आमच्या सुंदरीचं लगीन!
स्थळ - तुमच्या आमच्या घरातलं स्वैपाकघर काळ - रविवार सकाळ साडेदहा अकरा. खमंग नाश्ता मटकाउन श्री दुस-या चहाचे घुटके घेत आहेत. हातात रविवारची पुरवणी. सौ. ओट्याशी उभ्या राहुन पोळ्या करतायेत. पार्श्वसंगीत - "व-हाडी कोण कोण येणार आमच्या सुंदरीचं लगीन ... सौ : अहो! ऐकलं का? श्री: अं . . . हं . . . सौ: झाला बाई एकदाचा साखरपुडा! मी म्हटलं इजा बिजा तिजा होतंय की काय? अभीला मात्र चांगलच गटवलं तिनी! श्री: हो! ... सौ: पण लहान आहे तो तिच्याहुन! श्री: अँ? ... मंदी कुठं मोठीय ग? सौ: अहो! कोण मंदी? मी अभीषेक ऐश्वर्याच्या लग्नाचं म्हणतेय! तसा मला काही दिवसांपुर्वीच वास लागला होता. ही बच्चन मंडळी तिला घेउन काशी विश्वेश्वराला गेली ना? तेंव्हाच मी म्हटलं की काहीतरी शिजतंय! नायकीण म्हणाली `गुरू'साठी गेले असतील! पण मी तेंव्हाच ताडलं की हे `मंगळा'साठी आहे म्हणुन! उगाच नाय ऐश्वर्यानं साड्या खरेदी केली. माझा पण लग्नाचा शालू बनारसी आहे बरं. श्री: अरे वा वा! सौ: अरे वा वा काय? साड्यांची खरेदी आम्ही केली म्हणुन! तुमच्या मंडळींवर सोडली असती ना, तर इरकल नाहीतर बेळगावी घेतली असती वन्संनी. श्री: (चहाबरोबर...