Saturday, October 06, 2007

पुस्तकांच्या आठवणी

रात्रंदिन वाचनाचा ध्यास असण्याच्या आणि तेवढा वेळ असण्याच्या काळात, मिळेल तिथुन, आणि मिळेल तशी पुस्तके वाचुन काढली. त्या वाचनवेडात पार बुडुन गेले ते आता बाहेर यायचं काही लक्षण नाही. या प्रवासात पुस्तके ही साथीदार होती. आमच्या घरात कुठलेही कपाट उघडले की दृष्टीस पडायचे ते पुस्तकांचे मनोरे. अशा सगळ्या साहित्यसहवासात, काही पुस्तकांनी माझ्या मनात आपले स्थान बनवले. ध्यानात घ्या या आठवणी 'पुस्तक' या वस्तुच्या आहेत. त्यातल्या साहित्याचा त्यात भाग आहेच पण ती पुस्तके, केवळ वस्तु म्हणुनही मला भावली, लक्षात राहिली.

तर वाचनावर मनापासुन प्रेम असलं तरी वाचनाचा एक प्रकार तसा नावडताच. तो म्हणजे पाठ्यपुस्तकं. त्यांच्यावर प्रेम करणं अवघडच! आवडती पुस्तकं सुद्धा 'रॅपिड रीडींग' ला आली तर 'संदर्भासहित स्पष्ट'पणे नावडती होतात! एवढं असुन एक पुस्तक मला खुप आवडलं होतं. मला तिसरीत असलेलं इतिहासाचं पुस्तक. मला आठवतं त्याप्रमाणे त्या पुस्तकाचं नाव 'थोरांची चरित्रे' असं होतं (चु.भु. द्या. घ्या.) मोठं सुरेख पुस्तक होतं ते! मस्टर रंगाच्या मॅट मुखपृष्टावर, स्वातंत्र लढ्यातील नेत्यांची पोर्ट्रेट्स फोटोंसारखी मांडणी. प्रत्येक नेत्याचा एक धडा. प्रत्येक धड्यात दोन चित्रं. एक पोर्ट्रेट आणि एक त्यांच्या आयुष्यातल्या एका प्रसंगावरचं चित्र. रामकृष्ण परमहंसांचं, ते लहान असतानाचं देवीपुढे बसलेलं चित्र अजुन माझ्या डोळ्यासमोर आहे. गडद निळ्या रंगाची बंगाली पद्धतीने काढलेली दुग्गा आणि तिच्या पायाशी बसलेला छोटा गदाधर. तसंच नेताजींचं स्थानबद्धतेतुन निसटतानाचं उंच फर कॅप मधलं चित्र. अजुनही मला त्या पुस्तकाची सय येते. विषयानुसार जुळुन आलेलं सादरीकरण, उच्च निर्मितीमुल्य यांचं उत्तम उदाहरण! नाहीतर नुसतीच नुसती शि.द. फडणीसांची चित्र घातली म्हणुन गणिताची पुस्तकं हसत खेळत होत नाहीत ( शि. द, फडणीसांची तालबद्ध चित्र मला मनापासुन आवडतात, तेंव्हा गैरसमज नको) पण म्हणुन गणिताच्या पुस्तकात? आणि म्हणुनच ज्यांनी ते पुस्तक बनवलं त्यांचं कसब, परिश्रम आणि बांधिलकी जाणवते. उठुन दिसते.

तुमच्यापैकी काहीजणांना आठवत असेल कदाचित, "ग्लासनॉस्त" आणि "पेरेस्त्रॉयका" च्या आधी, वर्षातुन एकदा तरी, जागोजागी रशियन पुस्तकांची प्रदर्शनं भरायची. अनोळखी शास्त्रिय पुस्तके, मध्येच एखादं 'रशियन भाषा शिका', रशियन भाषेतल्या क्लासिक्स्ची पाय घासत चालल्यासारखी वाटणारी भाषांतरं, गॉर्कीचं आई नाहीतर डोस्तोएवस्कीचं इडीयट. तर अशा प्रदर्शनातुन बाबांनी आम्हाला रशियन परीकथांचं पुस्तक आणलं होतं. गुळ्गुळीत पानांचं, भरपूर गोष्टी असलेलं, हिरव्या कापडी बांधणीतलं.

