आहेत. किंबहुना त्यांना इतर भाषेतही वाली नाही. (पण कुणी सांगावे एस्किमो भाषेत बर्फ़ाला २१ शब्द आहेत म्हणे!). परंतु मराठीतली ही त्रुटी भरुन काढण्यासाठी, त्यांना नावे ठॆवण्याचा खेळ म्हणजॆ शब्दकेली. तुम्हाला वाटलेच तर 'शब्दकाला' म्हणा हवं तर... मुलाहिजा फर्माईये ... दांबई - एखादे रटाळ व्याख्यान किंवा संभाषण ऐकताना आलेली जांभई दाबायचा केलेला प्रयत्न आणि तदनुषंगाने होणारी जबड्याची हालचाल. यमकविता - आपल्याला कविता होते या गॊड गैरसमजापायी नकवींनी केलेली यमकजुळवणी. नाडपट - पायजम्याच्या नाडीचे एक टॊक नेफ्यात लोप पावल्यावर बोटाने ती नाडी बाहेर काढायची केलेली यडपट खटपट. ( जाता जाता..'कागदी होडीच्या शीडवर बसलेल्या पक्ष्याच्या चड्डीची नाडी' नामक लेखनकार्य मराठीत काही वर्षांपुर्वी झाले आहे त्याची अधिक माहिती आहे का कुणाला?) हौसाष्टक - मुहुर्ताची वेळ व्हायची आहे, भटजींनी आपला गळा साफ करुन घेतला आहे. अशा वेळी मुलीच्या मावस आजीनी रचलेली आणि मुलीची आत्या, मावशीची नणंद आणि मानलेली चुलत आजी य...

कोणी गोविंद घ्या कॊणी गोपाळ घ्या

कळवण्यास आनंद होतो की या संकेतस्थळाला आपल्या अभिव्यक्तीला साजेसे नाव मिळते आहे. याच्या पुर्वीच्या अवतारात, "The tree that shelters two souls" चा उद्देश आत दडलेल्या उर्मीना वाट देणे हा होता. वाटचाल चालु असताना, मराठीत नोंदी करण्याची शक्यता आणि मराठी वेबलॉग्सच्या श्रुंखलेचा रसिक आणि 'समछंदी' मेळावा भेटला. त्या योगे, गेली वीस एक वर्षे मिटून ठेवलेली वही परत उघडली. लिहावे असे वाटु लागले. या नवीन बहराचे नवीन नाव ... मोगरा फुलला

लक्षणे

वेबलॉग्सच्या जगात दोन प्रकारची माणसं असतात. पहिल्या प्रकारची माणसं आपले निरीक्षण, तत्वे, एकुणात आपला 'जीवनानुभव' आपल्या वेबलॉगवर नोंदवत असतात. आणि दुस-या प्रकारचे, केवळ वेबलॉग लिहीण्यासाठी जगतात! तुम्ही कोणच्या प्रकारात मोडता? खाली दिलेली लक्षणं जर तुम्हाला लागु पडत असतील तर प्रकार ऒळखणं सोपं आहे. १. 'वेबलॉग करणेचॆ फायदे' तुम्ही भेटेल त्या प्रत्येकाला 'मिशनरी' उत्साहाने ऐकवता. २. 'स्टॉक एक्सचेंज' इंडेक्स पेक्षा तुमचे जास्त बारीक लक्ष तुमच्या 'वाचक संख्या सारणी' च्या चढ उतारावर असते. ३. तुमच्या मते 'फर्मास' उतरलेल्या एन्ट्रीवर कुणीच टिप्पणी न केल्यास 'जगात कुणाकुण्णाला माझी कदर नाही' असे नैराश्य तुम्हाला घेरते. ४. 'या जगात आपण नसु' या पेक्षा 'आपल्याला वेबलॉगमध्ये लिहायला काही राहणार नाही' याची भीती तुम्हाला जास्त वाटते. ५. समोरुन एखादी मोहक स्त्री जात असेल तर 'नटवी मेली' अशी स्त्रीसुलभ ( किंवा तुम्ही पुरुष असाल तर जे काही पुरुषांच्या मनात अशावेळी येते ते!) नैसर्गिक व प्रतिक्षिप्त प्रतिकीया व्हायच्याआधी '...

मेघबाळ चिमुकले...

