Thursday, December 08, 2016

सुलभा देशपांडे

मुंबईच्या वेशीवर असलेलं आमचं गोरेगाव छान टुमदार होतं. आत्तासारखं टॉवरमय आणि कॉर्पोरेट नव्हतं झालं अजुन. पूर्वेला आरे कॉलनीची हिरवाई आणि छायागीतच्या जुन्या गाण्यात दिसणारं पिकनिक पॉइंट अजुन डौलात होते.
रोजचं शाळा ते घर पायी होतं. मुंबईला जायचं ते सठी सहामाही मॉन्सुनबरोबर उसळणाऱ्या नरिमन पॉइंटच्या पर्वतप्राय लाटात भिजायला नाहीतर 253 नंबरच्या डबलडेकरने जुहुला जायला. हो आणीक एक चैनीचा कार्यक्रम असायचा, पार्ल्याला दीनानाथला जाउन बालनाट्य बघण्याचा.
हा एक सोहळा असायचा, त्या साठी तिकीट काढुन आणणे, बरोबर आजुबाजुच्या चार पोरींना घेउन जाणे, सगळ्या गॅंगला बस - लोकलने सुखरुप पार्ल्याला नेणे आणणे, हे सगळे आमचे आई बाबा हौसेने करायचे.
पार्ले ईस्टला उतरुन भाजी मार्केट पार केलं की दीनानाथ. रुबाबदार नाट्यगृह. गुबगुबीत खुर्च्या, मखमली पडदे, सगलं कसं राजबिंडं, त्या मनाने बालगंधर्व, यशवंतराव गरीब वाटतात मला. सोय वाटतात, चैन नाही वाटत. वयाचा फरक असेल कदाचित.
तिथे सर्व खुर्च्यांच्या रांगात बाल प्रेक्षकांची किलबिल आणि लगबग चाललेली असायची. नाट्यगृहालाही मजा वाटत असेल. इतर वेळी ठेवणीतल्या साड्या- गजरे, आणि दबल्या आवाजातल्या सुसंस्कृत चर्चेची जागा आता चिवचिवाटाने घेतलेली.बाल नाटकं पण सगळी दर्जेदार - निम्मा शिम्मा राक्षस, बजरबट्टु - मतकरींसारख्या सिध्दहस्त लेखकांनी प्रेमाने लिहलेली. उगाच 'चेटकिणीच्या जाळ्यात छोटा भीम' किंवा 'जंगलात गेला डोरेमॉन' असा कर्टुनच्या शिळ्या कढीला आणलेला ऊत नाही.
या सगळ्या नाटकांमधला मुकुटमणी होता, गुरु पार्वतीकुमारांच्या मार्गदर्शनाखाली सुलभा देशपांडेंच्या संस्थेने निर्मिलेले 'दुर्गा झाली गौरी'.ही संगितिका वेगळीच होती, गाणारी नाचणारी, नव्या दृश्य परिमाणात (visual dimension) नेणारी. नाचणारी मुंग्यांची रांग आणि त्यातली शेवटची पिटुकली मुंगी, राजकन्या आणि नदी, सगळंच अद्भुत! राजस आणि देखणा प्रयोग. प्रयोगानंतर तरंगतच बाहेर पडले होते.
मग काय, आरश्यासमोर एकपात्री प्रयोग, मग मामाच्या घरी स्वत: बसवुन सादर केलेले रेड रायडींग हुड चे पुणेरी रुपांतर हे ओघानं आलंच…
सुलभा देशपांडेंनी मला आणि माझ्यासारख्या अनेकांना दिलेली ही जादुची छ्डी होती ती. आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही करत असतो वेगवेगळे जादुटोणे. मूळ कारण मात्र त्यांची चंद्रशाळा.

No comments: