Wednesday, June 28, 2006

बेस्टं

परवाच लंपनचं 'शारदा संगीत' वचुन सोडलं की हो! एकदम बेस्टं बघा. एकदम दोन्ही हाताचे आंगठे आणि बोटं चिकटवुन बेस्टं
हे पुस्तक म्हणजे, विद्या यावी म्हणुन पुस्तकाच्या पानात कुंकु लावलेलं मोराचं पीस ठेवलेलं असतना? तसं वाटलं. मोराच्या पीसासारखं दिमाखदार आणि विद्या येणार या विश्वासासारखं 'निरागस' की काय ते असतं तसं दोन्ही एकदम. असा मॅड सारखा विचार डोक्यात आला.

Thursday, June 22, 2006

शब्दकेली

मराठीचे एवढे समॄद्ध शब्दभंडार असुनही माझ्या मते काही भावना आणि व्यक्तिविशेष शब्दापासुन वंचित आहेत. किंबहुना त्यांना इतर भाषेतही वाली नाही. (पण कुणी सांगावे एस्किमो भाषेत बर्फ़ाला २१ शब्द आहेत म्हणे!). परंतु मराठीतली ही त्रुटी भरुन काढण्यासाठी, त्यांना नावे ठॆवण्याचा खेळ म्हणजॆ शब्दकेली. तुम्हाला वाटलेच तर 'शब्दकाला' म्हणा हवं तर...
मुलाहिजा फर्माईये ...
दांबई - एखादे रटाळ व्याख्यान किंवा संभाषण ऐकताना आलेली जांभई दाबायचा केलेला प्रयत्न आणि तदनुषंगाने होणारी जबड्याची हालचाल.

यमकविता - आपल्याला कविता होते या गॊड गैरसमजापायी नकवींनी केलेली यमकजुळवणी.

नाडपट - पायजम्याच्या नाडीचे एक टॊक नेफ्यात लोप पावल्यावर बोटाने ती नाडी बाहेर काढायची केलेली यडपट खटपट. ( जाता जाता..'कागदी होडीच्या शीडवर बसलेल्या पक्ष्याच्या चड्डीची नाडी' नामक लेखनकार्य मराठीत काही वर्षांपुर्वी झाले आहे त्याची अधिक माहिती आहे का कुणाला?)

हौसाष्टक - मुहुर्ताची वेळ व्हायची आहे, भटजींनी आपला गळा साफ करुन घेतला आहे. अशा वेळी मुलीच्या मावस आजीनी रचलेली आणि मुलीची आत्या, मावशीची नणंद आणि मानलेली चुलत आजी यांनी किन-या, थरथरत्या आवाजात म्हटलेली मंगलाष्टके. ह्या रचनेत, समस्त परिवाराची नावे जुळवणे, वधु वर यांच्या नावावर कोट्या करणे यांची मनोहर उदाहरणे आढळतात.

कॊटीबासकर - उच्चारलेल्या प्रत्येक शब्दावर कोटी (पक्षी पी. जे) करण्याचा मोह अजिबात न आवरू शकणारा मनुष्य. बहुतांशी त्याच्या मित्रवर्तुळात पी. जे, त्याच्या आद्याक्षराने ऒळखले जातात. उदा एम. जे.

ताटलाग - भात, उपमा, पोहे पसरट ताटलीत घेउन खाताना, पदार्थाच्या शेवटच्या घासाचा चमच्याने केलेला पाठलाग.

हिंक - येउ घातलेली पण हुलकावण्या देणारी शिंक.

मोटमिंगरु - पेकाटात अजिबात दम नसताना उगीच मोटरसायकलचे 'फटफटी' हे नाव सार्थ करणारा आवाज, चालवतानाची घुसखोरी, च्या जोरावर 'शाईन' मारण्याचा प्रयत्न करणारं बुटकं माणुसरुपी शिंगरु.