आज ऑफिसला येताना पुर्ण निरभ्र आकाशात एक छोटासा ढग मला अचानक दिसला. किती छोटा! अखाद्या फुग्याएवढा आणि बाकीचं आकाश मात्र चित्रातल्या सारखं निळं शार. हाच बेटा कुठुन आला कुणास ठाउक? एखाद्या prophet ची practice चालु असावी (illusions - Richard Bach) का एखाद्या Ais Sedai ने जाताना आपला gateway धाडकन आपटला (The Wheel of Time - Robert Jordan) भराभर मिथक पुस्तकांचे संदर्भ उमललॆ. तयारच असतात entry मारायला. मग वाटलॆ हा काही संकेत आहे का? भविष्याबद्द्ल? मनातल्या वादळी प्रमॆयांबद्द्ल? पण मग माझे मलाच हसु आले, किती आत्मकॆंद्री असतो नाही माणुस? जगातल्या सगळ्या घटना आपल्यासंबधी असतात असं वाटतं त्याला! तर तेंव्हा पासुन ते ढगाचं पिल्लु माझ्या मनात शिरलयं. कामात असताना सुद्धा सारखं ढुश्या देतयं. "माझी आठवण आहे ना?" तेंव्हा म्हटलं या बाळाला इथं बसवावं म्हणजॆ त्याचं टुमणं कमी होईल. मेघबाळ एकलॆ निरभ्र नभी भेटलॆ मनाच्या आकाशी शब्दमेघ दाटलॆ …

सलाम!

लोकलमधुन किंवा बसमधुन प्रवास करताना आजुबाजुची घरे दिसायची. क्षणभरासाठी, ते घर, त्याचा खिडकीसमॊरचा चौकोन आणि तुम्ही यांचं नातं जुळायचं. मुलीची वेणी घालणारी आई, भाजी निवडणा-या बायका, कुठे नुसताच गरगर फिरणारा पंखा. विशेषतः दिवेलागणीच्या कातरवेळी हे नातं - निरागस माणुस असण्याचं नातं- अधिक गहिरं वाटायचं. वेबलॉग्स वाचताना, परत तसंच निरागस नातं कुठेतरी जाणवतं. ही नाती मात्र मला आपल्या परीने जपता येतात, वाढवता येतात. हॆ माझॆ नातलग - कॊणी कॅन्सरशी आपल्या विलक्षण आशावादाच्या आणि श्रद्धेच्या बळावर झुंज देणारा तरुण, आपल्या तान्हुल्याच्या कौतुकात रमलेली आई, टाईमपास करणारे टगॆ, दूर देशी आपलं करिअर,स्वत्व आणि विनोदबुद्धी जपणारी अनामिका - कितीतरी - सगळे आवडतॆ. संकॊची स्वभावामुळे मी त्यांना कधी हे ही नाही सांगु शकले की तुम्ही मला प्रिय आहात, म्हणुन काय झालॆ? बरं वाटतं त्यांची खुशाली कळ्ली की. तरुण आणि ऍनी ची काळजी आणि कॊबीचं कौतुक मला आहेच. म्हणुन गुलजारचॆ काही शब्द उसनॆ घेउन, हवाओंपे लिखा है हवाओंके नाम उन अंजान परदेसीयॊंको सलाम!

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी - माझी खेळी

प्रियभाषिणी, मला खो दिल्याबद्द्ल आभार. वाचन ही जिवनावश्यक गरज असल्याने पुस्तकांबद्द्ल लिहीणॆ म्हणजॆ पर्वणीच. नंदननॆ चपखल शीर्षकासकट सुरु केलेला हा खेळ खेळायला आणि मुख्य इतराच्या खेळ्या वाचायला खूप मजा यॆतॆ आहे. धन्यवाद नंदन! आता माझी खॆळी .. १. शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक झेन गार्डन - मिलींद बोकील २. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहीती झेन गार्डन हा मिलींद बोकील चा कथा संग्रह मला आवडला पण शाळा एवढा नाही. ३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके स्वामी - रणजीत दॆसाई जावॆ त्यांच्या देशा - पु.ल. देशपांडे जी. एं. ची पत्रे - श्री. पु. भागवत आणि सुनिता देशपांडेंना लिहिलेली एक एक पान गळावया - गौरी देशपांडे मितवा - ग्रेस ४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके- * - मारुती चितमपल्ली * - जयवंत दळवी समग्र कविता - मर्ढेकर किमया - माधव आचवल जी. ए. यांची माधव आचवल यांना लिहिलॆली पत्रे (माझ्या माहितीप्रमाणे ती प्रसिद्ध झालेली नाहीत पण मला वाचायला आवडतील ती!) ५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे - गौरीचॆ एक एक पान गळावया ही माझी खुप आवडती कथा आहे. गौरीचा लेखनाचा घाट खुप ...