माया : झांटिपी_आणि_बोका


सगळीकडे एक गंभीर शांतता. बोका, सगळ्या दुनियेकडे पाठ फिरवून भिंतीला नाक लावून बसलेला होता.
नुसत्या स्तब्ध बसण्यात ही त्याच्या शरीरातून नाराजीच्या लाटाच्या लाटा उसळत होत्या.
झांटिपी: काय रे, का चिडलायंस, आज कॅटफूड पुरेसं नव्हतं की ताटली नीट स्वच्छ नव्हती?
शांतता...
झांटिपी: (कृष्णधवल मराठी चित्रपटातल्या, एक बट कपाळावर बरोबर डोकावेल, असा लहरिया फेटा बांधलेल्या चंद्रकांत च्या रोमॅंटिक(!) आवाजात): एक माणूस रागावलंय वाटतं आमच्यावर!
शांतता...
झांटिपी: (शफ़ाकत अमानत अलींची क्षमा मागून) मोरा बोका मोसे बोलेना! मैं लाख जतन कर हारी! मोरा बोका मोसे बोलेनाऽऽ
बोका:(अंतत: मौन सोडून पण भिंतीकडेच बघत) ए बाई कितीवेळा सांगितलं तू गाऊ नकोस! हो मी रागावलोय तुझ्यावर. तू खाली गेली होतीस तेंव्हा त्या रॉक्याचे लाड करत होतीस.
झांटिपी: ओह! म्हणून चिडलायंस होय! अरे गोड आहे तो भुभु बच्चा!
बोका: काय पण प्रेम त्या बिनडोक कुत्र्यावर! एकमेकावर आपटायला सुद्धा दोन विचार नसतील त्याच्या डोक्यात!
झांटिपी: कसंय ना सर्जा, ती बौद्धिक चमक वगैरे ठीक आहे, पण, कोणीतरी - फक्त तुम्ही तुम्ही आहात म्हणून, तुम्ही दिसलात म्हणून खूश होतं -ती खुशी इतक्या उत्साहाने दाखवतं. हे इतकं सुखवणारं असतं ना!
स्वत:च्या फायद्याव्यतिरिक्त तुमची कोणतीच दखल न घेणाऱ्या जगात, माणसाला असं विनाअट प्रेम हवं असतं. खरंच हवं असतं.
बोका: पण तुसड्यासारखं वागत असला, तरी बोक्यालाही आपल्या माणसांनी आपण सोडून इतर कोणाकडे बघूही नये असं वाटू शकतं!
(छज्ज्यातल्या खुर्चीत झांटिपी, तिच्या अंगावर रेलून बसलेला बोका खाली खेळणाऱ्या रॉकीकडे पहात आहेत.)

Comments

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

आपुलकीचा अंत

हाक