पुस्तकांच्या आठवणी
रात्रंदिन वाचनाचा ध्यास असण्याच्या आणि तेवढा वेळ असण्याच्या काळात, मिळेल तिथुन, आणि मिळेल तशी पुस्तके वाचुन काढली. त्या वाचनवेडात पार बुडुन गेले ते आता बाहेर यायचं काही लक्षण नाही. या प्रवासात पुस्तके ही साथीदार होती. आमच्या घरात कुठलेही कपाट उघडले की दृष्टीस पडायचे ते पुस्तकांचे मनोरे. अशा सगळ्या साहित्यसहवासात, काही पुस्तकांनी माझ्या मनात आपले स्थान बनवले. ध्यानात घ्या या आठवणी 'पुस्तक' या वस्तुच्या आहेत. त्यातल्या साहित्याचा त्यात भाग आहेच पण ती पुस्तके, केवळ वस्तु म्हणुनही मला भावली, लक्षात राहिली. तर वाचनावर मनापासुन प्रेम असलं तरी वाचनाचा एक प्रकार तसा नावडताच. तो म्हणजे पाठ्यपुस्तकं. त्यांच्यावर प्रेम करणं अवघडच! आवडती पुस्तकं सुद्धा 'रॅपिड रीडींग' ला आली तर 'संदर्भासहित स्पष्ट'पणे नावडती होतात! एवढं असुन एक पुस्तक मला खुप आवडलं होतं. मला तिसरीत असलेलं इतिहासाचं पुस्तक. मला आठवतं त्याप्रमाणे त्या पुस्तकाचं नाव 'थोरांची चरित्रे' असं होतं (चु.भु. द्या. घ्या.) मोठं सुरेख पुस्तक होतं ते! मस्टर रंगाच्या मॅट मुखपृष्टावर, स्वातंत्र लढ्यातील नेत्यांची प...