तीन संदर्भ
सप्टेंबरचे दिवस. कुळाचाराचे, उपासा-मोदकांचे. आणि शिवाय बुचाच्या फुलांचे. माझ्या अंगणात दोन बुचाची झाडे आहेत. पावसाचा भर ओसरल्यावर थंडीची किनार असलेली हवा पडते. आसमंतात सुगीचा सुगावा लागायला सुरवात होते. खरंतर शब्दात नाही सांगत येणार तो हवेचा तरतरीतपणा - crispness. अश्यावेळी माझी नजर बुचाच्या झाडांकडे असते. अरे, यांना अजुन कशी जाग आली नाही? इतर वर्षभर 'उंच झाडे' अश्या सामान्य कुळातले बुचबाबा या दिवसात संगीत होतात. एके दिवशी अचानक एखाद्या फांदीवर पांढ-या लांब कळ्यांचं झुम्बर दिसु लागतं आणि पाहता पाहता एवढी थोरली झाडं अलवार भासु लागतात. बहुतेक वेळा कोप-यावरचा बुचोबा पहिला नंबर लावतो आणि लॉ कॉलेज रोड वरचा बुच समुदाय पिछाडी सांभाळतो. रात्री त्या रस्त्याने परतताना परिमळ तुम्हाला कवेत घेतो. सहज नजर वर जाते. वरचे वृक्ष मजेत डोलतात, आम्ही पण आहोत म्हटलं! घरातही तो सुगंध हलका पसरतो. मला 'जाणिवश्रीमंत' करतो. गेल्या वर्षभरात या झाडाशी साहित्यिक आप्तसंबंध जुळला. विद्द्युलेखा अकलुजकरांचं भाषावेध हे शब्द व्याकरण भाषा याबद्दल लिहिलेल्या स्फुटांचं एक छान पुस्तक आहे. त्यात त्यांनी इंदिरा...