Posts

Relevance

चौदा सोळा वर्षाची असेन , उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमीप्रमाणे आजोळी मुक्काम होता . मावस - मामे भावंडे जमुन हुंदडण्याचे विविध प्रकार आजमावत होतो . त्यातलीच एक टूम , पद्मावती कडुन तळजाई टेकडी चढायची . वरच्या पठारावरुन चालत जाउन , मागच्या बाजुने पर्वती चढायची मग पाय - यानी उतरुन , बस पकडुन परत . माझ्या आठवणीतलं पद्मावतीचं देऊळ , गावातल्या नांदत्या गाजत्या वाड्यासारखं होतं . फरसबंद अंगण , विहीर , अंगणात मोठे वृक्ष , मध्ये देउळ ,  भवताली छोट्या देवळांची ओळ . भाविकांची माफक वर्दळ .   आपल्या तान्ह्याला पहिलं देवदर्शन करायला घेउन आलेली एखादी पहिलटकरीण आणि तिच्या सोबतीला आई , वहिनी नाहीतर बहिण .  कांजिण्या झालेल्या मुलांच्या आयांनी ठेवलेला दहीभाताचा नैवेद्य . आणि या सगळ्यांवर मायेने आणि अधिकाराने पाखर घालणारी देवी .  तर आम्ही सगळे टेकडी चढुन पठारावर पोचलो . डोळे मिटुन घ्यावे असे वाटणारा भणाण वारा . कानात वारा भरलेल्या वासरांसारखे सुटलेले आम्ही सगळे .  पठार सगळं मोकळंच .  उन्हाळ्यात वाळल्या गवताचं आणि लाल पायवाटांच माळरान .  वाटेने पर्वतीकडे जाता जात...

लालीची गोष्ट

गोरेगावला    पाच    नंबरच्या    ब्लॉकमध्ये    मल्याळी    कुटुंब    राहायचं . दोन वर्षाची लाली आणि तिचे आई बाबा .  दोघे नोकरी करायचे . आई घराबाहेर असायची तेवढ्या वेळ लालीला सांभाळायला एक बाई घरी यायची व्यवस्था केली होती त्यांनी .  एका रविवारी लालीच्या आईने तिला सफरचंद भरवायला घेतले .  लालीला समोर बसवुन , फोडी केल्या , सालं काढली ,  आणि फोड लालीसमोर धरली , तर लालीने नेहमीचं असल्याप्रमाणे , साल उचललं आणि खायला सुहरवात केली . आईने परत फोड पु ढे केली . लाली म्हणाली , ' ते नाही , हे खायचं असतं ' . आईला ब्रम्हांड आठवलं , तपासाअंती कळलं की सांभाळणारी बाई तिला सालं खायला द्यायची आणि स्वत : फोडी खायची .  एखाद्या च - यासारखी ती आठवण राहिली आहे माझ्या मनात …   सध्या आपल्या समाजाचं लाली सारखं झालंय . आपण ही  नुसत्या सालीच खातोय .   खेळ खेळत नाही बघतो . बातम्या नाही मतं ऐकतो . देशाभिमानाचं भरतं आलं तर पोस्ट्स बनवतो नाहीतर फॉरवर्ड / लाईक करुन आपण किती देशाभिमानी अशी स्वत : ची पाठ थोपटतो ....

नवीन अध्याय

गेली काही वर्ष प्रार्थमिकता बदलल्याने माझा ब्लॉग सुप्तावस्थेत गेला होता. आता परत लिहवेसे वाटु लागले आहे तेंव्हा सुरु करते... थोडा बाज बदलतेय. डायरी कम नोंदवही सारखी टिपणं करेन म्हणते आहे.  म्हणुन अनुदिनी. आपला लोभ असावा...

यमकविता

गाडी चालवताना येणा-या वाह्तुक-हताशतेला कमी करण्याचा एक हमखास उपाय म्हणजे जाहिरात फलक वाचणे! ताज्या नेमणुका, कुस्तीचे विजय़ी वीर, जयंत्या आणि वाढदिवस .... नुकतीच वाचण्यात आलेली एक अफलातुन कविता.. की जी वाचल्यावर तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी ३ वर्षांचे ब्लॉगमौन सोडावेसे वाटले. तेंव्हा मुलाहिजा फर्माइये भीमाने लिहीलेली घटना पाक आहे म्हणुन विषमतेला धाक आहे. इतरांचे ठाउक नाही पण आमचे भाऊ पुण्याचे नाक आहे अधिक काय लिहावे? कळावे रुमाल असावा ही विनंती.