आपल्या इथे जे बुकबाईंडींग केलं जातं, त्यासाठी खास शोधुन पुस्तकशत्रु नोकरीवर ठेवले जातात असं माझं स्पष्ट मत आहे. शक्यतो जोर लावल्याशिवाय पुस्तक उघडता येउ नये, उघडल्यावर, वाचणारा गाफिल राहिला झाला तर ते फाटकन बंद व्हावं. याची विशेष काळजी घेतली जाते. शिवाय, ओळीच्या सुरवातीचे आणि शेवटचे शब्द लेखकाने उद्योग नसल्याने लिहले आहेत, तेंव्हा ते कापणीत किंवा बांधणीत गेल्याने काही फरक पडत नाही अश्या विचाराने ती बांधणी केली जाते. आम्ही असंच एक पुस्तक परत बांधणी करायला दिलं होतं. शशी भागवतांचं 'मर्मभेद'. मोठं मस्त पुस्तक आहे ते. गो ना दातारांच्या वीरधवल पठडीतलं. 'रहस्यमय'. तर या बाईंडींगबाबाने त्याचं रहस्यभेद करणारं पान, पहिल्या पानाच्याही आधी बांधलं! आता बोला! त्या तुलनेत या पुस्तकाची बांधणी फार्फार वरच्या दर्जाची होती.

या पुस्तकानं मला एक नवीन कल्पनाविश्व दाखवलं. साधारणत: आपल्याला माहित असलेल्या परीकथा हॅन्स ऍन्डरसनच्या. किंवा आता डिस्नेची मक्तेदारी असणा-या. 'परी' ही आपल्याकडे इंपोर्टेडच. मला वाटतं 'फेअरी'चं मराठीकरण.

या पुस्तकानं मला पूर्व युरोपतल्या कल्पना दाखवल्या. 'बाबा यागा' चेटकीण, तिची पायावर चालणारी झोपडी, तिचे '" उद्गार, आयवान आयवानोविच, मार्या मारिना, ओव्हनवर बसुन राहणारा आळशी आय्वान. झार आणि झारिना, सगळंच वेगळं. त्या पुस्तकातली चित्रं पण वेगळी होती. त्यांची शैली, रंगांचा वापर, सारं रशियन धाटणीचं. कवरवर धावणारे तीन घोडे आणि त्यांचं तीन रंगात होणारं रुपांतर. सगळाच वेगळा परिपुर्ण अनुभव! आणि विशेष म्हणजे माझ्या आणि बहिणीच्या हाताळणीनंतरही ते आता माझ्या लेकीला वाचायला द्यायला पुर्ण रुपात शाबुत आहे!

माझी तिसरी आठवण आहे ती देव्हा-याच्या खालच्या खणात ठेवलेल्या 'संपूर्ण चातुर्मास' या पुस्तकाची! कुंकु-उदबत्ती-धूप-कापराचा धार्मिक वास या पुस्तकाला यायचा. चातुर्मासात देव्हा-याच्या शेजारी लागणा-या जिवतीच्या चित्राइतकंच हे पुस्तक माझ्या देवआठवणींचा अविभाज्य भाग आहे. संध्याकाळच्या हुरहुर लावणा-या वेळी या सगळ्यांनी 'शुभंकरोती'च्या बरोबरीने दिलासा दिला आहे.

