Relevance
चौदा सोळा वर्षाची असेन , उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमीप्रमाणे आजोळी मुक्काम होता . मावस - मामे भावंडे जमुन हुंदडण्याचे विविध प्रकार आजमावत होतो . त्यातलीच एक टूम , पद्मावती कडुन तळजाई टेकडी चढायची . वरच्या पठारावरुन चालत जाउन , मागच्या बाजुने पर्वती चढायची मग पाय - यानी उतरुन , बस पकडुन परत . माझ्या आठवणीतलं पद्मावतीचं देऊळ , गावातल्या नांदत्या गाजत्या वाड्यासारखं होतं . फरसबंद अंगण , विहीर , अंगणात मोठे वृक्ष , मध्ये देउळ , भवताली छोट्या देवळांची ओळ . भाविकांची माफक वर्दळ . आपल्या तान्ह्याला पहिलं देवदर्शन करायला घेउन आलेली एखादी पहिलटकरीण आणि तिच्या सोबतीला आई , वहिनी नाहीतर बहिण . कांजिण्या झालेल्या मुलांच्या आयांनी ठेवलेला दहीभाताचा नैवेद्य . आणि या सगळ्यांवर मायेने आणि अधिकाराने पाखर घालणारी देवी . तर आम्ही सगळे टेकडी चढुन पठारावर पोचलो . डोळे मिटुन घ्यावे असे वाटणारा भणाण वारा . कानात वारा भरलेल्या वासरांसारखे सुटलेले आम्ही सगळे . पठार सगळं मोकळंच . उन्हाळ्यात वाळल्या गवताचं आणि लाल पायवाटांच माळरान . वाटेने पर्वतीकडे जाता जात...