जन हित मे जारी

💥💢💥💦💢💥💢💥💦 सर्व विवाहित व अविवाहित स्त्रियांनी आणि पुरुषांनी वाचली पाहिजे अशी बातमी, संवेदनाशील असाल तर लगेच फॉरवर्ड कराल. बघूया कोणाकोणाला फॉरवर्ड करायची हिम्मत आहे! 💥💢💥💦💢💥💢💥💦

भारतीय जनतेपासून लपवून ठेवलेले हे एक खळबळजनक आणि अतिशय गुप्त असे सत्य, केवळ भाग्यवानांना उघड होत आहे. तुम्हाला माहित आहे का?  व्हॉट्सऍप वर फॉरवर्ड होणारे मौल्यवान मेसेजेस "जनहितमेजारी" नावाची एक गुप्त संस्था टंकलिखित करते. तिची स्थापना प्रत्यक्ष वेदव्यासांनी केली आहे. मौलिक ज्ञान आम जनतेला पोहोचावे हे या संस्थेचे ध्येय आहे. 

या संस्थेची कर्मचारी भरती तीन वर्षातून एकदाच होते, त्याबद्द्ल अतिशय गुप्तता बाळगण्यात येते. ह्या कर्मचाऱ्यांना महिन्याचा मेसेज कोटा देण्यात येतो. त्यांनी लिहिलेल्या मेसेजेस ची संख्या, त्यांचा दर्जा  व त्यांचा व्हॉट्सऍप वर होणारा प्रसार ह्यावर कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला मूल्यमापन करण्यात येते.  जसजशी कर्मचाऱ्यांची प्रगती होते तसतशी त्यांची जनहितेच्छुक, जनहितवादी, जनहितकुशल (ह्या पदाच्या 1, 2, 3 अश्या सबग्रेड्स आहेत), जनहितपारंगत अश्या पदांवर बढती होत जाते. 

ते कर्मचारी  स्वतःच्या व्हॉट्सऍप वरुन हे मेसेजेस ग्रुप्स वर प्रसारित करत असतात. तसे करताना त्यांनी नामानिराळे राहणे अपेक्षित असते. त्यामुळे काही वेळा हा मेसेज मला कोणीतरी फॉरवर्ड केला अशी बतावणी ही  ते करतात. तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपमध्येही यातला एखादा कर्मचारी असण्याची खुप दाट शक्यता आहे. पण त्यांनी गुप्ततेची शपथ घेतल्याने, तुम्ही त्यांना सहजासहजी ओळखूच शकत नाही.  ही पोस्ट वाचल्यावर, जेंव्हा तुम्ही तुमच्या ग्रुपमधल्या  फॉरवर्डपटूंच्या मेसेजेस चे निरीक्षण करु लागाल तेंव्हा त्या पैकी काहींची तुम्हाला शंका येईल. अश्या संशयितांना, तुम्ही गुरुवारी येणाऱ्या पंचमीला "नाराऽयण नाराऽयण मला माहितेय!"(ऽ टाकणे आवश्यक) असा मेसेज पाठवून बघा. "सटकलास का रे?" असे उत्तर आले तर शंभर टक्के खात्री बाळगा "जनहितमेजारी"!

तर ह्या कर्मचाऱ्यांना त्यांचे लोककल्याणकारी कार्य आरंभ करण्याअगोदर Induction दिले जाते.  त्यासाठी  standard induction document  त्यांना अभ्यासायला दिले जाते.  वेदव्यासांनी हे document सांगितले व साक्षात महागणपतीने ते मंगळवारच्या दिवशी लिहून घेतले. "जनहितमेजारी" च्या कार्यालयात त्या सीनचा फोटो फेम करुन लावलेला आहे, फक्त भाग्यवंतानाच तो दिसतो! 

महत्प्रयासाने अतिशय दुर्मिळ असे हे document आम्ही मिळवले आहे, आणि जीवावरची जोखीम घेउन ते आम्ही मित्रांना फॉरवर्ड करत आहोत. कारण  जीवनाच्या रणरणत्या उन्हात मित्र हेच सावली आहेत, जगाच्या धकाधकीच्या रस्त्यावरची मित्र हेच air conditioned taxi आहेत. भरपूर उधाणणाऱ्या भवसागरात तारुन नेणारी ...   
 इतके पॉवरबाज आहे हे document, मी एकदा वाचले तर बघा माझी लेखणी कशी झरझर धावू लागली. जो मनुष्य या document चे 11 वेळा पठण करेल तो सकाळच्या मुक्तपीठमध्ये लिहू लागेल. जो 108 वेळा वाचेल, प्रत्यक्ष, सरस्वतीदेवी त्याचा क्लास लावतील. तर असे हे अत्यंत गुह्य संदेश शास्त्र जे प्रथम भगवान शंकरांनी नंदीला सांगितलं, त्रेता युगात व्यासांनी संजयाला दिलं. पूर्वकाळी गंधर्वाने मेघदूत रचण्याहेतु कालिदासाच्या कानात सांगितलं तेच शास्त्र जगात प्रथमच उपलब्ध होत आहे.

