Saturday, October 06, 2007

पुस्तकांच्या आठवणी

रात्रंदिन वाचनाचा ध्यास असण्याच्या आणि तेवढा वेळ असण्याच्या काळात, मिळेल तिथुन, आणि मिळेल तशी पुस्तके वाचुन काढली. त्या वाचनवेडात पार बुडुन गेले ते आता बाहेर यायचं काही लक्षण नाही. या प्रवासात पुस्तके ही साथीदार होती. आमच्या घरात कुठलेही कपाट उघडले की दृष्टीस पडायचे ते पुस्तकांचे मनोरे. अशा सगळ्या साहित्यसहवासात, काही पुस्तकांनी माझ्या मनात आपले स्थान बनवले. ध्यानात घ्या या आठवणी 'पुस्तक' या वस्तुच्या आहेत. त्यातल्या साहित्याचा त्यात भाग आहेच पण ती पुस्तके, केवळ वस्तु म्हणुनही मला भावली, लक्षात राहिली.

तर वाचनावर मनापासुन प्रेम असलं तरी वाचनाचा एक प्रकार तसा नावडताच. तो म्हणजे पाठ्यपुस्तकं. त्यांच्यावर प्रेम करणं अवघडच! आवडती पुस्तकं सुद्धा 'रॅपिड रीडींग' ला आली तर 'संदर्भासहित स्पष्ट'पणे नावडती होतात! एवढं असुन एक पुस्तक मला खुप आवडलं होतं. मला तिसरीत असलेलं इतिहासाचं पुस्तक. मला आठवतं त्याप्रमाणे त्या पुस्तकाचं नाव 'थोरांची चरित्रे' असं होतं (चु.भु. द्या. घ्या.) मोठं सुरेख पुस्तक होतं ते! मस्टर रंगाच्या मॅट मुखपृष्टावर, स्वातंत्र लढ्यातील नेत्यांची पोर्ट्रेट्स फोटोंसारखी मांडणी. प्रत्येक नेत्याचा एक धडा. प्रत्येक धड्यात दोन चित्रं. एक पोर्ट्रेट आणि एक त्यांच्या आयुष्यातल्या एका प्रसंगावरचं चित्र. रामकृष्ण परमहंसांचं, ते लहान असतानाचं देवीपुढे बसलेलं चित्र अजुन माझ्या डोळ्यासमोर आहे. गडद निळ्या रंगाची बंगाली पद्धतीने काढलेली दुग्गा आणि तिच्या पायाशी बसलेला छोटा गदाधर. तसंच नेताजींचं स्थानबद्धतेतुन निसटतानाचं उंच फर कॅप मधलं चित्र. अजुनही मला त्या पुस्तकाची सय येते. विषयानुसार जुळुन आलेलं सादरीकरण, उच्च निर्मितीमुल्य यांचं उत्तम उदाहरण! नाहीतर नुसतीच नुसती शि.द. फडणीसांची चित्र घातली म्हणुन गणिताची पुस्तकं हसत खेळत होत नाहीत ( शि. द, फडणीसांची तालबद्ध चित्र मला मनापासुन आवडतात, तेंव्हा गैरसमज नको) पण म्हणुन गणिताच्या पुस्तकात? आणि म्हणुनच ज्यांनी ते पुस्तक बनवलं त्यांचं कसब, परिश्रम आणि बांधिलकी जाणवते. उठुन दिसते.

तुमच्यापैकी काहीजणांना आठवत असेल कदाचित, "ग्लासनॉस्त" आणि "पेरेस्त्रॉयका" च्या आधी, वर्षातुन एकदा तरी, जागोजागी रशियन पुस्तकांची प्रदर्शनं भरायची. अनोळखी शास्त्रिय पुस्तके, मध्येच एखादं 'रशियन भाषा शिका', रशियन भाषेतल्या क्लासिक्स्ची पाय घासत चालल्यासारखी वाटणारी भाषांतरं, गॉर्कीचं आई नाहीतर डोस्तोएवस्कीचं इडीयट. तर अशा प्रदर्शनातुन बाबांनी आम्हाला रशियन परीकथांचं पुस्तक आणलं होतं. गुळ्गुळीत पानांचं, भरपूर गोष्टी असलेलं, हिरव्या कापडी बांधणीतलं.

आपल्या इथे जे बुकबाईंडींग केलं जातं, त्यासाठी खास शोधुन पुस्तकशत्रु नोकरीवर ठेवले जातात असं माझं स्पष्ट मत आहे. शक्यतो जोर लावल्याशिवाय पुस्तक उघडता येउ नये, उघडल्यावर, वाचणारा गाफिल राहिला झाला तर ते फाटकन बंद व्हावं. याची विशेष काळजी घेतली जाते. शिवाय, ओळीच्या सुरवातीचे आणि शेवटचे शब्द लेखकाने उद्योग नसल्याने लिहले आहेत, तेंव्हा ते कापणीत किंवा बांधणीत गेल्याने काही फरक पडत नाही अश्या विचाराने ती बांधणी केली जाते. आम्ही असंच एक पुस्तक परत बांधणी करायला दिलं होतं. शशी भागवतांचं 'मर्मभेद'. मोठं मस्त पुस्तक आहे ते. गो ना दातारांच्या वीरधवल पठडीतलं. 'रहस्यमय'. तर या बाईंडींगबाबाने त्याचं रहस्यभेद करणारं पान, पहिल्या पानाच्याही आधी बांधलं! आता बोला! त्या तुलनेत या पुस्तकाची बांधणी फार्फार वरच्या दर्जाची होती.