आट्यापाट्या

वाचायच्या छंदाचा, छापील "म्यॅटर" हा एक भाग झाला. पण हा छंद पुरवण्यासाठी इतरही अक्षर वाङमय उपलब्ध असते. माझ्या वाचनवेडाचा एक मोठा भाग पाट्या वाचणे हा आहे. अगदी अक्षरओळख झाल्यापासुन,वाहनात बसले की मिळेल त्या खिडकीला नाक लावुन वेगाने मागे पडणा-या पाट्या वाचणे हा एक लाडका उद्योग आहे. आणि आजवर तो अव्याहत चालु आहे. बरं पाट्या वाचायच्या कश्या? तर काही लोक ’सकाळ’ पेपर वाचतात की नाही, पहिल्या पानाच्या वरच्या डाव्या कोप-यातल्या आजच्या दुर्वांकुर (ही पुण्यातली जगप्रसिद्ध मराठी थाळी प्लेस (खानावळ म्हणायचे नाही!) ) च्या थाळी मेनुतील सिताफळ रबडी पासुन ते पार शेवटच्या पानावरच्या ... मुद्रणालयात छापुन प्रसिद्ध झाले पर्यंत. तशी प्रत्येक पाटी वरच्या श्री वगैरे देवनागरी किंवा कधी गुरुमुखीत लिहिलेल्या शुभंकरापासुन ते उजव्या कोप-यातल्या प्रोप्रा. भिका ढेकणे पर्यंत. ह्या आधारे दुकानदारांची आवडती दैवते आणि रंगा-यांचे शुद्धलेखन यावर प्रंबंध लिहायचे आमच्या मनात घाटत आहे. मुख्य चुका असतात त्या अनुस्वाराच्या आणि रफाराच्या. अंम्बाई आशीवार्द ह्या तर फारच कॉमन. आणि त्या मी चालता चालता उच्चारुन बघते आणि ...

सोहळा

नुक्ताच Kate and Leopold पाहिला. त्यातला Leo हा १८७६ मधुन एकविसाव्या शतकात आलेला Duke of Albany असतो. वर्तमानातली धावपळ बघुन तो म्हणतो, " Where I come from, Dinner is the result of reflection and study! Ah yes, you mock me. But perhaps one day when you've awoken from a pleasant slumber to the scent of a warm brioche smothered in marmalade and fresh creamery butter, you'll understand that life is not solely composed of tasks, but tastes." ते बघताना मनात विचार आला, खरंच का आपण केवळ उपयुक्ततेकडेच लक्ष देतो? पेशाचा धंदा करतो, सणांचा, उत्सवाचे कर्मकांड करतो. रोजच्या जगण्याची मुषकधाव (Rat Race). मग या सगळ्यातुन जीवनाचा सोह्ळा केंव्हा होतो? मनातुन हुंकार आला ... सकाळी चालायला जाताना झाडांची झालर असलेला रस्ता निवडतो. आता पुष्प ऋतु सुरु झाला आहे. अनामिक फुलगेंदाचा, वैरागी प्राजक्ताचा, उत्फुल्ल जाईजुईचा वास छाती भरुन घेतो तेंव्हा ... पाउस धो धो कोसळु लागतो. आपण चार सवंगडी जमा करतो. दूर आपल्या निर्मनुष्य द-याडोंगराकडे कुच करतो. धबाबा आदळणा-या तोयाने हरखतो. डोंगराला येंघुन, शेवा...