तसं हे पुस्तक म्हणजे एक जंत्री आहे. भुपाळ्या, पाळणे, आरत्या, व्रत विधी, ते तिथी, वार , मराठी महिने, स्तोत्रे, रामरक्षा, सर्व काही. मिळेल ते वाचायचे आणि नवीन न मिळाल्यास असेल ते परत वाचायचे, हे ब्रीद असल्याने, मी ह्या पुस्तकाचीही पारायणे केली आहेत. आरत्या म्हणताना तुम्हाला जाणवलंय का की काही आरत्या स्फुरलेल्या आहेत तर काही जुळवलेल्या आहेत. उदा. दुर्गेदुर्घटभारी ( हे वेगळे शब्द आहेत हे वाचे पर्यंत माहीतच नव्हतं!) ही कशी दुर्गेच्या उग्ररुपाला साजेशी आहे. लवथवती विक्राळा 'वीररसपुर्ण' आहे. कशाचाही अर्थ लावुन पहायची दुसरी खोड असल्याने 'साही विवाद करता पडले प्रवाही' ऐकताना - धप्पकन पाण्यात पडलेल्या माणसांचा आणि दुर्गेचा काय संबध? हा पडलेला प्रश्न पण आठवतोय.

आणि या सर्वांपेक्षा भारी आहे, या पुस्तकातला कहाण्यांचा खजिना. सोमवारची, शुक्रवारची पहिली आणि दुसरी, सोमवती अवसेची अश्या कितीतरी! या कहाण्या म्हणजे सोपी ओघवती भाषा, प्रासयुक्त वाक्यं याची उत्तम उदाहरणं आहेत. 'उतशील, मातशील, घेतला वसा टाकशील". 'करा रे हाकारा, पीटा रे डांगोरा', 'खुलभर दुध' आणि 'केनीकुर्ड्याची भाजी' अशी वळणं घेत 'पाचा उत्तरात सुफळ संपुर्ण' होणारी कहाणी माझ्यासाठी लेखनाचा आदर्श आहे.

बदलाच्या वा-यापासुन आपल्या आणि आपल्या मुलांवर करायच्या संस्काराना वाचवण्याच्या माझ्या आईच्या प्रयत्नांचं हे पुस्तक एक साक्षीदार आहे. त्याची माझ्या मनातली आठवण समईसारखी सोज्वळ तेवते आहे

Tuesday, May 08, 2007

आपुलकीचा अंत

सुहृदांबरोबर हवाहवासा वाटणारा प्रवास कामानिमित्त झाला की 'अपरिहार्य' सदरात जातो नाही? असाच एक ढकलाढकली करुन शेवटी 'अपरिहार्य' झालेला प्रवास माझ्यावर कोसळला. मी सवयीने प्रवासकर्त्या संगीताला फोन लावला,

'अग संगीता, मला दहा दिवसात San Hose ला जावं लागणार आहे. तिकिटं बघतेस का? '