या पुस्तकानं मला एक नवीन कल्पनाविश्व दाखवलं. साधारणत: आपल्याला माहित असलेल्या परीकथा हॅन्स ऍन्डरसनच्या. किंवा आता डिस्नेची मक्तेदारी असणा-या. 'परी' ही आपल्याकडे इंपोर्टेडच. मला वाटतं 'फेअरी'चं मराठीकरण.

या पुस्तकानं मला पूर्व युरोपतल्या कल्पना दाखवल्या. 'बाबा यागा' चेटकीण, तिची पायावर चालणारी झोपडी, तिचे '" उद्गार, आयवान आयवानोविच, मार्या मारिना, ओव्हनवर बसुन राहणारा आळशी आय्वान. झार आणि झारिना, सगळंच वेगळं. त्या पुस्तकातली चित्रं पण वेगळी होती. त्यांची शैली, रंगांचा वापर, सारं रशियन धाटणीचं. कवरवर धावणारे तीन घोडे आणि त्यांचं तीन रंगात होणारं रुपांतर. सगळाच वेगळा परिपुर्ण अनुभव! आणि विशेष म्हणजे माझ्या आणि बहिणीच्या हाताळणीनंतरही ते आता माझ्या लेकीला वाचायला द्यायला पुर्ण रुपात शाबुत आहे!

माझी तिसरी आठवण आहे ती देव्हा-याच्या खालच्या खणात ठेवलेल्या 'संपूर्ण चातुर्मास' या पुस्तकाची! कुंकु-उदबत्ती-धूप-कापराचा धार्मिक वास या पुस्तकाला यायचा. चातुर्मासात देव्हा-याच्या शेजारी लागणा-या जिवतीच्या चित्राइतकंच हे पुस्तक माझ्या देवआठवणींचा अविभाज्य भाग आहे. संध्याकाळच्या हुरहुर लावणा-या वेळी या सगळ्यांनी 'शुभंकरोती'च्या बरोबरीने दिलासा दिला आहे.

तसं हे पुस्तक म्हणजे एक जंत्री आहे. भुपाळ्या, पाळणे, आरत्या, व्रत विधी, ते तिथी, वार , मराठी महिने, स्तोत्रे, रामरक्षा, सर्व काही. मिळेल ते वाचायचे आणि नवीन न मिळाल्यास असेल ते परत वाचायचे, हे ब्रीद असल्याने, मी ह्या पुस्तकाचीही पारायणे केली आहेत. आरत्या म्हणताना तुम्हाला जाणवलंय का की काही आरत्या स्फुरलेल्या आहेत तर काही जुळवलेल्या आहेत. उदा. दुर्गेदुर्घटभारी ( हे वेगळे शब्द आहेत हे वाचे पर्यंत माहीतच नव्हतं!) ही कशी दुर्गेच्या उग्ररुपाला साजेशी आहे. लवथवती विक्राळा 'वीररसपुर्ण' आहे. कशाचाही अर्थ लावुन पहायची दुसरी खोड असल्याने 'साही विवाद करता पडले प्रवाही' ऐकताना - धप्पकन पाण्यात पडलेल्या माणसांचा आणि दुर्गेचा काय संबध? हा पडलेला प्रश्न पण आठवतोय.

आणि या सर्वांपेक्षा भारी आहे, या पुस्तकातला कहाण्यांचा खजिना. सोमवारची, शुक्रवारची पहिली आणि दुसरी, सोमवती अवसेची अश्या कितीतरी! या कहाण्या म्हणजे सोपी ओघवती भाषा, प्रासयुक्त वाक्यं याची उत्तम उदाहरणं आहेत. 'उतशील, मातशील, घेतला वसा टाकशील". 'करा रे हाकारा, पीटा रे डांगोरा', 'खुलभर दुध' आणि 'केनीकुर्ड्याची भाजी' अशी वळणं घेत 'पाचा उत्तरात सुफळ संपुर्ण' होणारी कहाणी माझ्यासाठी लेखनाचा आदर्श आहे.

बदलाच्या वा-यापासुन आपल्या आणि आपल्या मुलांवर करायच्या संस्काराना वाचवण्याच्या माझ्या आईच्या प्रयत्नांचं हे पुस्तक एक साक्षीदार आहे. त्याची माझ्या मनातली आठवण समईसारखी सोज्वळ तेवते आहे