Monday, March 27, 2006

फास्टर फेणेचे बाबा

म्हणजे आपले भा. रा. भागवत हो! काय सॉलीड लिहिलय ना भागवत काकांनी? फुरसुंगीचा चँपियन सायकल स्वार बन्या आणि त्याच्या धडपडी. मोठी धमाल यायची वाचायला. ते फक्त फा फे चे बाबा नव्हते पण ह्या कार्ट्याची प्रसिद्धी जास्त असल्याने ते त्याचे बाबा म्हणवले जाणार.
दर बालवाडी दिवाळी अंकात, त्यांनी लिहिलेली एक दीर्घ कथा असायची. इतर बाबतीत 'किशोर' पुढे लिंबुटिंबु वाटणारा बालवाडी या एका गोष्टीने बाजी मारुन जायचा. भागवतांचे बिपीन बुकलवार ( book lover?) आणि त्याची दोस्त मंडळी आहाहा - ती दिवाळीची सुट्टी ... एका हाताने फराळचे बकाणे मारत वाचलेल्य त्या गोष्टी ... कोणी १० निकारागुआ चे स्टॅम्प दिले तरी नसते एक्स्चेंज केले मी ते क्षण.
भा रां नी दिलेला आणि एक मोठा आनंदाचा ठेवा म्हणजे त्यांनी अनुवादित केलेल्या ज्युलस् वर्न च्या विज्ञान कथा. चंद्रावर स्वारी आणि इतर तर आहेतच पण सगळ्यात बेस्ट, मुक्काम शेंडेनक्षत्र आणि सुर्यावर स्वारी. 'Off on a comet' चा अनुवाद दॊन भागात. साधारणतः भाषांतरात येणारा बोजडपणा, या पुस्तकात अजिबात नाही. जणु मराठीत जन्माला आलेले कथानक. वातावरणसकट शेंडेनक्षत्रावर बसुन सूर्यावर स्वारी करायला गेलेला प्रुथ्वीचा तुकडा. त्यावरची अजब प्रजा. मॉमात्र चा अभिमानी बेन झुफ, नीना आणि पाब्लो, 'निल डेस्पेरेन्डम' म्हणणरे प्रो. रोझेत, कंजुष ईसाक, टिपीकल इंग्रज मे. ऑलिफॉन्ट... माझा बालपणीचा काळ सुखाचा करण्यात भा रां चा वाटा सिंव्हाचा आहे.

एकदम 'टॉक!'

Tuesday, March 14, 2006

दिल चीज क्या है?

सुमेधाच्या उमरावजान ह्या नोन्दीमुळे मनात आलेले काही विचार,
ह्या चित्रपटाने तीन स्त्रियांना पुन:प्रसिद्धी मिळवुन दिली.
उमरावजान स्वत:(ती एक कल्पनिक स्त्री का असेना...), रेखा आणि आशा भोसले. या तिघींच्या कौशल्याची एक नवीन मिती dimensionचाहत्यांसमोर आली. उमरावजानची एक संवेदनाशील कवयित्री म्हणून एक नवीन ओळख झाली. ऱेखाच्या अभिनयसामर्थ्याची पेहचान झाली. आशाजींचा मधाळ आवाज आपल्या चाकोरीबाहेर पडुन खय्याम यांच्या संगीतातुन खानदानी अत्तरासारखा दरवळला. या तिघी नाजनीन अहेत, divaआहेत. आणि या तिघीही विरहिणी अहेत, अश्या जोडीदाराच्या शोधात जो जन्माची साथ देइल. ज़ो मध्येच डाव सोडुन उठुन नाही जाणार... तिघींना जणु एकच प्रश्न पडलाय,
हर मुलाकात का अंजाम जुदाई क्युं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमें....

Thursday, March 02, 2006

नम्र नोंदी

नम्र नोंदी
  • ह्या टिपणस्थळी नमूद केलेली सर्व मते माझी वैयक्तिक मते असुन त्यांचा मी ज्या संस्थेत काम करते तिच्या मतांशी अथवा माझ्या परिवाराच्या मतांशी काही संबंध नाही
  • इथे केलेले सर्व हिरव्यावरचे पांढरे, माझेच लेखन आहे. इतर लेखकांचे लेखन उद्ध्रुत केल्यास तसा अवश्य उल्लेख करीन
  • ही टिपणवही 'मंजिरी' शुद्धलेखन पद्धती अनुसरते. :) आपणास ज्या शुद्धलेखनच्या चुका भासतात त्या खरेतर 'मंजिरी' पद्धतितील त्या शब्दांचे पाठभेद अहेत. (पो. ध. ह.)
  • वडिलांनी प्रचलित शुद्धलेखन शिकवण्याचे थोर प्रयत्न केले पण माझ्या अल्पमतीला केवल 'म. शु प.' मानवते तसदिबद्दल क्षमस्व.
  • (पो. ध. ह.) म्हणजे पोट धरुन हसते - जे LOLचे मराठी समांतर रूप होय. कोण्या शस्त्रीबुवांची पदवी नव्हे
  • ह्या नोंदींचे कोणत्याही ख-या अथवा काल्पनिक पुणेरी पाटीशी साधर्म्य आधळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा