Friday, July 21, 2006

गप्पा

अंधार पडत होता तशी मी लेकीला हाक मारली,
'चला या घरी'
'आई पाच मिंटं'
असं नेहेमीचं उत्तर देउन पुन्हा ती गप्पांकडे वळली सुद्धा!
`रोज भेटतात एकमेकींना तरी यांच्या गप्पा कश्या संपत नाहीत? काय बोलतात एवढ्या?'
असा विचार मनात येता येता, स्वत:चंच हसु आलं. गप्पा कधी संपतात का? `जिवश्च कंठश्च' मैत्रिणींनी रोज गप्पा नाही मारायच्या तर कोणी? गप्पा गोष्टच अशी आहे, चला मारुया म्हणुन नाही जमायच्या त्या. `चल निघते ग' म्हणुन बाहेर पडल्यावर, एकजण फाटकाच्या आतल्या बाजुला आणि दुसरं बाहेर अश्या फाटकाला लटकुन पुढे अर्धा पाउण तास मारल्या जातात त्या ख-या गप्पा.
शाळा सुटली की मुलींचे घोळके बाहेर पडतात. ४ - ५ मुली एकमेकींच्यात जरा ही जागा राहणार नाही अशा एकमेकीला चिकटतात आणि जणु सयामीज ट्विन्स असल्यासारख्या एकधडाने रस्त्याने चालतात. २०% बोलणं, ६०% खिदळणं आणि २०% 'गप्प बस!' त्या एक्जीव घोळक्यातुन उत्पन्न होतं, त्या गप्पा. आता खरं तर स्कुल बस ने मुलं ये जा करत असल्यानं ही प्रथा मोडीत निघते की काय अशी काळजी लागली होती पण सांगायला आनंद होतो की मुली या मुलीच आहेत फक्त `बावळट' ची जागा `स्टुप्पीड' ने घेतली आहे.
आमची आई आणि आमच्या हंसाबाई यांचं आठवड्याला एकतरी गप्पष्टक झडायचंच. आई खुर्ची नाहीतर पलंगावर आणि हंसाबाई भिंतीशी अंगाची जुडी करुन जमिनीवर बसलेल्या. आईने खास गोड चहा केलेला, आई घुटक्या घुटक्याने आणि मावशीबाई भुरक्या-भुरक्याने तो पित असायच्या. हंसाबाई म्हणजे आईच्या मीनाकुमारी होत्या - ट्रॅजडीक्वीन! त्यांच्या नुसत्या वाळत टाकायचे कपडे झटकण्याच्या स्टाईलवरुन आई ओळखायची की चहा गोड करायला हवा. त्यांच्या बोलण्याला एक कोळी-आगरी हेल होता. 'काय सांगु बाई आमच्या चंद्रीचं ना नशीबऽच फुटकं ....' म्हणजे तासाभराची निश्चिंती! आणि नंतर, 'हं! पुरुषांची जातच मेली नतद्रष्ट!' ही 'स्ट्रे बुलेट' कुठुन आली हे पेपर वाचत बसलेल्या बाबांना काही उमगायचं नाही.
गप्पा कोणाच्या रंगतील आणि कोणाच्या नाही ते काही सांगता येत नाही आनंद मधल्या गाण्यात गुलजार ने लिहिलंय तसं
कही तो ये दिल कभी मिल नही पाते
कहीपे निकल आये जनमोंके नाते
पण गप्पांचे फड खरे रंगतात ते रात्री. मनजुळणी झालेला ग्रुप असावा -- दोन दिवसाने भेटतो का दोन वर्षांनी याने ज्या नात्यांच्या पोतात काहीच फरक पडत नाही एव्हढी ज्याची वीण घट्ट असते ती मनजुळणी -- तर असा ग्रुप असावा. रात्र हलके हलके चढत जावी. सर्व मंडळींनी अपडेट द्यावा. अनुपस्थितांची माफक निंदा व्हावी. कॉमन टारगेट्स उदा विचित्र शेजारी अथवा खडुस सर यांची यथेच्छ निंदा व्हावी. वादविवाद व्हावेत. जेवणाचे हात वाळुन जावेत. दोन चारदा कॉफीची फर्माइश व्हावी. कुठुन तरी येणा-या रातराणीच्या वासासारख्या गप्पा लहरत जाव्यात.
रात्रीच्या गप्पांना एक वेगळा खुमार असतो. जगातला सगळा वेळ आपल्यापाशी असल्याचा निवांतपणा असतो, बाकीचं जग झोपल्याचा एकांत असतो. अंधाराने सगळ्यांना कुशीत घेतल्याने एक जवळीक असते. काही विषय धीटपणे चर्चिले जातात. काही गुपिते सांगितली जातात, काही अश्रु पुसले जातात. इतर गप्पा जर ठुम-या असल्या तर या गप्पा बडा ख्याल असतात, तब्येतीने एकायच्या, अनुभवायच्या ....
छायी रतिया कारी कारी

छोडके सारी दुनियादारी

सुनो अब बतिया हमारी ...

