वाळवण

भारतीय मनामध्ये - आपला नंबर पहिला लागणार नाही - ही सगळ्यात मोठी असुरक्षितता असते. सगळ्या ठिकाणी आपले भारतीयत्व ह्या असुरक्षिततेमुळे सिद्ध होत राहते. सिग्नल सुटल्यावर, आगगाडी फलाटात शिरल्यावर, विमान जमिनीला टेकल्यावर ... सगळीकडे.

पण ह्या खालोखाल भारतीय मनातली दुसरी असुरक्षितता कुठली आहे माहीत आहे का?  ती आहे आपले धुतलेले कपडे न वाळण्याची!  घरातल्या कोणीही वाळत घातलेले कपडे काढताना ते दमट असल्यची शंका जरी व्यक्त केली तर तो गृहिणीला  आपला अपमान वाटतो.

आत्तापर्यंत मी स्वतःला या असुरक्षिततेपासुन मुक्त समजत होते. पण परवा परदेशी, परकं वॉशिंग मशीन, बेभरवशाचा ड्रायर यामुळे, अपार्टमेंट सोडायला चारच तास राहिले आणि कपडे अजून दमट आहेत, हे लक्षात येताच, माझ्या मनातल्या भारतीय गौरीची दुर्गांबा झाली! तिने रणांगणाचा सर्वे केला, खिडक्या, गज, असणारं उन्ह, दहाव्या मजल्यावर वाहणारे वारे, याची दमट छोट्या आणि मोठ्या कपड्यांशी सांगड घातली, आणि त्या रैनबसेर्‍याच्या सर्व पृष्ठभागांचा योग्य वापर सुरू  केला. कपडे वाळले का हा प्रश्न तुम्हाला पडू नयेच. त्या बसेर्‍याचा मालक त्याक्षणी तिथे उगवला असता तर त्याला मात्र एक विलक्षण दृष्य बघायला मिळले असते. तमाम गोर्‍यांच्या मनात असतो, त्याच्याही असलेल्या "these Indians can do anything!!" ह्या किश्श्यांत एक भर पडली असती.
ह्या प्रकाराने मला भारतीयांच्या दुसर्‍या नंबरच्या असुरक्षिततेची खात्री पटली. आणि प्रवासात नायलॉनची दोरी का न्यायला हवी याची ही.
मुंबईतल्या इमारतींवरुन नजर फिरवल्यास खिडकया आणि पोस्ट स्टॅंपच्या आकाराच्या पिंजरावजा बाल्कन्यांत कपडयांच्या लाटाच्या लाटा वाळत असतात. साड्या ओढण्यांचे लांब फराटे दोन मजले खाली गेलेले असतात. इंग्रजीत ज्याला unmentionables म्हणतात (ते कपडे ज्यांचा उल्लेख ही करू नये) ते या लाटांमध्ये सगळ्यात नजरखेचक जागांवर विराजमान असतात.  आपल्याकडे ही वस्त्रे पताकांसारखी दर्शनी!

वारकरी पण इतके विनोदी असतात ना! सकाळी अंघोळ करुन चालायला लागले, की धुतलेल्या च बाप्यांच्या डोकयाला आणि बायांनी आपले धुतलेले परकर, आपल्या हातात दंडापर्यंत अस्तन्यांसारखे सारलेले, आणि निघालेले हरीनामाचा गजर करत!

(हा एक भारतीय आणि पाश्चात्य विचारसरणीतला फरक  - पाश्चात्यांना गोष्टी  unmentionable असतात. "The one who can't be named" or "You will not take god's name in vain" believers खरच नेहमीच्या व्यवहारात God असे लिहित नाहीत, G-D किंवा He असा उल्लेख करतात. ज्यु लोकात तर देवाचे नाव अपवित्र न व्हावे म्हणून त्याला उच्चार नाही आणि spelling ही.  या उलट आपण नावं  ठेवण्यात पटाईत  - सहस्रनामाखाली बातच नाही)

घाटाच्या पायर्‍या, झाडं झुडपं, आगागाड्यांच्या एस्टयांच्या खिडक्या सगळ्या जणु ह्याच कामासाठी असतात. ज्या देशात जवळ जवळ दहा महिने कडक उन असतं त्या देशात एवढी अस्वस्थता का बरं असावी लवकरात लवकर कपडे वाळवायची?

सुट्टीच्या दिवशी आपले लांब लांब केस धुऊन - मोकळे सोडून , आपले धुतलेले फेटे, दोघे दोघे जण हातात धरून खालीवर करत वाळवणारे सरदारजी बघितलेत का तुम्ही?  अरे असले विनोदी आणि cute दिसतात ना ते दाढीधारी!!

नुसते कपडेच नाही तर आपण डाळी गूळ गहू चिंच काहीही वाळवतो.  जरा काही  जिन्नस खराब होतो असे वाटले, तर जाणत्यांचा सल्ला असतो "ऊन दाखव त्याला जरा कडक!" काश computer coding मधले bugs असे उन दाखवून काढता आले असते! outsourcing companies बंगळुर पुण्यापेक्षा जैसलमेर ला निघाल्या असत्या, आणि हिंजेवाडीच्या ऐवजी वाळवेकर नगर ला software park निघाले असते!

तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगते, आपल्याकडे ह्या गुढ्या उभारतात ना, त्या पण सणा दिवशी साड्या वाळवून घ्यायची सोय म्हणून, एका चतुर गृहस्वामिनीने त्रेता युगात सुरु केलेली फ्याशन आहे. राम अयोध्येला परत यायचे  होते, मिरवणूक दारावरुन जायची म्हणून काही बाहेर वाळत घालायचे नाही अशी अमात्यांनी ताकीद दिली होती, पण ह्या आर्यकन्येचे चिनांशुक दमट राहिले, मग केली तिने युक्ती, गुढी उभारली... इतर आर्यपत्न्यांनी ती लगेच उचलून धरली! खोटं वाटतय? अहो इतर देशी तुम्ही झेंडे - पताका बघितले असतील, गुढ्या बघितल्यात का कधी?

Comments

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

बागेश्री १

हाक