माझेच मत

उचलली जीभ की लावली टाळ्याला या थाटात सतत भडक मते मांडणा-या सर्वांस ठणकावुन ... माझेच मत १. बुटक्या माणसांनी रूंद टाय घालु नयेत, ते सोंडेसारखे त्यांच्या तोंदावर रुळतात २. सफारी हा अतिशय अजागळ वस्त्रप्रकार असुन त्याची तुलना फक्त रिना रॉयच्या भडक पॅडलपुशर्सशी करता येते. ३.विढेरपोट्या (वेशेषेण ढेरपोटे इति) माणसांसाठी इन शर्ट शिवणा-या शिंप्याना इंजिनिअरींगची डिग्री द्यावी. ४. पॅंट नेसल्यावर ( हो माहित आहे मला, की घालणे हे क्रियापद जास्त प्रचलित आहे पण माझे मत, माझे क्रियापद!) पायात सॅंडल आणि पैंजण घालायला कायद्याने बंदी करावी

मोहर

मनुके, Dearest, आजीच्या बागेत काल अनगढ मोहर दरवळत होता कुठला? विचारलं, तर ती हसली खुदकन आकाशात ठळक होत जाणारी चांदणी पाहताना ती सांगत असते तुझ्या चंद्रकला कसा सायसाखर होतो तिचा आवाज मी, तुम्हा दोघींमध्ये हेलकावणारी तृप्त 'संध्या' तुझी आई, माझी बहीण, तुझ्यासाठी दारी लावते आंब्याचं झाड मावशी म्हणुन मी मात्र, करणार तुझे लबाड लाड बघता बघता मोठी होशील बयो! माझ्या खांद्यावर कोपर ठेउन उभी राहशील! मान उंच करुन बघताना तुझ्याकडे, मनातल्या मनात म्हणीन मी, आत्ता कुठे जरा जरा मला उमजु लागलाय मोहर ... दरवळ ... अनगढ

ही वाट दूर जाते ...

मुशाफिरी ही जितकी मुक्कामांची असते ना तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त तिथे पोहचायला घेतलेल्या रस्त्यांची गोष्ट असते. काही रस्ते तर इतके मोहक असतात की ते स्वत:च मुक्काम असतात. पुणे कोल्हापुर रस्त्यावर एकदा कात्रज शिरवळची गडबड मागे टाकली, की एक 'राजस रस्ता' सुरु होतो. खंबाटकीचा घाट ओलांडला की रस्ता एखादया राखाडी सॅटीनच्या रिबीनसारखा समोर उलगडत जातो. वाई महाबळेश्वरच्या पर्वतरांगा थोडाकाळ डावीकडे सोबत करतात. मग रस्त्याच्या दोन्ही बाजुस नजर पोचते तोवर शेतं. नोव्हेंबर डिसेंबरचे दिवस असावेत. शेतातला ऊस तु-याला आलेला. मध्येच एकीकडे तु-यांचा समुद्र डुलतोय. एकीकडे तोडणी झालेला एखादा काळाभोर पट्टा. सर्व आसमंतावर धुक्याची झिरझिरीत ओढणी. मावळतीची तिरपी उन्हं आणि काना-मनाला हुरहुर लावणारी एखादी सायंधुन. बस ये सफर तो खुद जिंदगी बन जाती है. तसा तो रुद्र्गंभीर वरंध. भोरनंतरची पठारसपाटी पार करुन तुम्ही वरंधपाशी पोचता. खिंडीपाशी थांबुन खाली डोकावुन पाहणे "मश्ट". मनात हमखास क्लिंट इस्टवुड, काउबॉय हॅट आणि एखाद्या वेस्टर्नची धुन. पत्थरदिल सह्याद्री आपल्या सामर्थ्यात मग्न, आपली दृष्टी विस...

एकावर एक फुकट!