Thursday, July 20, 2006

हक्क!

मुंबईत झालेल्या घटनांनी सुन्न व्हायला झालं. अतिशय थंड डोक्याने कोणी इतक्या जणांना मारायची योजना बनवु शकतो ती प्रत्यक्षात आणु शकतो हे झेपणंच जड गेलं. मुंबईकर त्याच्या स्वभावधर्मानुसार वागले. कोणी आपल्या कामाचं नाही हे त्यांना चांगलं माहीत आहे. त्यांनीच एकमेकांचे अश्रु पुसले आणि चालु लागले. कोणत्याही युद्धात बळी पडतात ते निरपराध असहायच!
मला तर कधी कधी समजत नाही की ह्यांचं कौतुक करावं की त्यांनी काही किमान अपेक्षा बाळगु नये या बद्द्ल रागवावं
ह्यातुन सवरते आहे तोच लक्षात आले की आपला ब्लॉग चालत नाहीये. आधी वाटले की व्यत्यय आहे पण मग खरी गोष्ट समजली. हा म्हणजे चोर सोडुन सन्यासाला सुळी देण्याचा प्रकार! `आविष्कार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी' आहे ही! जाम वैतागले मी. मला पोस्ट करता येत आहे कारण ते संकेतस्थळ वर्ज्य नाही झालेले पण वाचता येत नाही. तणतणुन "वर्ड्प्रेस" ला हलायचा विचार केला. पण एक मिनिट.... का म्हणुन? का म्हणुन मी हलायचे इथुन? नोहे! नो वे!
तेंव्हा रामगढ के वासियों चाहे गब्बर कुछ भी करले ... जब तक है मुमकिन, मै ब्लॉगुंगी!!!
तुमचा लोभ असावा ही विनंती!

Thursday, July 13, 2006

अनुस्वाराच्या निमित्ताने

मिलिंद च्या 'अनुस्वार' या नोंदीच्या अनुषंगाने केलेल्या विचारानं मला काही मुद्दे सुचले. ते मी त्यांच्या नोंदीवर टिप्पणी म्हणुन टाकलेच. पण अधिक कायमस्वरुप नोंद असावी म्हणुन पुनरावृत्ती.

पण त्या आधी -- मी काही माहितगार अथवा भाषेची विद्यार्थीनी नाही हे ध्यानात घ्या.

१. माझ्या मते अं हा ओष्ट्व्य नाही. तो अनुनासिक आहे. ओठाचा वापर न करता त्याचा उच्चार करता येतो.
२. हा अनुस्वार बेटा चुकीच्या कळपात शिरल्यासारखा वाटतोय खरा! म्हणजे इतर बाराखडी ही त्याच व्यंजनाचे आविष्कार आसतात तर हा बेटा पुढच्या व्यंजनाला जाउन चिकटतो आहे.
३. अनुस्वाराप्रमाणे 'र' या व्यंजनासाठीही किती वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे आहेत. आणि ती बाराखडी प्रमाणे परत बदलतात. जसे क्र आणि कृ - उ उलटा फिरवलेला. शिवय तोर्यात असे न लिहिता तो-यात असे लिहीलि जाते. आणि जिथे कंपित मधला अर्धा म पुढ्च्या क वर दर्शवला गेला तर सर्वात मधला अर्धा र मागच्या व वर.
४. माझे असे एक मत आहे की गेल्या शतकच्या सुरवातीला मराठी व्याकरणावर जे संस्कार झाले त्यावर इंग्रजीची छाप आहे. म्हणुन मराठीत दंड न वापरता . पूर्णविराम (Fullstop चे भाषांतर?) वापरला जातो.
५. मराठी बाराखडीचा भाग असलेले कॅ आणि कॉ हे उच्चार आपल्याला कधीही मराठी शब्द लिहीताना लागतच नाहीत. ते फक्त इंग्रजी भाषेतले शब्द लिहायला उपयोगी पडतात. जसे कॅप्टन इ.
६. आपल्या बाराखडीत -ह्स्व आणि दीर्घ उ आणि इ आहेत पण ओ आणि ए नाहीत
७. आणि जोडाक्षरासाठी एक चिन्ह ही आणखी एक खासियत ... श्री, क्ष, ज्ञ ... आणि ज्ञ ची आणखी एक गंमत, तो मराठीत द्न्य आहे तर हिंदीत ग्य!