संगीताचं उत्तर 'तू आपल्या TRTS मध्ये टाक ना.'
'काय?'
'Travel Request Tracking System ग, मग मी processing सुरु करते. फॉर्म पाठवते तो भरुन अप्रुवल घे. You are cutting too short OK?'
मला माझा पहिला प्रवास आठवला. माझ्या बॉस नं मला सांगितलं
'There is an SOS situation out there. तू हँडल करु शकशील. उद्या VISA, Fly the day after. तिकिटाचं मी बघतो. दोन दिवसांनी मी बारा तास पलिकडे असणा-या जागी computerसमोर! बॉस चा फोन, 'बरोबर पोचलीस ना बयो? खायचं रहायचं ठीक आहे ना?' आणि आता हे!
तसं हेही अपरिहार्यच आहे. नीश असणारी कंपनी आता चांगलीच जगङ्वाळ झाली आहे. ही लिखापढी त्या वाढत्या पसा-यात आवश्यकच आहे हे मलाही पटतं पण खटकतं हे ही खरंच!
आमची पुणेरी संस्कृती जपण्याची जबाबदारी पुण्याच्या दुकानदारांवर आहे हे तर सर्वांना माहीत आहे.
नंबर घातलेल्या, झिजुन चाललेल्या लाकडी फळ्यांच्या दरवाजांच्या धुळकट दुकानात बसलेले साठे आणि कंपनी तुम्हाला हव्या त्या घाटाचा ड्बा, तेलपोळीचा पत्रा आणि कवड्या पुरवणार,
दुधाच्या दुकानातले शारंगपाणी 'वहिनी तुम्हाला गाडी चालवता आलीच पाहीजे' असं दटावणार, आणि चितळे दूध संपलं असलं तर कात्रजच प्रकृतीला चांगलं असं प्रतिपादन करणार,
घरी सामान पोच करायला आलेला 'प्रपंच'चा क्षीरसागर (धाकली पाती) आजोबांसाठी गुलकंद आणणार, यादीत नसला तरी. आणि अर्धा तास 'शेअरबाजारा'वर गप्पा मारणार,
भाजीवाल्या बाई 'काय ताई ब-याच दिसांनी? परवा तुमची लई सय आली बगा. येकदम ताजं शॅलड आणलं होतं पन तुमचा पत्याच नाय!' असा ड्वायल्वाग मारणार.
पुष्करणी भेळेच्या दुकानात काळे मातीचे रांजण पाण्याला असणार आणि साडेसातची कामगार सभा ऐकायची सक्ती पण!

पण पण पण

या सर्वांवर धावा बोलत आहेत ही नवीन येणारी दुकानं - रिलायन्स फ्रेश आणि बिग बजार आणि सुभिक्षा. सुभिक्षा! दमड्या टिच्चुन वस्तु विकत घ्यायच्या दुकानाचं नाव सुभिक्षा! मला उगाचचं खांद्याला चौपदरी झोळी अडकवुन " ॐ भवती ..." केल्यासारखं वाटेल!
मला माहित आहे तुम्ही म्हणताय, बाई जरा पॅरानॉईड आहे. कुठे रिलायन्स आणि कुठे मंडई, पण रिटेल शॉप्स नी 'मॉम ऍंड पॉप' स्टोअर्सना झोपवलं हे अमेरिकेतलं सत्य आहे हे तुम्ही जाणता. एकदा price wars आणि game of volume सुरु झाले की हे अटळ आहे. अत्ताच, रिलायन्स मधल्या भाज्यांचे दर कमी, वजन चोख आणि माल रसरशीत आहे.
माझाही जीव रमतो या दुकानात, खोटं कशाला बोलु? निवडीला वाव, वातानुकुलन आणि थोडं मिरवणं मलाही भावतं पण तिथल्या भावशुन्य डोळ्यांच्या, भाषेचा गंध नसलेल्या विक्रेत्या पोरी मला परक्या वाटतात. 'चवळी कुठे आहे?' हे इंग्रजीत विचारावं लागतं च्यामारी! शॉपिंगला येणा-या बायांची कार्टी, शॉपींग कार्ट ढकलताना माझ्या घोट्यांचा नेम धरतात आणि त्या भवान्या 'नो बेटा' करत अंगावरुन निघुन जातात. डब्बल च्यामारी! आणि या सगळ्यात पुणेरी संस्कृतीवर संक्रांत येते ती वेगळीच!
हीच प्रगती आहे, हीच उंचावणारी जीवनप्रत आहे आणि मला ती हवीहवीशी आहे. मान्य, सगळं मान्य! पण माझ्या मनाला सागरगोटे, लंगडा बाळकृष्ण, अन्नपुर्णा हे पण हवय! म्हणुन तर माझं धुवट मन ठसठसतं,

पुढे पुढे जाताना,
ही मनात कसली खंत?
गुलबकावलीच्या रानी
होतो आपुलकीचा अंत!

