मराठीचे एवढे समॄद्ध शब्दभंडार असुनही माझ्या मते काही भावना आणि व्यक्तिविशेष शब्दापासुन वंचित आहेत. किंबहुना त्यांना इतर भाषेतही वाली नाही. (पण कुणी सांगावे एस्किमो भाषेत बर्फ़ाला २१ शब्द आहेत म्हणे!). परंतु मराठीतली ही त्रुटी भरुन काढण्यासाठी, त्यांना नावे ठॆवण्याचा खेळ म्हणजॆ शब्दकेली. तुम्हाला वाटलेच तर 'शब्दकाला' म्हणा हवं तर... मुलाहिजा फर्माईये ... दांबई - एखादे रटाळ व्याख्यान किंवा संभाषण ऐकताना आलेली जांभई दाबायचा केलेला प्रयत्न आणि तदनुषंगाने होणारी जबड्याची हालचाल. यमकविता - आपल्याला कविता होते या गॊड गैरसमजापायी नकवींनी केलेली यमकजुळवणी. नाडपट - पायजम्याच्या नाडीचे एक टॊक नेफ्यात लोप पावल्यावर बोटाने ती नाडी बाहेर काढायची केलेली यडपट खटपट. ( जाता जाता..'कागदी होडीच्या शीडवर बसलेल्या पक्ष्याच्या चड्डीची नाडी' नामक लेखनकार्य मराठीत काही वर्षांपुर्वी झाले आहे त्याची अधिक माहिती आहे का कुणाला?) हौसाष्टक - मुहुर्ताची वेळ व्हायची आहे, भटजींनी आपला गळा साफ करुन घेतला आहे. अशा वेळी मुलीच्या मावस आजीनी रचलेली आणि मुलीची आत्या, मावशीची नणंद आणि मानलेली चुलत आजी य