Thursday, December 08, 2016

झुलता झोका जाओ आकाशाला ...

राई - आमचं इटुकलं स्वप्न. थेंबभर पाणी, मुठभर माती आणि डोळयात मावेल तेव्हढं आकाश एकत्र करुन बंधलेला इमला.
इथे आमचे नानाविध प्रयोग सुरु असतात. पीक पिकवायचे. मग पीक आले की ते साठवायचे आणि संपवायचे. खतं आणि रोपांचे, birdbath ते Avocado उगवण्यापर्यंत सगळे. 
त्यापैकी माझ्या डोक्यात ब-याच दिवसापासुन असलेला कीडा म्हणजे ताड-माड उंच असणा-या उडळीच्या झाडाला एक  पाटीचा झोपाळा बांधण्याचा. ब-याच दिवसापासुन अभयला भुणभुण लावली होती. (अभय - माझा नवरा - practical - down to earth - असण्याची सगळी जबाबदारी त्याच्याकडे सुपुर्त आहे, म्हणजे मी दिवास्वप्ने बघायला मोकळी). त्याने झोपाळा बांधण्य़ातल्या सर्व अडचणी दाखवुन दिल्या तरी आमच्या दोघांच्या डोक्यातुन ती कल्पना काही जाईना. 
शेवटी ह्या आठवड्यात हा कोढाणा सर करायचा असा निश्चय करुन राईकडे कुच केली.  झोपाळ्याची fabricated ऐसपैस पाटी, आणि दोरखंड घेउन. 
हे उपर्निदेशित उडळीचे झाड, झाड कसले वृक्षच तो, चांगलाच उंच आहे. पहिली फांदीच मुळी 20 फुटावर. कोणीही झाडावर चढणारे मिळाले नाही.
 मग प्लान बी अमलात आला.  
 दगडाला प्लॅस्टिक गुंडाळुन एक दोरा बांधला, तो माकडं पळवण्यासाठी वापरात असलेल्या गलोलीने हव्या त्या फांदीवरुन पलिकडे मारायचा. तो तिथे वर लटकायचा, मग उंच काठी / बांबु आणि त्याच्या टोकाला S हुक वापरुन त्याला जमिनईवर आणायचे, त्या दो-याला मध्यम दोरी बांधुन ती वर चढवायची, आणि तिला बांधुन दोरखंड,  दोर चढल्यावर माझ्या लक्षात आले की हे किती उंच काम आहे. असे एकाबजुला दोन वेढे, आणि दुस-या बाजुला एक वेढा देउन पाटी बांधली, झोका घेतल्यावर लक्षात आले की दोन्ही बाजु पुरेशा समांतर नसल्याने झोपाळा वेगळ्या प्रतलात फिरतोय. थोडक्यात झोपाळ्याचा झोक जातोय. मग समांतर प्रतलाचा शोध. जो अधिक उंचावर होता, तोपर्यंत वापरलेला बांबु कापलेला, मग अजुन एक बांबु पैदा केला, तो पुरेना, मग टेबलावर उभे राहुन खांबखेळ.  असे करत तिसरी दोरी चढवली. आता झोपाळा झोकदार झुलु लागला. त्यासाठी दोन ईंजिनिअर, दोन कामगार, आणि चार प्रेक्षक अक्खा दिवस राबले. धीर सोडला नाही, दोरा ढिल सोडला, दोरी हापसली, hypothesis मांडले, मार्ग सुचवले, खोडुन काढले, वर झाडाकडे बघत हातवारे केले, ह्या सगळ्या उद्योगाने हरखुन जाउन, त्याला खेळ समजुन चेरीने (आमची राई रेसिडेंट कुत्री)  त्यात मध्ये पळापळ सुरु केली. सर्व काही यथास्थित होवुन कार्य संपन्न झाले. गड फत्ते झाला आणि मावळे आणि घोरपड ही सुखरुप राहिले. 
तेंव्हा आता
झुलता झोका जाओ आकाशाला
धरतीचा टिळा भाळाला ...सुलभा देशपांडे