आज कामावरुन परत येत होते. सिग्नलपाशी थांबले होते. तर समोरच्या रिक्शाच्या पाठीमागे लिहिलेली जाहिरात वाचली - "धबधबे विकत व भाड्याने मिळतील!!" माझ्या डोक्यात संवादांची एक बाजु लिहुन तयार ... "मी तळेकर बोलतोय, नायगराचे किती पडतील हो? नाही म्हणजे तुम्ही पाण्याच्या हिशोबाने तो भाड्याने देणार का रूंदीच्या? एक्सॅक्ट डायमेन्शन्स काय आहेत हो नायगराचे? काय म्हणता कॅनेडियन नायगाराचे वेगळे पैसे? ही म्हणजे शुद्ध लूट चालवलीय तुम्ही!" "अहो धबधबे - एक गिरसप्पा पाठवुन द्या आज सांजच्याला. आं देउ की पैसे ते काय कुठे वाहुन चाललेत होय? काय चार्ज लावताय? काय मे महिन्यात एवढे? त्या गिरसप्याला पाणी तरी असतं का मे महिन्यात? पंचासुद्धा भिजत नाही हो! काय म्हणता? भिजतो? काय चावटपणा आहे हा? तुम्हाला धबधबे विकायचेत की नाहीत? बर जाउ द्या! तुमचं पण राहिलं आमचं पण! बरोबर भिलार फुकट देउन टाका!" "अहो धबधबे, म्हणजे मला असं विचारायचं होतं, अहो किती जोरात बोलताय? काय म्हणता? फार आवाज आहे धबधब्यांचा? अस्सं. तर काय हो, पॅकेज ऑफर म्हणुन काश्मीर धबधब्याबरोबर मंदाकिनी पण देता का तुम्ही?" म...

देहबोलीचे ठोकताळे

कल्पना करा की तुम्ही बाजाराच्या रस्त्याने चालला अहात. समोरुन साठीच्या, सावळ्या वर्णाच्या, सुरकुतल्या कातडीच्या, कमरेत थोड्या वाकलेल्या, हिरवी नऊवारी नेसलेल्या, गळ्यात पोत, कानाच्या ओघळलेल्या भोकात बुगड्या, हातात चार काचेच्या बांगड्या घातलेल्या आजी तुमच्या समोरुन आल्या आणि तुम्हाला म्हणाल्या, "Could you please direct me to the post office nearby?" in Oxford English, एकदम तुम्ही कसे दचकाल की नाही? आपण सगळे सतत, नकळत, आपल्या आजुबाजुच्या व्यक्ती, वस्तु, घटना यांच्याबाबतीत आडाखे बांधत असतो. कच्चे आडाखे पक्के करत असतो. ९९% ते आडाखे अगदी बरोबर निघतात आणि जेंव्हा नाही निघत तेंव्हा त्या प्रसंगांचे किस्से बनतात. प्राणिमात्रांच्याबाबत आडाखे बांधायला सर्वात मदतीची ठरते ती त्यांची देहबोली. अहो प्राणीमात्र म्हणजे द्विपाद, चतुष्पाद सगळे बरका! खरं सांगा तुम्ही, समोरुन येणा-या कुत्र्याला बघुन, हा कुत्रा निरुपद्रवी आहे का आपल्याला रस्ता ओलांडायला हवा, ह्याचा अंदाज एका कटाक्षात त्याची चाल, शेपूट आणि दात बघुन घेउ शकता की नाही? (इथे जर तुम्ही नाही म्हणाला असाल तर तुम्हाला भारतात वास्तव्याचे भ...

पुस्तकांच्या आठवणी

रात्रंदिन वाचनाचा ध्यास असण्याच्या आणि तेवढा वेळ असण्याच्या काळात, मिळेल तिथुन, आणि मिळेल तशी पुस्तके वाचुन काढली. त्या वाचनवेडात पार बुडुन गेले ते आता बाहेर यायचं काही लक्षण नाही. या प्रवासात पुस्तके ही साथीदार होती. आमच्या घरात कुठलेही कपाट उघडले की दृष्टीस पडायचे ते पुस्तकांचे मनोरे. अशा सगळ्या साहित्यसहवासात, काही पुस्तकांनी माझ्या मनात आपले स्थान बनवले. ध्यानात घ्या या आठवणी 'पुस्तक' या वस्तुच्या आहेत. त्यातल्या साहित्याचा त्यात भाग आहेच पण ती पुस्तके, केवळ वस्तु म्हणुनही मला भावली, लक्षात राहिली. तर वाचनावर मनापासुन प्रेम असलं तरी वाचनाचा एक प्रकार तसा नावडताच. तो म्हणजे पाठ्यपुस्तकं. त्यांच्यावर प्रेम करणं अवघडच! आवडती पुस्तकं सुद्धा 'रॅपिड रीडींग' ला आली तर 'संदर्भासहित स्पष्ट'पणे नावडती होतात! एवढं असुन एक पुस्तक मला खुप आवडलं होतं. मला तिसरीत असलेलं इतिहासाचं पुस्तक. मला आठवतं त्याप्रमाणे त्या पुस्तकाचं नाव 'थोरांची चरित्रे' असं होतं (चु.भु. द्या. घ्या.) मोठं सुरेख पुस्तक होतं ते! मस्टर रंगाच्या मॅट मुखपृष्टावर, स्वातंत्र लढ्यातील नेत्यांची प...

