Relevance
चौदा
सोळा वर्षाची असेन, उन्हाळ्याच्या
सुट्टीत नेहमीप्रमाणे आजोळी मुक्काम होता. मावस-मामे भावंडे जमुन
हुंदडण्याचे विविध प्रकार आजमावत होतो. त्यातलीच एक टूम, पद्मावती
कडुन तळजाई टेकडी चढायची. वरच्या
पठारावरुन चालत जाउन, मागच्या
बाजुने पर्वती चढायची मग पाय-यानी
उतरुन, बस पकडुन परत.
माझ्या
आठवणीतलं पद्मावतीचं देऊळ, गावातल्या
नांदत्या गाजत्या वाड्यासारखं होतं.फरसबंद
अंगण, विहीर, अंगणात मोठे वृक्ष, मध्ये देउळ,
भवताली छोट्या देवळांची ओळ. भाविकांची माफक वर्दळ. आपल्या तान्ह्याला पहिलं देवदर्शन करायला घेउन
आलेली एखादी पहिलटकरीण आणि तिच्या सोबतीला आई, वहिनी नाहीतर बहिण. कांजिण्या झालेल्या
मुलांच्या आयांनी ठेवलेला दहीभाताचा नैवेद्य. आणि या सगळ्यांवर मायेने आणि अधिकाराने पाखर घालणारी देवी.
तर
आम्ही सगळे टेकडी चढुन पठारावर पोचलो. डोळे मिटुन घ्यावे असे वाटणारा भणाण वारा. कानात वारा भरलेल्या वासरांसारखे सुटलेले आम्ही सगळे. पठार
सगळं मोकळंच. उन्हाळ्यात वाळल्या गवताचं आणि लाल पायवाटांच माळरान.
वाटेने
पर्वतीकडे जाता जाता, आम्हाला एक
एकुटवाणा पडझड झालेला जुना बंगला लागला, म्हणजे बंगल्याचं खंडहर. झालं
सगळी वानरसेना, फास्टर फेणे
आविर्भावात, संशोधन करायला लागली. एक मजली. बहुतेक खोल्यांचं छत कोसळलेलं, पण जिना शाबुत, आणि पोर्चवर
गच्ची होती, छान निळं कवडीकाम
केलेली.
माझं
मन थबकलं, विचार करु लागलं, का ही वास्तु इथे बांधली असेल, एकांतात, आणि का अशी ओसाड पडली असेल, विस्मृतीत गेली असेल? एखाद्या भल्या घरच्या
बाईला अवकळा आल्यासारखी.
"का विसरले हिला सगळे?"
मी म्हणाले.
तिथे
एक चोवीस पंचवीस वर्षाचा मुलगा स्केच करत बसला होता. त्यालाच विचारल्यासारखं आपल्या पोक्त आणि ज्ञानी आवाजात म्हणाला "Everything has relevance only in its time"
माझ्या
आयुष्यातला त्या वास्तुचा relevance तिथेच संपायचा. पण का कोणास
ठाउक, ती वास्तु माझ्या
अंतर्विश्वात वस्ती करुन आहे. अचानक
एखाद्या निवांत क्षणी आठवते. मग मी
तिची गोष्ट घडवते. तिच्या जहागिरदार
मालकाची, जिच्यासाठी हा बंगला
बांधला त्या त्याच्या प्रेयसीची, तिने
घालवलेल्या एकटया रात्रींची, जहागिरदार
वस्तीला आल्यावर लावलेल्या हंड्या झुंबरांची, पोर्णिमेच्या चांदण्यात न्हाउन निघालेल्या कवडीकामी गच्चीची…पण त्या कहाणीचं शेवटचं प्रकरण नाही घडवत मी कधी, माझ्या मनात अजुन relevant आहे ना ती अजुन.
Comments