मुंबईच्या वेशीवर असलेलं आमचं गोरेगाव छान टुमदार होतं. आत्तासारखं टॉवरमय आणि कॉर्पोरेट नव्हतं झालं अजुन. पूर्वेला आरे कॉलनीची हिरवाई आणि छायागीतच्या जुन्या गाण्यात दिसणारं पिकनिक पॉइंट अजुन डौलात होते.
रोजचं शाळा ते घर पायी होतं. मुंबईला जायचं ते सठी सहामाही मॉन्सुनबरोबर उसळणाऱ्या नरिमन पॉइंटच्या पर्वतप्राय लाटात भिजायला नाहीतर 253 नंबरच्या डबलडेकरने जुहुला जायला. हो आणीक एक चैनीचा कार्यक्रम असायचा, पार्ल्याला दीनानाथला जाउन बालनाट्य बघण्याचा.
हा एक सोहळा असायचा, त्या साठी तिकीट काढुन आणणे, बरोबर आजुबाजुच्या चार पोरींना घेउन जाणे, सगळ्या गॅंगला बस - लोकलने सुखरुप पार्ल्याला नेणे आणणे, हे सगळे आमचे आई बाबा हौसेने करायचे.
पार्ले ईस्टला उतरुन भाजी मार्केट पार केलं की दीनानाथ. रुबाबदार नाट्यगृह. गुबगुबीत खुर्च्या, मखमली पडदे, सगलं कसं राजबिंडं, त्या मनाने बालगंधर्व, यशवंतराव गरीब वाटतात मला. सोय वाटतात, चैन नाही वाटत. वयाचा फरक असेल कदाचित.
तिथे सर्व खुर्च्यांच्या रांगात बाल प्रेक्षकांची किलबिल आणि लगबग चाललेली असायची. नाट्यगृहालाही मजा वाटत असेल. इतर वेळी ठेवणीतल्या साड्या- गजरे, आणि दबल्या आवाजातल्या सुसंस्कृत चर्चेची जागा आता चिवचिवाटाने घेतलेली.बाल नाटकं पण सगळी दर्जेदार - निम्मा शिम्मा राक्षस, बजरबट्टु - मतकरींसारख्या सिध्दहस्त लेखकांनी प्रेमाने लिहलेली. उगाच 'चेटकिणीच्या जाळ्यात छोटा भीम' किंवा 'जंगलात गेला डोरेमॉन' असा कर्टुनच्या शिळ्या कढीला आणलेला ऊत नाही.
या सगळ्या नाटकांमधला मुकुटमणी होता, गुरु पार्वतीकुमारांच्या मार्गदर्शनाखाली सुलभा देशपांडेंच्या संस्थेने निर्मिलेले 'दुर्गा झाली गौरी'.ही संगितिका वेगळीच होती, गाणारी नाचणारी, नव्या दृश्य परिमाणात (visual dimension) नेणारी. नाचणारी मुंग्यांची रांग आणि त्यातली शेवटची पिटुकली मुंगी, राजकन्या आणि नदी, सगळंच अद्भुत! राजस आणि देखणा प्रयोग. प्रयोगानंतर तरंगतच बाहेर पडले होते.
मग काय, आरश्यासमोर एकपात्री प्रयोग, मग मामाच्या घरी स्वत: बसवुन सादर केलेले रेड रायडींग हुड चे पुणेरी रुपांतर हे ओघानं आलंच…
सुलभा देशपांडेंनी मला आणि माझ्यासारख्या अनेकांना दिलेली ही जादुची छ्डी होती ती. आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही करत असतो वेगवेगळे जादुटोणे. मूळ कारण मात्र त्यांची चंद्रशाळा.

Wednesday, April 27, 2016

Relevance

चौदा सोळा वर्षाची असेन, उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमीप्रमाणे आजोळी मुक्काम होता. मावस-मामे भावंडे जमुन हुंदडण्याचे विविध प्रकार आजमावत होतो. त्यातलीच एक टूम, पद्मावती कडुन तळजाई टेकडी चढायची. वरच्या पठारावरुन चालत जाउन, मागच्या बाजुने पर्वती चढायची मग पाय-यानी उतरुन, बस पकडुन परत.

माझ्या आठवणीतलं पद्मावतीचं देऊळ, गावातल्या नांदत्या गाजत्या वाड्यासारखं होतं.फरसबंद अंगण, विहीर, अंगणात मोठे वृक्ष, मध्ये देउळभवताली छोट्या देवळांची ओळ. भाविकांची माफक वर्दळ.  आपल्या तान्ह्याला पहिलं देवदर्शन करायला घेउन आलेली एखादी पहिलटकरीण आणि तिच्या सोबतीला आई, वहिनी नाहीतर बहिणकांजिण्या झालेल्या मुलांच्या आयांनी ठेवलेला दहीभाताचा नैवेद्य. आणि या सगळ्यांवर मायेने आणि अधिकाराने पाखर घालणारी देवी