आपुलकीचा अंत

सुहृदांबरोबर हवाहवासा वाटणारा प्रवास कामानिमित्त झाला की 'अपरिहार्य' सदरात जातो नाही? असाच एक ढकलाढकली करुन शेवटी 'अपरिहार्य' झालेला प्रवास माझ्यावर कोसळला. मी सवयीने प्रवासकर्त्या संगीताला फोन लावला, 'अग संगीता, मला दहा दिवसात San Hose ला जावं लागणार आहे. तिकिटं बघतेस का? ' संगीताचं उत्तर 'तू आपल्या TRTS मध्ये टाक ना.' 'काय?' 'Travel Request Tracking System ग, मग मी processing सुरु करते. फॉर्म पाठवते तो भरुन अप्रुवल घे. You are cutting too short OK?' मला माझा पहिला प्रवास आठवला. माझ्या बॉस नं मला सांगितलं 'There is an SOS situation out there. तू हँडल करु शकशील. उद्या VISA, Fly the day after. तिकिटाचं मी बघतो. दोन दिवसांनी मी बारा तास पलिकडे असणा-या जागी computerसमोर! बॉस चा फोन, 'बरोबर पोचलीस ना बयो? खायचं रहायचं ठीक आहे ना?' आणि आता हे! तसं हेही अपरिहार्यच आहे. नीश असणारी कंपनी आता चांगलीच जगङ्वाळ झाली आहे. ही लिखापढी त्या वाढत्या पसा-यात आवश्यकच आहे हे मलाही पटतं पण खटकतं हे ही खरंच! आमची पुणेरी संस्कृती जपण्याची जबाबदारी प...

हाक

'व्यवस्थापकीय' पदवी मिळवुन व्यावसायिक जगात वावरणा-यांची एक जमात असते. म्हणजे 'एम बी ए' माणसं हो! ते एक विशिष्ठ परिभाषा वापरतात आणि ती सतत बदलतात. काही दिवसापुर्वी 'Facilitatorअसेल तर आता तो 'Enabler' झालेला असतो. तर अश्या मंडळींची तुमच्याशी बोलण्याची ढब असते. प्रत्येक वाक्यच्या सुरवातीला ते तुम्हाला संबोधतात. 'मंजिरी Let us first aim for the low lying fruit मंजिरी,and then we can see what is the common synergy मंजिरी' जणु काही संभाषणात इतक्यांदा हाक मारली नाही तर तो किंवा मी माझं नाव विसरुन जाउ अशी त्याला भिती वाटत असावी! ही हाक, संबोधन मोठी मजेशीर गोष्ट आहे. कोणी, कोणत्या नावाने किंवा नाव न घेता हाक मारली अश्या गोष्टी काय काय सुचवुन जातात नाही? मग ते `अहो! ऐकलं का?' असो, नटसम्राटांचं `सरकार' असो की नातीनं आजोबांना बोलावलेलं `ए विनायक आबा' असो. प्रत्येकाची वेगळी खुमारी. तशी बाळाची पहिली ट्यॅंह्यॅं - ही सुद्धा हाकच नाही का, 'अरे कोणी आहे का इकडे?' पासुन 'मला भुक लागलीय आणि तुम्ही लक्ष पण देत नाही!' सगळी बाळं आपल्या आईला आपल...

आमच्या सुंदरीचं लगीन!

