Saturday, January 10, 2009

देहबोलीचे ठोकताळे

कल्पना करा की तुम्ही बाजाराच्या रस्त्याने चालला अहात. समोरुन साठीच्या, सावळ्या वर्णाच्या, सुरकुतल्या कातडीच्या, कमरेत थोड्या वाकलेल्या, हिरवी नऊवारी नेसलेल्या, गळ्यात पोत, कानाच्या ओघळलेल्या भोकात बुगड्या, हातात चार काचेच्या बांगड्या घातलेल्या आजी तुमच्या समोरुन आल्या आणि तुम्हाला म्हणाल्या, "Could you please direct me to the post office nearby?" in Oxford English, एकदम तुम्ही कसे दचकाल की नाही?
आपण सगळे सतत, नकळत, आपल्या आजुबाजुच्या व्यक्ती, वस्तु, घटना यांच्याबाबतीत आडाखे बांधत असतो. कच्चे आडाखे पक्के करत असतो. ९९% ते आडाखे अगदी बरोबर निघतात आणि जेंव्हा नाही निघत तेंव्हा त्या प्रसंगांचे किस्से बनतात.
प्राणिमात्रांच्याबाबत आडाखे बांधायला सर्वात मदतीची ठरते ती त्यांची देहबोली. अहो प्राणीमात्र म्हणजे द्विपाद, चतुष्पाद सगळे बरका! खरं सांगा तुम्ही, समोरुन येणा-या कुत्र्याला बघुन, हा कुत्रा निरुपद्रवी आहे का आपल्याला रस्ता ओलांडायला हवा, ह्याचा अंदाज एका कटाक्षात त्याची चाल, शेपूट आणि दात बघुन घेउ शकता की नाही? (इथे जर तुम्ही नाही म्हणाला असाल तर तुम्हाला भारतात वास्तव्याचे भाग्य प्राप्त नाही अथवा तुम्ही अनुग्रहीत वर्गातले आहात असा आडाखा मी बांधेन!) अर्थात हे मी रस्त्यावरच्या कुत्र्यांबद्द्ल बोलत आहे. 'पट्टेवाल्या' कुत्र्यांबद्दलचे अंदाज, पट्ट्याच्या दुस-या टोकाला असणा-या प्राण्याकडे पाहुन लावता येतात.
लहान मुलांच्या आयांचं बघितलं आहे का तुम्ही? ते पोर आसपास असेल तर त्याच्या गुरुत्वमध्याचा अंदाज घेत असतात. त्या पोराने पायाची विवक्षित हालचाल सुरू केली किंवा 'चेहरा' केला की तातडीने पोराला धरुन बहिर्दिशेला धाव घेतात. ही झाली आई-मुलांची सांकेतिक देहबोली. त्यातही दोन्ही टोकाच्या आया असतात, बेबीआत्यांची सुन एकदा गप्पा मारायला बसली, की तिची लेक पार तळ्यात-मळ्यात करायला लागली तरी हिला पत्ता नसतो, आणि आमची नंदु, पोरानं जरा पाय वाकडा केला की लागली चौकश्या करायला! काय कावला होता तिचा . . . . ओलाफ! (हा हा -- तुम्ही अपेक्षा केली होती की नाही की कार्ट्याचं नाव चिन्मय, वेद, आर्य नाहीतर फारफार तर आर्चिस असणार म्हणुन?) असो आज काल हा देहबोली वाचनाचा प्रकार, `हगीज'कृपेने बंद होत चालला आहे.

माझी देहबोलीची व्याख्या थोडी व्यापक आहे बरंका? म्हणजे केवळ अंगविक्षेप नव्हे तर पेहराव, केशभुषा, आभुषण-चयन, आवाज, हेल, संवाद, सवयी हे सर्वकाही माझ्या मते त्यात समाविष्ट आहे.

तर असं हे आडाखे बांधायचं शास्त्र आहे. त्यात विशारद, पारंगत अश्या पदव्या सुद्धा असतात. इन्सब्रुकच्या विमानतळावर दिसलेला मिशीवाला घारा - पुणेरी आहे हे थोड्या सरावाने ओळखता येतं पण नदीअलिकडचा की पलिकडचा, कोथरुड का प्रभात रोड हे ओळखु शकलात तर खरे पारंगत.
माय फेअर लेडी मधला हेन्री हिगिन्स कसा संभाषणाच्या हेलावरुन कोण कुठल्या प्रांतातले हे ओळखातो त्यातलाच हा प्रकार.
तुम्ही ऑफिसच्या रिसेप्शन मध्ये आलेला माणुस इन्टेरव्ह्यु द्यायला आला आहे की सेल्स रेप्रेसेंटीव आहे हे ओळखु शकता. लग्नात आलेला बनु वन्संच्या मुलीचा मित्र किती गुड फ्रेंड आहे हे ओळखु शकता. बसस्टॉपवर उभी असलेली मुलगी एस एन डी टी ची का फर्गसन ची हे ओळखु शकता. ह्या शेजारुन जाणा-या बायका आई-मुलगी का सासु-सुन हे सांगु शकता - देहबोली आहेच तशी बोलकी!
पण ही सगळी पारंगतता घेउन तुम्ही परक्या देशात जाता आणि सगळंच चित्रच पालटतं! तिथल्या लोकांचे ना कपडे वाचता येतात ना हावभाव! ना नावावरुन काही कळतं ना गावावरुन - आपलं अगदी शहरात पाट्या न वाचता येणा-या अडाण्यासारखं होऊन जातं. सगळं अनोळखी असुरक्षित वाटतं. मग हळुहळु आपलं मन एक नवी वही उघडतं. नोट्स घ्यायला लागतं. उतरंड रचतं. -Oh Macy's Oh Neiman Marcus! No Gucci -- गोष्टी मांडणीत जागेवर बसायला लागतात. संवादाचे नवे अर्थ, सामाजिक संदर्भ, आणि परत एकदा तुम्ही घरचे होता इथे.

मग जेंव्हा भारतात परत येता, तेंव्हा तुमच्या Jump Suit आणि accents वरुन आडाखे बांधलेच लगेच म्हणुन समजा

तर असा हा अखंड खेळ - आडाखे बांधायचा आणि आडखे बांधायची संधी पुरवायचा.
हे वाचतानाही तुम्ही लेखिकेबद्दल आडाखे बांधत आहात की नाही? - पुण्याची - लेकुरवाळी - परदेश म्हणजे अमेरिका बघितली असावी - मराठी मिडियम - संस्कृत ५० मार्काचं की १००? . . . .