सत्य : झांटिपी_आणि_बोका


 स्थळ – बैठकीची खोली.

झांटिपी हसू आवरायचा आटोकाट प्रयत्न करत आहे. बोका ‘मला फरक पडत नाही’ असं अवसान आणत आहे, पण खूप चिडलाय. त्याच्याकडे बघितलं की झांटिपीला अजुन हसू फुटत आहे.
बोका: मला सत्य माहितंच होतं अर्थात, मी तुला एक उदाहरण दाखवत होतो.
झांटिपी: कोणतं सत्य? आणि कस्लं उदाहरण? बहाणे नको बनवू! अरे ह्या वर्षीचा सगळ्यात विनोदी क्षण होता तो! रोबेर्तो द रोबो ला बघुन तू जो दोन फूट उडालास ना भूत दिसल्यासारखा! (हास्यफवारे)
बोका: हे बघ त्या यंत्राला उगीच pet name द्यायचा लाडीकपणा करू नकोस,शोभत नाही तो तुला! केर फर्शी करणारं यंत्र आहे ते, फारतर केरूनाना म्हण.
आणि मला माहित होतं तो रोबो आहे, पण सध्या तू वेदांत वाचते आहेस ना, त्यातल्या रज्जु-सर्प न्यायाचं उदाहरण देत होतो. अज्ञ माणूस रज्जु अर्थात दोरीला सर्प समजतो ते.
झांटिपी: ह्या! हा ‘मी पडलो नाय, मला असंच खाली जायचं होतं’ असा खास मार्जार न्याय आहे! घाबरलो आपण बावळटासारखे तर कबूल कर ना! म्हणे रज्जु-सर्प!
वेदांत वाङमयात, अद्वैत सिद्धांत- ब्रम्ह हेच एक सत्य ,जग मिथ्या- असं प्रतिपादन करतो. अंधारात, दोरी जणु सापच आहे असा भास होतो, तसा आपल्या ब्रम्हस्वरूपाच्या अज्ञानाने हे जगच खरं आहे असा आभास होतो. हे सांगतो तो रज्जु-सर्प न्याय.
पण तू रोबोला घाबरलास हे सत्य आहे, आता तू करतो आहेस ती सारवासारव आहे. त्यात रज्जु-सर्प न्याय आणणं हा तुझा आगाऊपणा आहे.
बोका: तू भा. रा. भागवतांचं सूर्यावर स्वारी वाचलं आहेस ना? त्यात पाब्लोचा प्रोफेसर त्याला सांगतो ना, ‘जे आहे ते सत्य असं असण्यापेक्षा जे असायला हवं ते सत्य हेच खरं सत्य.’ ते बरोबर आहे.
झांटिपी: हो तर! म्हणजे मी दार्शनिक आणि तू बोलका तालेवार बोका.
बोका: ते तुझं सत्य. सच बात तो ये है की “मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, और तू? तू है कौन?”


Like
Comment
Share

Comments

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

आपुलकीचा अंत

हाक