स्थळ - तुमच्या आमच्या घरातलं स्वैपाकघर काळ - रविवार सकाळ साडेदहा अकरा. खमंग नाश्ता मटकाउन श्री दुस-या चहाचे घुटके घेत आहेत. हातात रविवारची पुरवणी. सौ. ओट्याशी उभ्या राहुन पोळ्या करतायेत. पार्श्वसंगीत - "व-हाडी कोण कोण येणार आमच्या सुंदरीचं लगीन ... सौ : अहो! ऐकलं का? श्री: अं . . . हं . . . सौ: झाला बाई एकदाचा साखरपुडा! मी म्हटलं इजा बिजा तिजा होतंय की काय? अभीला मात्र चांगलच गटवलं तिनी! श्री: हो! ... सौ: पण लहान आहे तो तिच्याहुन! श्री: अँ? ... मंदी कुठं मोठीय ग? सौ: अहो! कोण मंदी? मी अभीषेक ऐश्वर्याच्या लग्नाचं म्हणतेय! तसा मला काही दिवसांपुर्वीच वास लागला होता. ही बच्चन मंडळी तिला घेउन काशी विश्वेश्वराला गेली ना? तेंव्हाच मी म्हटलं की काहीतरी शिजतंय! नायकीण म्हणाली `गुरू'साठी गेले असतील! पण मी तेंव्हाच ताडलं की हे `मंगळा'साठी आहे म्हणुन! उगाच नाय ऐश्वर्यानं साड्या खरेदी केली. माझा पण लग्नाचा शालू बनारसी आहे बरं. श्री: अरे वा वा! सौ: अरे वा वा काय? साड्यांची खरेदी आम्ही केली म्हणुन! तुमच्या मंडळींवर सोडली असती ना, तर इरकल नाहीतर बेळगावी घेतली असती वन्संनी. श्री: (चहाबरोबर...

वर्गीकरण

जगात दोन प्रकारची माणसे असतात, एक, ज्यांना सतत थंडी वाजते आणि दुस-या ज्या बर्फ़ात स्लीवलेस ब्लाउज घालुन विहरतात! जगात दोन प्रकारची माणसे असतात, एक ज्यांना पु.ल. आवडतात, आणि दुसरे ज्यांना वाचता येत नाही! जगात दोन प्रकारची माणसे असतात, एक ज्यांना नाचता येतं आणि दुसरे जे विसर्जन- वरातीच्या पुढे हात वर करुन अंगविक्षेप करतात! जगात तीन प्रकारची पण माणसे असतात, एक ज्यांना मोजता येतं आणि दुसरे ज्यांना मोजता येत नाही! जगात दोन प्रकारची माणसे असतात, एक जी 'बोअर' करतात, आणि दुसरी जी 'बोअर' होतात! तुम्ही?

गाना बनै ले हुनर से मियाँ!

वा! वा! हिमेशवा वा! म्हणजे बिलकुल लाजवाब! काय गाणं पेश केलंस तू! आजपर्यंत मी समजत होतो की गाण्यांमध्ये शब्दांच्या अर्थांचे पापुद्रे तयार करणे फक्त मलाच जमते. चड्डी घातलेले फुल, चांद कटोरा घेउन चाललेली रात भिकारन सारख्या श्रोत्यांना धक्का देणा-या प्रतिमा, टाइम्स ऑफ इंडिया चं गाणं, किंवा चॉकसे चॉंदपर लिखना या सारखे नवीन प्रयोग करणं हि माझी मक्तेदारी होती. हां कहते हैं बांद्रा के उस पार किसी शक्स ने एक दो तीन कोशीश की थी। पर हर लफ्ज कोई लडकीको देखा तो लिखनेवाली नज्म तो नही होती। खैर वह कहानी फिर कभी...। पण गड्या तू जे केलेस त्याला मिसाल नाही. एक शब्द - तनहाईयाँ - त्याला आपल्या सानुनासिक स्वरांचा असा झटका दिलास, तन-हैय्या! आणि तो शब्द म्हणजे अर्थांचे आणि अर्थांतरांचे जणु एक झुंबर झाला. गाणा-याचं तन म्हणजे बाह्य रूप म्हणजे जणु एखादा अडलेला बैल नव्हे सांड. त्याला हैय्या हैय्या करणारं जग. बैलानं कोणत्याही प्रकारच्या बाह्य प्रतिक्रीयेला न जुमानणं. त्यामुळे इतर कळप पुढे निघुन गेला. हैय्या हैय्या करणारा गुराखी ही निघुन गेला. या तनहाईत बैल एकटाच उरला ... खरं सांगतो, एकसो सोला चाँद की राते जागलो त...

सांग सांग भोलानाथ!