Thursday, April 05, 2007

हाक

'व्यवस्थापकीय' पदवी मिळवुन व्यावसायिक जगात वावरणा-यांची एक जमात असते. म्हणजे 'एम बी ए' माणसं हो! ते एक विशिष्ठ परिभाषा वापरतात आणि ती सतत बदलतात. काही दिवसापुर्वी 'Facilitatorअसेल तर आता तो 'Enabler' झालेला असतो. तर अश्या मंडळींची तुमच्याशी बोलण्याची ढब असते. प्रत्येक वाक्यच्या सुरवातीला ते तुम्हाला संबोधतात. 'मंजिरी Let us first aim for the low lying fruit मंजिरी,and then we can see what is the common synergy मंजिरी' जणु काही संभाषणात इतक्यांदा हाक मारली नाही तर तो किंवा मी माझं नाव विसरुन जाउ अशी त्याला भिती वाटत असावी!
ही हाक, संबोधन मोठी मजेशीर गोष्ट आहे. कोणी, कोणत्या नावाने किंवा नाव न घेता हाक मारली अश्या गोष्टी काय काय सुचवुन जातात नाही? मग ते `अहो! ऐकलं का?' असो, नटसम्राटांचं `सरकार' असो की नातीनं आजोबांना बोलावलेलं `ए विनायक आबा' असो. प्रत्येकाची वेगळी खुमारी.
तशी बाळाची पहिली ट्यॅंह्यॅं - ही सुद्धा हाकच नाही का, 'अरे कोणी आहे का इकडे?' पासुन 'मला भुक लागलीय आणि तुम्ही लक्ष पण देत नाही!' सगळी बाळं आपल्या आईला आपल्या हाकेला ओ द्यायला अगदी `कंडीशन' करुन टाकतात. मला आठवतं माझी मुलगी तान्ही होती तेंव्हा, कोणत्याही बाळाच्या रडण्याचा आवाज आला की माझी डावी मांडी हलायला लागायची बाळाला थोपटायला घेतल्यासारखी! सोसायटीत खालुन 'आई" अशी हाक आली की सगळ्याजणी खिडकीशी जमा होतात की नाही?
कोणत्या नावाने हाक मारली जाते आणि आवाजाचा पोत काय आहे यावरुनच पुढच्या संभाषणाचं सुतोवाच असतं. 'नंदु ग!' म्हणजे ..'ये ग राणी खाउ देउ का?' आणि 'नं - दि - नी' म्हणजे `मुकाट्याने अभ्यासाला बसतेस का घालु दोन धपाटे?' काय श्रुतीचित्र उभं राहिलं की नाही कानात?
जाणकार नव-यांना म्हणे, `अहो ऐकलं का' किंवा 'मी काय म्हणते,' एवढ्यावरुनच आपल्या खिश्याला पडणा-या भोकाच्या आकारमानाचा बरोबर अंदाज येतो. अर्थात त्यासाठी बारा चौदा वर्षाची तपश्चर्या लागते.
काही हाका बिन नावाच्या असतात. `विशेष' खिडकीखालुन रस्त्याने सायकल ने जाताना घातलेली शीळ काय आणि उन्हाळ्यात आमराईतुन येणारी कोकीळाची शीळ काय भाव एकच नाही का?
त्याही पलीकडे काही हाका बिन-आवाजी असतात. थेट आत्म्याला भिडणा-या. काही वेडे, सर्व संकेत, सर्व शिष्टसंमत शहाणपण झुगारुन देउन या हाकांना ओ देतात आणि इतिहास घडतो.
हा लेखन खटाटोप तरी काय आतल्या अस्वस्थ उर्मींना दिलेली ओ च असते.
आणि हो तुमच्या हाकांचीही आम्ही वाट बघतो बरं, कधी कधी आळशीपणामुळे ओ द्यायला उशीर होतो खरा पण ...
पुकारो हमे नाम लेकर पुकारो,
हमे तुमसे अपनी खबर मिल रही है।

Monday, February 12, 2007

आमच्या सुंदरीचं लगीन!

