त्रिमधू : झांटिपी_आणि_बोका
लेखिका: बोक्यापेक्षाही जास्त भाव खाऊन शेवटी झांटिपीने पुढचा भाग लिहिला एकदाचा! तुम्हाला कसा वाटला हे नक्की लिहा, म्हणजे झांटिपीला हुरूप येऊन ती जरा लवकर लवकर लिहिल.
-----
बोका: अग झी, परवा तुझी ती लेखकीण बाई दिसली होती. तू कुठे आहेस, तिचा फोन का नाही उचलत असं विचारत होती.
बोका: मी? मी समोर असताना, माझी चौकशी न करता तुझ्याबद्दल विचारणाऱ्या बाईला मी का उत्तर देईन? तसंही तिला कुठे माहिती आहे की मी बोलू शकतो?
ती आपली तमाम मनुष्यजात प्राण्यांशी लहान मुलांसारखी बोलते तशी बोलत होतीउच्च स्वरात, "तुजी ममा कुटे आहे माउ? दिश्लिच नाइ!" ह्याला उत्तर देणे माझ्या सन्मानाविरुद्ध (below my dignity) आहे.
झांटिपी: अरे आपले इतके भाग लिहून दिले तरी तिला असं वाटतं की मीच तुझे संवाद लिहिते.
बोका: ती जाऊ दे, तशी नगण्य आहे ती आपल्या मालिकेत, तिला नको एवढं फुटेज द्यायला. पण बोका also wants to know, कुठे आहेस तू? काय करतेस?
झांटिपी: अरे सगळ्या संवाद माध्यमांवर इतका मतामतांचा गल्बला चालू असतो ना, की त्यात आपण काही लिहावं असं वाटत नाही गड्या!
बोका: ह्या, झी हे आपलं उगीच उच्चभ्रू कारण नको देऊ. माझ्या हाताखाली तयार झालीस तू. तुला लोक काय करतात, म्हणतात याने फरक पडतो हे खोटं आहे.
झांटिपी: अरे यार, तू म्हणजे जरा माझी प्रतिमा उंचावू देत नाहीस. पण तुला खरं सांगायचं तर, मी मस्त बागडते आहे. इतक्या गोष्टी आहेत ना, वाचण्यासारख्या, बघण्यासारख्या, ऐकण्यासारख्या की शंभर एक जन्म अपुरे आहेत.
बोका: म्हणजे नक्की काय वाचते / ऐकते आहेस तू?
झांटिपी: आता ही बघ, ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलाच्या नव्वदाव्या सुक्तातली प्रार्थना, त्रिमधू म्हणतात ह्या प्रार्थनेला. आजच्या कलुषित आणि प्रदुषित जगात अतिशय सयुक्तिक आहे ही:
मधु वाता ऋतायते मधुक्षरन्ति सिन्धवः। माध्वीर्नः सन्त्वौषधीः॥
मधु नक्तमुतोषसि मधुमत्पार्थिवँ रजः। मधुद्यौरस्तु न पिता॥
मधुमान्नो वनस्पतिर्मधुमाँ अस्तु सूर्यः। माध्वीर्गावो भवन्तु नः॥
बोका: अहं संस्कृतं साधु जानामि| अपितु इतरेजनांसाठी भाषांतर करशील काय?
झांटिपी: ह्या तीन ओळीत प्रत्येकी तीन वेळा मधु शब्द येतो म्हणून ही त्रिमधु. अर्थात
मधुर वारे वाहोत, नद्या मधुर झरोत, आमच्या औषधी मधुरा असोत|
रात्र तशीच पहाट मधु असो, माय धरित्रीचे धुलीकण मधु असोत, तसेच बाप आकाश असो मधुर|
आमच्या वनस्पती (किंवा वनाचा पती) मधुमान असोत तसाच सूर्य ही असो मधु, आमच्या गायी ही मधु होवोत|
अशी आसमंताशी जुळलेली, निसर्ग प्रार्थना. मधुराधिपतेरखिलं मधुरं ची प्रेरणा असावी इतकी मधुर.
बोका: झांटिपी, एक प्रश्न होता.
झांटिपी: काय रे? शब्दार्थ चुकलाय का एखादा?
बोका: नाही तसं नाही, मला असं विचारायचं होतं, बोक्यांना डायबिटीस होतो का?
Comments