💥💢💥💦💢💥💢💥💦 💥💢💥💦💢💥💢💥💦 

पाठ १ सामान्य संदेश नियम
 • सर्व संदेश ह्या नियमावलीतल्या सर्व नियमांचे पालन करुनच लिहावे. आपले डोके वापरु नये. आपल्या मतांचा, आपल्या ज्ञानाचा इथे उपयोग करु नये. हे मेसेजेस सामान्य जनतेसाठी आहेत तेंव्हा त्यांना रुचणार नाही असे पुरोगामी, स्वधर्म, स्वदेश यावर दुराअन्वये ही टीका करणारे वा दोष दाखावणारे लिहू नये. 
 • मधून मधून वाचकाला emotionally blackmail करावे,  उदा. "देशाभिमानीच फॉरवर्ड करतील." किंवा   "काही लोक उपवासाला ice cream खातात पण खरा भक्त असे करत नाही" इ.इ. 
 • संदेश सुरु व शेवट करताना रांगोळी काढल्यासारखी emoji ची नक्षी काढावी  त्यात नक्षी, फुले पुष्प्गुच्छ इ. emoji वापरावे, उपयुक्त emoji ची यादी परिशिष्टात दिली आहे
 • दुसऱ्या माध्यमातून जरुर मेसेजेस उचलावेत, लेखकाचा उल्लेख गाळावा. 
 • मेसेज लिहिताना  प्रत्येक पाच ओळीमध्ये तीन शुद्ध लेखनाच्या चुका केल्याच पाहिजेत. असे केल्याने मेसेज जिवंत व आपला वाटतो. 
पाठ २ विशेषनाम विनिमय
 • कविता, गजल उधृत करताना किंवा थोरांचे किस्से सांगताना, ती व्यक्ति खालील यादीतील नसेल तर तिचे नाव खालील यादीतल्या एका नावाने replace करावे.  कारण उगाच माहित नसलेली नावे सांगून आम जनतेला गोंधळात पाडू नये.   उदाहरणार्थ  इंदिरा संत ह्या अप्रसिद्ध कवयित्रीची कविता, शांता शेळकेंची आहे असे लिहावे. अप्रसिद्ध पु शि. रेगेंची कविता ग्रेस यांची आहे असे लिहावे. लक्षात ठेवा, तुम्हाला माहित आहे म्हणजे तो कवी / लेखक प्रसिद्ध ठरत नाही. फक्त खालील यादीतले लोकच प्रसिद्ध आहेत. 
 • ह्या नियमाची corollary -  अनोळखी व्यक्ति असेल तर त्या जागीही शक्य असेल तर खालील  यादीतील किंवा तदृश्य नावांचा उपयोग करावा. उदा. एखादी प्रौढ युरोपियन स्त्री व युरोपियन किशोर वयीन मुलगा यांचा साल्सा नृत्य करणारा विडिओ पाठवताना, ते लहानपणी चे फ्रेंच अध्यक्ष  मक्रोन व त्यांची पत्नी आहे असे लिहावे, भले ते गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या गाण्यावर लहानपणी नृत्य करत असू देत. 
 • यादीचा एक भाग
  • उर्दु शेर -- गालीब
  • हिंदी कविता -- हरिवंश राय बच्चन
  • मराठी कविता - शांता शेळके, गदिमा, सुरेश भट 
  • मराठी विनोद - पुल,  अत्रे. 
 • हा विशेषनाम नियम एका विशेष शहराला ही लागु होतो. सर्व विनोद त्याच शहरात घडले ह्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. ते शहर कोणते हा प्रश्न विचारलात तर तुम्ही ह्या गुप्त संस्थेत काम करण्यास लायक नाही आहात. राजीनामा द्या, अपमान करुन काढून टाकायला आम्हाला भाग पाडू नका (  पहा त्या शहराच्या नुस्त्या स्मरणानेही वेदव्यासांना कसे प्रेरित केले.)
पाठ ३ संदेश प्रकार वर्गीकरण