स्थळ - तुमच्या आमच्या घरातलं स्वैपाकघर

काळ - रविवार सकाळ साडेदहा अकरा. खमंग नाश्ता मटकाउन श्री दुस-या चहाचे घुटके घेत आहेत. हातात रविवारची पुरवणी. सौ. ओट्याशी उभ्या राहुन पोळ्या करतायेत.
पार्श्वसंगीत - "व-हाडी कोण कोण येणार आमच्या सुंदरीचं लगीन ...

सौ : अहो! ऐकलं का?
श्री: अं . . . हं . . .
सौ: झाला बाई एकदाचा साखरपुडा! मी म्हटलं इजा बिजा तिजा होतंय की काय? अभीला मात्र चांगलच गटवलं तिनी!
श्री: हो! ...
सौ: पण लहान आहे तो तिच्याहुन!
श्री: अँ? ... मंदी कुठं मोठीय ग?
सौ: अहो! कोण मंदी? मी अभीषेक ऐश्वर्याच्या लग्नाचं म्हणतेय! तसा मला काही दिवसांपुर्वीच वास लागला होता. ही बच्चन मंडळी तिला घेउन काशी विश्वेश्वराला गेली ना? तेंव्हाच मी म्हटलं की काहीतरी शिजतंय! नायकीण म्हणाली `गुरू'साठी गेले असतील! पण मी तेंव्हाच ताडलं की हे `मंगळा'साठी आहे म्हणुन! उगाच नाय ऐश्वर्यानं साड्या खरेदी केली. माझा पण लग्नाचा शालू बनारसी आहे बरं.
श्री: अरे वा वा!
सौ: अरे वा वा काय? साड्यांची खरेदी आम्ही केली म्हणुन! तुमच्या मंडळींवर सोडली असती ना, तर इरकल नाहीतर बेळगावी घेतली असती वन्संनी.
श्री: (चहाबरोबर गिळलेल्या शब्दांचा आवाज)
सौ: तशी मंडळी फार भाविक हो. सगळ्या देवांना जाउन आली! आपण पण जायचं का? ऐश्वर्या ट्रॅवलची नवीन सहल आहे, `शुभ मंगळ' बच्चन स्टाईल. आणि म्हायतीय का? अमिताभच्या मेकपमॅनची वहिनी पण आपल्या सोबत येणार टुरवर! काशी, अजमेर, विन्ध्यवासिनी सगळं कवर करणार. शिवाय बच्चन क्वीज आणि जलसा ते सिद्धीविनायक खास चालण्याची स्पर्धा! जाउया ना!
श्री: काय म्हणतेस!
सौ: वृंदाबाई फारच हौशी हो. जावयाचा वॉर्डरोब करायला दिलाय, फक्त अभिषेकची उंची मोजुन बनवनार आहे म्हणे. पण मी म्हणते कपाट करायला काय करायचीय उंची!
श्री: खु .. खु.. वॉर्डरोब म्हणजे त्याचे लग्नसमारंभाचे कपडे. हॅ हॅ .. कपाट म्हणे ..
सौ: बरं बरं .. पण तरी नुस्त्या उंचीवरुन कसे काय कपडे शिवणार? सुरवार तंग होऊन अनावस्था प्रसंग ओढावला म्हणजे? माणसानं कसं प्रॅक्टिकल असावं ऐश्वर्यासाठी जया काय दागिने करणारेय कोणास्ठाउक? ती कधी काही सांगत नाही की बोलत नाही नुस्ती वामांगी रखुमाई आहे. आता दागिने घेउन टाक म्हणावं! नाहीतर लगीनसराई सुरु झाली म्हणजे सोनं कडाडायचं! आधीच दहा झालंय!
श्री: आपल्याला काय करायचंय?
