गप्पा
अंधार पडत होता तशी मी लेकीला हाक मारली, 'चला या घरी' 'आई पाच मिंटं' असं नेहेमीचं उत्तर देउन पुन्हा ती गप्पांकडे वळली सुद्धा! `रोज भेटतात एकमेकींना तरी यांच्या गप्पा कश्या संपत नाहीत? काय बोलतात एवढ्या?' असा विचार मनात येता येता, स्वत:चंच हसु आलं. गप्पा कधी संपतात का? `जिवश्च कंठश्च' मैत्रिणींनी रोज गप्पा नाही मारायच्या तर कोणी? गप्पा गोष्टच अशी आहे, चला मारुया म्हणुन नाही जमायच्या त्या. `चल निघते ग' म्हणुन बाहेर पडल्यावर, एकजण फाटकाच्या आतल्या बाजुला आणि दुसरं बाहेर अश्या फाटकाला लटकुन पुढे अर्धा पाउण तास मारल्या जातात त्या ख-या गप्पा. शाळा सुटली की मुलींचे घोळके बाहेर पडतात. ४ - ५ मुली एकमेकींच्यात जरा ही जागा राहणार नाही अशा एकमेकीला चिकटतात आणि जणु सयामीज ट्विन्स असल्यासारख्या एकधडाने रस्त्याने चालतात. २०% बोलणं, ६०% खिदळणं आणि २०% 'गप्प बस!' त्या एक्जीव घोळक्यातुन उत्पन्न होतं, त्या गप्पा. आता खरं तर स्कुल बस ने मुलं ये जा करत असल्यानं ही प्रथा मोडीत निघते की काय अशी काळजी लागली होती पण सांगायला आनंद होतो की मुली या मुलीच आहेत फक्त `बावळट' च...