आपल्याला आवडलेली साडी नेहमी आपण ठरवलेल्या रेंजच्या बाहेर का असते? सौंदर्यप्रसाधने विकणा-या पोरी नेहमी आगाऊ आणि गि-हाइकांकडे पुर्ण दुर्लक्ष करणा-या का असतात? शेजारच्या बाईच्या हातातली साडी आपल्याला कायम का आवडते? आपल्याला अवडलेल्या चदरीचा, अभ्र्याचा, टॉवेलचा एकच पीस का शिल्लक असतो?

भरजरी

पुण्याच्या सेनापती बापट रस्त्यानं नजिकच्या काळात कात टाकली आहे. चतुश्रुंगी जवळ निर्माण होत असलेल्या संगणकीय संकुलात टोलेजंग इमारती उभ्या रहात आहेत. त्या इमारती नव्या नव्या भरजरी दुकानांनी झगमगु लागल्या आहेत. आघाडीची व्यापारी संकुले, रेस्तरॉं आणि पुण्यातले सगळ्यात मोठे क्रॉसवर्ड - पुस्तके विकत घेण्याचा अनुभव भरजरी करणारी दुकानांची साखळी. अमेरिकन धर्तीवर, पुस्तके चाळायला, वाटल्यास जेठा मारुन वाचायला वाव देणारी. त्या मुळे त्या दुकानाला भेट देणे 'मष्ट' झाले. दुकान प्रशस्त होते पण एकंदर 'मझा' नव्हता येत. एकतर जागा भरायची म्हणुन लांबलांब मांडलेले शेल्फ्स. ते शेल्फ्स भरायचे म्हणुन ठेवलेल्या एकाच पुस्तकाच्या पाच पाच प्रती. पुस्तकंही सगळी फॅशनेबल आणि अधिक खपाची. आणि कवितांच्या पुस्तकांचा दीड खण. आणि त्या खणातली निम्मी पुस्तकं जीएंच्या भाषेत संक्रातीच्या भेटकार्डावर लायकीच्या कवितांची. हे मी इंग्रजी पुस्तकांबद्दल सांगते आहे हं मराठी पुस्तकांची आशाच नव्हती. तर अशी नाक मुरडत मी त्या पुस्तकांच्या सुगंधी गर्दीत भटकत होते. ही सुगंधी - तथाकथित बुद्धीजीवी - जमात तशी मजेशीर. पण त्याबाबत ...

तीन संदर्भ

सप्टेंबरचे दिवस. कुळाचाराचे, उपासा-मोदकांचे. आणि शिवाय बुचाच्या फुलांचे. माझ्या अंगणात दोन बुचाची झाडे आहेत. पावसाचा भर ओसरल्यावर थंडीची किनार असलेली हवा पडते. आसमंतात सुगीचा सुगावा लागायला सुरवात होते. खरंतर शब्दात नाही सांगत येणार तो हवेचा तरतरीतपणा - crispness. अश्यावेळी माझी नजर बुचाच्या झाडांकडे असते. अरे, यांना अजुन कशी जाग आली नाही? इतर वर्षभर 'उंच झाडे' अश्या सामान्य कुळातले बुचबाबा या दिवसात संगीत होतात. एके दिवशी अचानक एखाद्या फांदीवर पांढ-या लांब कळ्यांचं झुम्बर दिसु लागतं आणि पाहता पाहता एवढी थोरली झाडं अलवार भासु लागतात. बहुतेक वेळा कोप-यावरचा बुचोबा पहिला नंबर लावतो आणि लॉ कॉलेज रोड वरचा बुच समुदाय पिछाडी सांभाळतो. रात्री त्या रस्त्याने परतताना परिमळ तुम्हाला कवेत घेतो. सहज नजर वर जाते. वरचे वृक्ष मजेत डोलतात, आम्ही पण आहोत म्हटलं! घरातही तो सुगंध हलका पसरतो. मला 'जाणिवश्रीमंत' करतो. गेल्या वर्षभरात या झाडाशी साहित्यिक आप्तसंबंध जुळला. विद्द्युलेखा अकलुजकरांचं भाषावेध हे शब्द व्याकरण भाषा याबद्दल लिहिलेल्या स्फुटांचं एक छान पुस्तक आहे. त्यात त्यांनी इंदिरा...