ही वाट दूर जाते ...
मुशाफिरी ही जितकी मुक्कामांची असते ना तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त तिथे पोहचायला घेतलेल्या रस्त्यांची गोष्ट असते. काही रस्ते तर इतके मोहक असतात की ते स्वत:च मुक्काम असतात. पुणे कोल्हापुर रस्त्यावर एकदा कात्रज शिरवळची गडबड मागे टाकली, की एक 'राजस रस्ता' सुरु होतो. खंबाटकीचा घाट ओलांडला की रस्ता एखादया राखाडी सॅटीनच्या रिबीनसारखा समोर उलगडत जातो. वाई महाबळेश्वरच्या पर्वतरांगा थोडाकाळ डावीकडे सोबत करतात. मग रस्त्याच्या दोन्ही बाजुस नजर पोचते तोवर शेतं. नोव्हेंबर डिसेंबरचे दिवस असावेत. शेतातला ऊस तु-याला आलेला. मध्येच एकीकडे तु-यांचा समुद्र डुलतोय. एकीकडे तोडणी झालेला एखादा काळाभोर पट्टा. सर्व आसमंतावर धुक्याची झिरझिरीत ओढणी. मावळतीची तिरपी उन्हं आणि काना-मनाला हुरहुर लावणारी एखादी सायंधुन. बस ये सफर तो खुद जिंदगी बन जाती है. तसा तो रुद्र्गंभीर वरंध. भोरनंतरची पठारसपाटी पार करुन तुम्ही वरंधपाशी पोचता. खिंडीपाशी थांबुन खाली डोकावुन पाहणे "मश्ट". मनात हमखास क्लिंट इस्टवुड, काउबॉय हॅट आणि एखाद्या वेस्टर्नची धुन. पत्थरदिल सह्याद्री आपल्या सामर्थ्यात मग्न, आपली दृष्टी विस