तर आम्ही सगळे टेकडी चढुन पठारावर पोचलो. डोळे मिटुन घ्यावे असे वाटणारा भणाण वारा. कानात वारा भरलेल्या वासरांसारखे सुटलेले आम्ही सगळेपठार सगळं मोकळंचउन्हाळ्यात वाळल्या गवताचं आणि लाल पायवाटांच माळरान

वाटेने पर्वतीकडे जाता जाता, आम्हाला एक एकुटवाणा पडझड झालेला जुना बंगला लागला, म्हणजे बंगल्याचं खंडहर. झालं सगळी वानरसेना, फास्टर फेणे आविर्भावात, संशोधन करायला लागली. एक मजली. बहुतेक खोल्यांचं छत कोसळलेलं, पण जिना शाबुत, आणि पोर्चवर गच्ची होती, छान निळं कवडीकाम केलेली.
माझं मन थबकलं, विचार करु लागलं, का ही वास्तु इथे बांधली असेल, एकांतात, आणि का अशी ओसाड पडली असेल, विस्मृतीत गेली असेलएखाद्या भल्या घरच्या बाईला अवकळा आल्यासारखी.  "का विसरले हिला सगळे?" मी म्हणाले.
तिथे एक चोवीस पंचवीस वर्षाचा मुलगा स्केच करत बसला होता. त्यालाच विचारल्यासारखं आपल्या पोक्त आणि ज्ञानी आवाजात म्हणाला "Everything has relevance only in its time"

माझ्या आयुष्यातला त्या वास्तुचा relevance तिथेच संपायचा. पण का कोणास ठाउक, ती वास्तु माझ्या अंतर्विश्वात वस्ती करुन आहे. अचानक एखाद्या निवांत क्षणी आठवते. मग मी तिची गोष्ट घडवते. तिच्या जहागिरदार मालकाची, जिच्यासाठी हा बंगला बांधला त्या त्याच्या प्रेयसीची, तिने घालवलेल्या एकटया रात्रींची, जहागिरदार वस्तीला आल्यावर लावलेल्या हंड्या झुंबरांची, पोर्णिमेच्या चांदण्यात न्हाउन निघालेल्या कवडीकामी गच्चीचीपण त्या कहाणीचं शेवटचं प्रकरण नाही घडवत मी कधी, माझ्या मनात अजुन relevant  आहे ना ती अजुन

Saturday, February 13, 2016

लालीची गोष्ट

गोरेगावला पाच नंबरच्या ब्लॉकमध्ये मल्याळी कुटुंब राहायचं. दोन वर्षाची लाली आणि तिचे आई बाबादोघे नोकरी करायचे. आई घराबाहेर असायची तेवढ्या वेळ लालीला सांभाळायला एक बाई घरी यायची व्यवस्था केली होती त्यांनी
एका रविवारी लालीच्या आईने तिला सफरचंद भरवायला घेतलेलालीला समोर बसवुन, फोडी केल्या, सालं काढलीआणि फोड लालीसमोर धरली, तर लालीने नेहमीचं असल्याप्रमाणे, साल उचललं आणि खायला सुहरवात केली. आईने परत फोड पुढे केली. लाली म्हणाली, 'ते नाही, हे खायचं असतं' . आईला ब्रम्हांड आठवलं, तपासाअंती कळलं की सांभाळणारी बाई तिला सालं खायला द्यायची आणि स्वत: फोडी खायचीएखाद्या च-यासारखी ती आठवण राहिली आहे माझ्या मनात
 सध्या आपल्या समाजाचं लाली सारखं झालंय. आपण ही  नुसत्या सालीच खातोय.   खेळ खेळत नाही बघतो. बातम्या नाही मतं ऐकतो. देशाभिमानाचं भरतं आलं तर पोस्ट्स बनवतो नाहीतर फॉरवर्ड / लाईक करुन आपण किती देशाभिमानी अशी स्वत:ची पाठ थोपटतो
हा चरा तर रोजच उठतोय

नविन अध्याय

गेली काही वर्ष प्रार्थमिकता बदलल्याने माझा ब्लॉग सुप्तावस्थेत गेला होता. आता परत लिहवेसे वाटु लागले आहे तेंव्हा सुरु करते...
थोडा बाज बदलतेय. डायरी कम नोंदवही सारखी टिपणं करेन म्हणते आहे.  म्हणुन अनुदिनी.
आपला लोभ असावा...