बागेश्री २
तर अश्या ह्या बागविशारद स्त्रिया नर्सरीतुन आणलेलं झाड छान वाढतंय ह्याला कौतुक समजतच नाहीत. तर कटींग्स आणि बियांपासुन स्वत: रोपं तयार करून झाडं वाढवली तरच समाधान मानतात. माझ्या आईचीच गोष्ट घ्याना. तिच्या बागेत लावायला मी मैत्रिणीकडून कमळाचं कटींग आणून दिलं (कमळ म्हणजे Nelumbo nucifera, सगळीकडे कमळ म्हणून मिरवणाऱ्या common water lilies (Family Nymphaeaceae) नाही बरं!) ते तर अर्थात तरारलंच पण तेवढ्यानं गप्प कश्या बसतील ना या? तिनं मला सांगितलं कमळाच्या बिया हव्यात, बिया कुठं मिळतात तर पुजा साहित्याच्या दुकानात, जिथं कुंकु गंध आणि तुळशीच्या माळा मिळतात तिथं. मी म्हणाले अग तिथं का असतील? तर म्हणे त्याच्या माळा करतात देवला वहायला, पण मला वेज पाडलेल्या नको. मी नर्मदाकाठच्या ओंकारेश्वराबाहेर अनेक कमळ आणि पुजा साहित्य विकणाऱ्या दुकानात विचारलं. तर त्या सर्वांनी “मराठी काकवा चक्रम असतातच पण हा त्यातला वीड प्यायलेला नमुना दिसतो अश्या नजरेने मला झटकले. मग असं काय नसतं असं मी आईला सांगितलं. त्यानंतर आठवडाभरानं तिच्याकडे गेले तर कट्ट्यावर एका बरणीत पाण्यात काळ्या बिब्ब्याएवढ्या बिया तरंगत होत्या. ह...