तुमचा स्कोर किती आहे?
सध्या इंग्रजी पुस्तकप्रेमी वर्तुळात एक शंभर पुस्तकांची यादी फिरत आहे. वाचायला हवीत अश्या पुस्तकांची यादी. आपण किती वाचली आहेत हे ताडून बघण्यासाठी. इंग्रजी पुस्तकांचा स्कोर तयार झाल्यावर, प्रियाच्या डोक्यात मराठी पुस्तक यादीची कल्पना उगवली. प्रिया यादीपटू आहे. पुस्तकांची, गाण्यांची वगैरे यादी करुन त्यांचा फडशा पाडण्यात ती वाकबगार आहे. तो वारसा तिला आमच्या आई-बाबांकडून मिळाला असणार. माहेरी आमच्याकडे, वाण्याची यादी करायला वापरायची आमच्यासाठी कस्टमाईज्ड मास्टर लिस्ट आहे! तर, प्रियाने चॅलेंज केल्याने, तिने आणि मी मराठी पुस्तकांची यादी केलीय. त्याआधी यादी करायच्या नियमांची यादी केली, ती येणेप्रमाणे: १. ही यादी आमची आहे, आम्हाला जी पुस्तके वाचलीच पाहिजे असे वाटते त्या पुस्तकांची यादी आहे. २. एका लेखकाचे १ फार फार तर २ पुस्तके या यादीत घेतली आहेत. नाहीतर, पु.लं ची सगळी, लंपनची सगळी अशी यादी वाढत गेली असती. ३. संत वाड़्मय याद्यांच्या पलिकडले आहे, त्यामुळे ते ह्या यादीत नाही ४. पुस्तकांचा यादीतला क्रम यादृच्छिक (random) आहे. ५...