बागेश्री १

आमच्याकडे बाग लागवडीची आवड जणू आईकडून मुलीकडे वारसाहक्काने येते.  माझी आज्जी, आई, मावशी आणि धाकटी बहीण पट्टीच्या माळीणी आहेत.

त्यांच्या बागांच्या, त्यातल्या झाडांच्या आख्यायिका आहेत. आमच्या आज्जीच्या बागेत एवढी मोगऱ्याची फुलं यायची की आई मावशी रोज त्यांचे गजरेच्या गजरे करून  शेजारी पाजारी वाटायच्या!  ( हो गजरे बिजरे करायचा उरक पण ह्यांच्याकडे पिढीजात आहे!)

माझ्या मावशीच्या बागेतल्या सोनचाफ्याला रोज शंभर एक फुले येतात! आसमंत दरवळतो. माझी मावसबहिण पत्ता सांगताना असा सांगते – “विवेकानंदाच्या पुतळ्यानंतर उजवीकडे वळा की चाफ्याचा घमघमाट येऊ लागेल,  त्याच्यापुढे 200 मीटरवर आमचं घर!

तुम्हाला disaster recovery माहित आहे ना? महत्वाच्या data ची एक प्रत सुरक्षित जागी ठेवलेली असते? तर सहारा वाळवंटातल्या महत्वाच्या निवडूंगाचा DA मावशीकडे आहे.

इसी श्रुंखला की अगली कडी असलेल्या माझ्या बहिणीला कळलं की पिंपरी चिंचवड बागकाम विभाग एक स्पर्धा आयोजित करतोय. हे कळताच, ती तडक आयुक्तांना भेटायला गेली.

 ते आधी चपापले की आपण पाटील बाईंचा सल्ला न घेता ही स्पर्धा आयोजित करायची चुक करतोय, आता त्या आपल्याला सुनावणार, पण बाईंचा स्वभाव फार विनयशील आहे. त्यांनी स्पर्धेची चौकशी केली आणि भाग घेण्याचा मनोदय जाहीर करून भेट आटोपती घेतली.

 तर दुसऱ्या दिवशी पिंचि च्या सगळ्या कंपन्या आणि विभागांच्या माळ्यांचं एक शिष्टमंडळ आयुक्तांकडे दाखल झालं की पाटील बाई भाग घेणार असं आम्हाला कळलं आहे तर आम्हाला आरक्षण देण्यात यावं. 

शेवटी हिच्यासाठी dish garden अशी कधी न ऐकलेली category बनवली गेली, ज्यात तिने परितोषिक पटकावले! अर्थात पुढच्या वर्षी ती आयोजन समितीची अध्यक्षा असेल ही अट ही शिष्टमंडळाने मान्य करून घेतली.

(इथे पुणेरी बागकाम विभागाचे कर्मदरिद्रीपण नोंदवण्याचा संताप मी आवरते आहे, तो ह्या लेखाचा भाग नाही! वो कहानी फिर सही)

Comments

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

हाक

वर्गीकरण