सौ: वा असं कसं? आपल्या घरची मंडळी आहेत ही! आपले बंटी - बबली तसे हे रोज भेटणारे! टीवीवर हो! इतक्यांदा तर माझी बहीणसुद्धा भेटत नाही मला! मी तर म्हणते चांगला घसघशीत आहेर करायला हवा. हेअरबँड दिला तर चांदीचा?
श्री: काहीतरी काय? ऐश्वर्या कुठे घालते हेअरबँड?
सौ: ऐश्वर्याला नाही हो. अभिषेकला म्हणतेय मी. बघितलंत ना टीवीवर?
श्री: अँ हो का? असेल असेल!
सौ: तर मग ठरलं! अचानक मुहुर्त ठरवतील आणि आपली मात्र धावपळ. आधीपासुन तयारी ठेवली पाहिजे. मी पण सकाळी फिरायला जातेय. असं स्लीम दिसलं पाहिजे. तुम्ही पण लक्ष द्या जरा. ढेरी दिसतीय केव्हढी!
श्री : हॅ .. काहीतरीच तुझं!
सौ: आणि गंमत सांगायची राहिलीच तुम्हाला! मी किनै, मंगलाष्टक पण रचलंय. पाठवुन देणारेय जयावैनींना. आपली बाजु कमी नको पडायला. म्हणुन दाखवु का?
अभिषेकाशी जडले नाते विश्वसुंदरीचे।
स्वयंवर झाले ऐशुचे, स्वयंवर झाले ऐशुचे।
श्री: वा! वा! सरोजिनी नायडुंनंतर आपणच!
सौ: हो कळतात बरं हे टोमणे. पण खरं सांगु, कधी कधी वाटतं, यांच्या सगळ्या खाजगी गोष्टी किती पब्लिक होतात नै? म्हणजे प्रायवसी कशी ती नाहीच. आपण आठवतं लग्नाआधी चोरुन टेकडीवरच्या मारुतीला गेलो होतो?
श्री: आणि तुझी चप्पल हरवलीवती.
सौ: हुं तेच कसं हो आठवतं तुम्हाला? तुमच्यासारखा शुंभ माणुस नै पाहिला मी. मी सांगतीय काय आणि तुम्ही बोलताय काय?
श्री: अग चिडतेस काय अशी? मजा केली ग मी. खरंय तुझं म्हणणं, त्या आठवणी फक्त आपल्या आहेत आणि त्याची सर कुठल्याही बेंटलेला येणार नाही!
सौ: काय बेंटेक्स! मी काही बेंटेक्स फिंटेक्स घालणार नाही. सांगुन ठेवतेय, सगळे लॉकरमधले दागीने आणायचे आहेत.
श्री: हो माझे आई हो! तु म्हणशील ते खरं!

आणि अशा त-हेने ही साठा उत्तराची कहाणीही श्रींच्या शरणागतीने सफल झाली!

Friday, January 05, 2007

वर्गीकरण

जगात दोन प्रकारची माणसे असतात,
एक, ज्यांना सतत थंडी वाजते आणि दुस-या ज्या बर्फ़ात स्लीवलेस ब्लाउज घालुन विहरतात!

जगात दोन प्रकारची माणसे असतात,
एक ज्यांना पु.ल. आवडतात, आणि दुसरे ज्यांना वाचता येत नाही!

जगात दोन प्रकारची माणसे असतात,
एक ज्यांना नाचता येतं आणि दुसरे जे विसर्जन- वरातीच्या पुढे हात वर करुन अंगविक्षेप करतात!

जगात तीन प्रकारची पण माणसे असतात,
एक ज्यांना मोजता येतं आणि दुसरे ज्यांना मोजता येत नाही!

जगात दोन प्रकारची माणसे असतात,
एक जी 'बोअर' करतात, आणि दुसरी जी 'बोअर' होतात!

तुम्ही?