फुकटाळी - डास मारण्याच्या प्रयत्नात फुकट वाजवलेली टाळी

रेलहर - रेल्वे प्रवासात गाडी कोणत्याही स्टेशनावर, कधीही आणि कितीही कमी वेळासाठी थांबली की तमाम पुरुषांना येणारी गाडीतुन खाली उतरायची हुक्की.

रेळजी / रेलजी - रेलहरीमुळे, उतरलेल्या आणि गाडी सुरु झाल्यावर, परत न दिसलेल्या पुरुषांबद्द्ल, 'राहिले वाटतं खाली' अशी क्षणभर वाटलेली (पुरुषांच्या मते निराधार) काळजी.

कानसेंट्रेशन - अतिशय एकाग्रतेने कान कोरणा-या माणसाच्या चेहे-यावरचे अजागळ भाव.

हा शब्दकोश करण्याचे काम वेगात सुरु आहे, मराठी भाषेचे भवितव्य केवळ आमच्यावर अवलंबुन आहे ह्याची जाण आहे आम्हाला.

Friday, June 16, 2006

कोणी गोविंद घ्या कॊणी गोपाळ घ्या

कळवण्यास आनंद होतो की या संकेतस्थळाला आपल्या अभिव्यक्तीला साजेसे नाव मिळते आहे.
याच्या पुर्वीच्या अवतारात, "The tree that shelters two souls" चा उद्देश आत दडलेल्या उर्मीना वाट देणे हा होता. वाटचाल चालु असताना, मराठीत नोंदी करण्याची शक्यता आणि मराठी वेबलॉग्सच्या श्रुंखलेचा रसिक आणि 'समछंदी' मेळावा भेटला. त्या योगे, गेली वीस एक वर्षे मिटून ठेवलेली वही परत उघडली. लिहावे असे वाटु लागले.
या नवीन बहराचे नवीन नाव ...
मोगरा फुलला

Tuesday, June 13, 2006

लक्षणे

वेबलॉग्सच्या जगात दोन प्रकारची माणसं असतात. पहिल्या प्रकारची माणसं आपले निरीक्षण, तत्वे, एकुणात आपला 'जीवनानुभव' आपल्या वेबलॉगवर नोंदवत असतात. आणि दुस-या प्रकारचे, केवळ वेबलॉग लिहीण्यासाठी जगतात!
तुम्ही कोणच्या प्रकारात मोडता? खाली दिलेली लक्षणं जर तुम्हाला लागु पडत असतील तर प्रकार ऒळखणं सोपं आहे.

१. 'वेबलॉग करणेचॆ फायदे' तुम्ही भेटेल त्या प्रत्येकाला 'मिशनरी' उत्साहाने ऐकवता.
२. 'स्टॉक एक्सचेंज' इंडेक्स पेक्षा तुमचे जास्त बारीक लक्ष तुमच्या 'वाचक संख्या सारणी' च्या चढ उतारावर असते.
३. तुमच्या मते 'फर्मास' उतरलेल्या एन्ट्रीवर कुणीच टिप्पणी न केल्यास 'जगात कुणाकुण्णाला माझी कदर नाही' असे नैराश्य तुम्हाला घेरते.
४. 'या जगात आपण नसु' या पेक्षा 'आपल्याला वेबलॉगमध्ये लिहायला काही राहणार नाही' याची भीती तुम्हाला जास्त वाटते.
५. समोरुन एखादी मोहक स्त्री जात असेल तर 'नटवी मेली' अशी स्त्रीसुलभ ( किंवा तुम्ही पुरुष असाल तर जे काही पुरुषांच्या मनात अशावेळी येते ते!) नैसर्गिक व प्रतिक्षिप्त प्रतिकीया व्हायच्याआधी 'सौंदर्य - तनाचे की मनाचे' हा विषय वेब एन्ट्री करायला योग्य आहे. असे मनात येते!!!

काय ऒळखीची वाटताहॆत का ही लक्षणं? सांगायला खेद होतो की याला इलाज उपलब्ध नाही