सर्व संदेश हे खालीलपैकी एका प्रकारात मोडले पाहिजेत 
 • आरोग्यवर्धक उपाय  - वेगवेळ्या घरगुती पदार्थांचे आरोग्यवर्धक उपाय सुचवावेत. - लिंबाला टाचण्या लवंगा टोचुन डीप फ्रिजमध्ये 2 दिवस ठेवून मग त्याला किसावे, तो कीस वाळवून सकाळी एरंडेलात मिसळून घ्यावा, पोलिओ होत नाही. इ. इ. जास्त करुन उपाय कॅन्सर, डायबिटीस अश्या हेवीवेट आजारांवर असावेत. लक्षात ठेवा -
  • सर्व कडू पदार्थ उपकारक असतातच.
  • वांगी, अंडे असे तामसी तसेच किनवा, विनेगर किंवा चॉकलेट असे परदेशी पदार्थ कदापि आरोग्यदायक असत नाहीत.
 • चालीरिती,सणवार यांचे शास्त्रीय स्पष्टीकरण व शास्त्रीय फायदे - जे सण जवळ आले असतील त्यांचे फायदे स्पष्टीकरणे लिहावीत.  उदा: श्रावणात होळीबद्दल लिहिल्यास तो मेसेज कोट्यात धरला जाणार नाही. ज्या गोष्टी केल्याने जनतेस मजा येते त्यापासून लोकांना परावृत्त करावे. उदा - आखाड मेजवानी. ज्या गोष्टी केल्याने बायकांचे काम वाढते अश्या गोष्टींचे विशेष फायदे सांगावे, उदा चुलीवरचा स्वयंपाक, चोवीस तास नउवारी नेसणे( आणि त्याच वेळी बाप्यांना धोतर नेसण्याची का गरज नाही हे ही विषद करावे.)  वेगवेगळ्या चाली ह्या काळात कश्या फायद्याच्या आहेत, आणि हे आमच्या  पूर्वजांना पाच हजार वर्षांपूर्वी माहित होते असे ठासून सांगावे. आमचे  पूर्वज फक्त पाच हजार वर्षांपूर्वीच होते. मध्यकाल अस्तित्वात नाही ह्याची नोंद घ्यावी. फायदे सांगताना वापरायच्या शास्त्रीय बाबींची यादी खालील प्रमाणे, ह्यापैकी एक किंवा अधिक बाबी तुमच्या शास्त्रीय स्पष्टीकरणात चपखल बसवा. 
  • उत्पन्न होणाऱ्या लहरी (waves) - मंगळसुत्रातील काळ्या मण्यांमधुन उत्पन्न होणाऱ्या लहरी घरीच असणाऱ्या बायकांचे ताण कमी करतात. पुरुष बाहेर असल्याने त्यांना ह्याची गरज नाही. त्या दिव्य दगडातुन उत्पन्न लहरी बायकांच्या प्रजोत्पादक प्रकृतीला हानीकारक म्हणून त्यांच्या काळजीपोटी दर्शन वर्ज्य. 
  • अणु किरण उत्सर्जनापासुन बचाव - भिंती शेणाने सारवल्याने
  • जीवनसत्वे वाढतात / शाबूत राहतात - दूध आटवून चंद्रप्रकाशात ठेवल्याने 
 • मैत्री, आई, बाबा, मुली यांचे गोडवे  - अतिशय भावुक मेसेजेस लिहावेत - मैत्रीबद्दल (कारण 56.67% ग्रुप्स हे शाळा, कॉलेज, सोसायटी, कंपनी, भीशी अश्या मित्र - मैत्रिणींचे असतात). मुलींबद्दल लिहावे. मुलांबद्दल भावुक लिहिणे सध्या प्रचलित नाही.  सुनांबद्दल भावुक लिहिताना ती जणू माझी मुलगी असे लिहून मग मुलीचा मेसेज recycle  होवू शकतो
 • भारतातील आश्चर्ये -  भारत हा प्रगतीपथावरचा देश असल्याने सर्व आश्चर्यकारक गोष्टी उदा मोठे पुल, बोगदे, रस्ते, नवीन शोध, मोबाईल ऍप्स हे सगळे भारतातच असते वा बनते. एकतर पाच हजार वर्षापुर्वी किंवा आत्ता. 💥💢💥💦💢💥💢💥💦 💥💢💥💦💢💥💢💥💦 
ह्या पुढचे document एवढे तेजस्वी आहे की ते type किंवा copy - paste केले की लगेच अंतर्धान पावते आहे. तेंव्हा स्वदेशाभिमानी असाल तर लगेच हे १० जणांना फॉरवर्ड कराल!


Comments

Popular posts from this blog

तुमचा स्कोर किती आहे?

वाळवण