Posts

Showing posts from October, 2009

आट्यापाट्या

वाचायच्या छंदाचा, छापील "म्यॅटर" हा एक भाग झाला. पण हा छंद पुरवण्यासाठी इतरही अक्षर वाङमय उपलब्ध असते. माझ्या वाचनवेडाचा एक मोठा भाग पाट्या वाचणे हा आहे. अगदी अक्षरओळख झाल्यापासुन,वाहनात बसले की मिळेल त्या खिडकीला नाक लावुन वेगाने मागे पडणा-या पाट्या वाचणे हा एक लाडका उद्योग आहे. आणि आजवर तो अव्याहत चालु आहे. बरं पाट्या वाचायच्या कश्या? तर काही लोक ’सकाळ’ पेपर वाचतात की नाही, पहिल्या पानाच्या वरच्या डाव्या कोप-यातल्या आजच्या दुर्वांकुर (ही पुण्यातली जगप्रसिद्ध मराठी थाळी प्लेस (खानावळ म्हणायचे नाही!) ) च्या थाळी मेनुतील सिताफळ रबडी पासुन ते पार शेवटच्या पानावरच्या ... मुद्रणालयात छापुन प्रसिद्ध झाले पर्यंत. तशी प्रत्येक पाटी वरच्या श्री वगैरे देवनागरी किंवा कधी गुरुमुखीत लिहिलेल्या शुभंकरापासुन ते उजव्या कोप-यातल्या प्रोप्रा. भिका ढेकणे पर्यंत. ह्या आधारे दुकानदारांची आवडती दैवते आणि रंगा-यांचे शुद्धलेखन यावर प्रंबंध लिहायचे आमच्या मनात घाटत आहे. मुख्य चुका असतात त्या अनुस्वाराच्या आणि रफाराच्या. अंम्बाई आशीवार्द ह्या तर फारच कॉमन. आणि त्या मी चालता चालता उच्चारुन बघते आणि