असो! या गमती कदाचित तुम्हाला फार obvious वाटत असतील पण मला मजा वाटते.

Friday, July 07, 2006

अय्या बाई तुम्ही?

काल भाजीवालीसमोर घासाघीस करताना, शेजारी उभ्या असलेल्या बाईंकडे बघितले तर त्य मोठे कुंकु लावलेल्या हस-या बाई ओळखीच्या वाटल्या. एकदम ओळख पटली की या विज्ञानमंचच्या कुलकर्णी बाई. मी लगेच 'स्कर्ट-ब्लाउज, दोन वेण्या' मोड मध्ये गेले. आणि म्हणाले, "अय्या बाई तुम्ही!"
बाईंना अश्या बावळटपणाची बरीच सवय असावी. त्यांनी ओळख विचारली, गप्पा मारल्या. त्यांच्या बरोबर आलेली त्यांची नात चुळबुळ करायला लागली तसे बोलणे आवरते घेत आम्ही आपापल्या मार्गाला लागलो.
पण या आजी - बाई मला पटेचनात. नातीची समजुत काढणा-या आजी आणि माझ्या बाई यात मला दुवाच सापडेना. खरं तर गोरेगावच्या मराठी शाळेत शिकल्याननंतर माझ्याही आयुष्याने वळणं घेतली होती की.
मन चटकन शाळेत धावलं, तो पेल्टोफोरमचा पिवळा सडा पडलेला तपकिरी रस्ता. भलं थोरलं आवार, बैठी शाळा, आणि त्यावर अम्मल गाजवणा-या आमच्या सगळ्या शिक्षिका. त्यांनी खरच आम्हाला घडवलं, नियमाबाहेर जाउन पुस्तकं दिली, विषयांची गोडी लावली.
माझ्या केळकर बाईंमुळे शास्त्र विषयाची गोडी लागली. त्या कायम वर्गात तास सुरु असताना पुस्तक उघडलं की रागवायच्या आणि उत्तर आलं नाही की घरी पुस्तक उघडलं नाही म्हणुन रागवायच्या! प्रभु सरांचा आदरयुक्त धाक असायचा.
माझ्या सगळ्यात लाडक्या बाई होत्या आम्हाला मराठी आणि इतिहास शिकवणा-या असनीकर बाई. त्यांच्यामुळे मला 'कविता करता येतील' अशी आशा निर्माण झाली. त्यांनी मला वक्तृत्वाचं कोचिंग दिलं. स्पर्धांना पाठवलं. जिंकुन आल्यावर 'वाटलं नव्ह्तं गं' असं कौतुक केलं! खुप काही शिकवलं.
एकदा शिकवण्याच्या ओघात, त्यांनी आपल्या मुलाचे उदाहरण दिले, कसा तो सुट्टीभर नुसता गोट्या खेळला. त्याने तांब्याभर गोट्या जमवल्या. एकदा बाईंचे ऐकले नाही म्हणुन त्यांनी चिडुन त्या सगळ्या गोट्या विहिरीत फेकुन दिल्या. आणि त्या मुलाने शांतपणे परत गोट्या जमवायला सुरवात केली!
असनीकर बाईंनी तो प्रसंग सांगितला आणि मी दचकले, म्हणजे बाईंना 'बाई' म्हणुन नसलेलं आयुष्य असतं. त्यांना मुलं असतात हे लक्षातच आलं नव्हतं माझ्या. शेजारी बसलेल्या वैशालीच्या चेह-यावर असनीकर बाई 'आई' म्हणुन लाभलेल्या मुलाबद्द्ल अपार कणव दाटली होती. पलिकडचा निकम तांब्याभर गोट्या खेळत होता.
आपल्याला असलेली एखाद्या माणसाची ऒळख, त्याच्या आठवणी फोटोंसारख्या असतात. द्विमीत - टु डायमेन्शनल.
फोटोतल्या मालतीची कुठे मालीआज्जी होते? आणि हाताची घडी घालुन बसलेल्या नंद्याला कुठे ग्रीन पीस ऑस्कर मिळतं?