झुलता झोका जाओ आकाशाला ...

राई - आमचं इटुकलं स्वप्न. थेंबभर पाणी, मुठभर माती आणि डोळयात मावेल तेव्हढं आकाश एकत्र करुन बंधलेला इमला.
इथे आमचे नानाविध प्रयोग सुरु असतात. पीक पिकवायचे. मग पीक आले की ते साठवायचे आणि संपवायचे. खतं आणि रोपांचे, birdbath ते Avocado उगवण्यापर्यंत सगळे. 
त्यापैकी माझ्या डोक्यात ब-याच दिवसापासुन असलेला कीडा म्हणजे ताड-माड उंच असणा-या उडळीच्या झाडाला एक  पाटीचा झोपाळा बांधण्याचा. ब-याच दिवसापासुन अभयला भुणभुण लावली होती. (अभय - माझा नवरा - practical - down to earth - असण्याची सगळी जबाबदारी त्याच्याकडे सुपुर्त आहे, म्हणजे मी दिवास्वप्ने बघायला मोकळी). त्याने झोपाळा बांधण्य़ातल्या सर्व अडचणी दाखवुन दिल्या तरी आमच्या दोघांच्या डोक्यातुन ती कल्पना काही जाईना. 
शेवटी ह्या आठवड्यात हा कोढाणा सर करायचा असा निश्चय करुन राईकडे कुच केली.  झोपाळ्याची fabricated ऐसपैस पाटी, आणि दोरखंड घेउन. 
हे उपर्निदेशित उडळीचे झाड, झाड कसले वृक्षच तो, चांगलाच उंच आहे. पहिली फांदीच मुळी 20 फुटावर. कोणीही झाडावर चढणारे मिळाले नाही.
 मग प्लान बी अमलात आला.  
 दगडाला प्लॅस्टिक गुंडाळून एक दोरा बांधला, तो माकडं पळवण्यासाठी वापरात असलेल्या गलोलीने हव्या त्या फांदीवरुन पलिकडे मारायचा. तो तिथे वर लटकायचा, मग उंच काठी / बांबु आणि त्याच्या टोकाला S हुक वापरुन त्याला जमिनईवर आणायचे, त्या दो-याला मध्यम दोरी बांधुन ती वर चढवायची, आणि तिला बांधुन दोरखंड,  दोर चढल्यावर माझ्या लक्षात आले की हे किती उंच काम आहे. 



असे एकाबजुला दोन वेढे, आणि दुस-या बाजुला एक वेढा देउन पाटी बांधली, झोका घेतल्यावर लक्षात आले की दोन्ही बाजु पुरेशा समांतर नसल्याने झोपाळा वेगळ्या प्रतलात फिरतोय. थोडक्यात झोपाळ्याचा झोक जातोय. मग समांतर प्रतलाचा शोध. जो अधिक उंचावर होता, तोपर्यंत वापरलेला बांबु कापलेला, मग अजुन एक बांबु पैदा केला, तो पुरेना, मग टेबलावर उभे राहुन खांबखेळ.  असे करत तिसरी दोरी चढवली. आता झोपाळा झोकदार झुलु लागला. त्यासाठी दोन ईंजिनिअर, दोन कामगार, आणि चार प्रेक्षक अक्खा दिवस राबले. धीर सोडला नाही, दोरा ढिल सोडला, दोरी हापसली, hypothesis मांडले, मार्ग सुचवले, खोडुन काढले, वर झाडाकडे बघत हातवारे केले, ह्या सगळ्या उद्योगाने हरखुन जाउन, त्याला खेळ समजुन चेरीने (आमची राई रेसिडेंट कुत्री)  त्यात मध्ये पळापळ सुरु केली. सर्व काही यथास्थित होवुन कार्य संपन्न झाले. गड फत्ते झाला आणि मावळे आणि घोरपड ही सुखरुप राहिले. 
तेंव्हा आता
झुलता झोका जाओ आकाशाला
धरतीचा टिळा भाळाला ...



Comments

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

बागेश्री १

हाक